जनता कर्फ्यू ! विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांचा वॉच 

तात्या लांडगे
Friday, 20 March 2020

  • शहर-ग्रामीणमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त 
  • नागरिकांनी घराबाहेर पडू नये : पोलिस, वकिलांसह सामाजिक संघटनांकडून आवाहन 
  • रविवारी विनाकारण घराबाहेर पडणार नाहीत, याची पोलिसांकडून खबरदारी 
  • राज्यात कोरोनाबाधित 52 रुग्ण : पोलिसांकडून जनजागृतीसाठी स्वतंत्र पथके 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार उद्या (रविवारी) देशभर जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे महत्त्व व गरज याबद्दल नागरिकांना माहिती देण्याकरिता शहर व ग्रामीण पोलिस अधिकारी व कर्मचारी गावोगावी फिरत आहेत. दुसरीकडे त्या दिवशी विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर 14 तास पोलिसांचा वॉच राहणार आहे. 

हेही नक्‍की वाचा : मोठी बातमी ! रेल्वेकडून सवलतीचा प्रवास बंद 

राज्यातील पिंपरी चिंचवड, पुणे महापालिका, मुंबई, नागपूर, यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण, नगर, रायगड, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी याठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या आता 52 वर पोहचली आहे. देशातील रुग्णांची संख्याही वाढू लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून ठोस उपाय योजिले जात आहेत. एरव्ही गुन्हेगारांना कायद्याचा धाक दाखवून समाजात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक बांधिलकीही जोपासली जात आहे. शहरातील पान टपऱ्या, मॉल, दुकाने बंद करण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. काही पान टपऱ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येत असून रविवारी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, यासाठी पोलिसांनी जागोजागी बंदोबस्त लावण्याचे नियोजन केले आहे. 

हेही नक्‍की वाचा : गुढीपाडव्याला खरेदी केलेल्या वाहनांची पासिंग लांबणीवर 

जनजागृतीसाठी स्वतंत्र पथके 
राज्य तथा देशातील कोरोना समूळ नष्ट व्हावा या हेतूने रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. नागरिकांनी किरकोळ कामासाठी अथवा विनाकारण घराबाहेर पडू नये, अत्यावश्‍यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी ग्रामीण व शहर पोलिसांनी विशेष पथकांची नियुक्‍ती केली आहे. त्यांच्या माध्यमातून गावोगावी जनजागृती केली जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील व पोलिस आयुक्‍त अंकूश शिंदे यांनी दिली. 

हेही नक्‍की वाचा : जागे व्हा ! तापमानवाढीचा अन्‌ कोरोनाचा संबंध नाही 

हे काय म्हणतात... 
कोरोना हे वैश्‍विक संकट असून त्याला आवर घालण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर विनाकारण येऊ नये. एक दिवस देशासाठी द्यावा, त्यानंतरही कामाशिवाय घराबाहेर पडू नये. न्यायालयातही येण्याची नागरिकांना गरज नसल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 
- ऍड. बसवराज सलगर, अध्यक्ष, सोलापूर बार असोसिएशन 

कोरोना या राष्ट्रीय आपत्तीला आवर घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला. औषधोपचार नसल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विद्यार्थी, प्राध्यापकांसह पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यायला हवा. जेणेकरुन कोरोना देशातून हद्दपार होईल. 
- डॉ. आबासाहेब देशमुख, जिल्हाध्यक्ष, प्राचार्य संघटना सोलापूर 

गर्दी न झाल्यास कोरोना या विषाणूचा प्रसार थांबेल आणि त्याला वेळीच आळा बसेल. कोरोना हे वैश्‍विक संकट बनले असून त्यावर उपाय म्हणून नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार जनता कर्फ्यूचे सर्वांनी तंतोतंत पालन करणे आवश्‍यक आहे. 
- डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरु, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Peoples curfew Police Watch on Outdoors Without Reason