
सोलापूरः येथील किर्ती भराडिया हिच्या नावावर वयाच्या तेराव्या वर्षी 34 किमी जलतरणाचा जागतिक विक्रम आहे. जबरदस्त जलतरण सरावाच्या जोरावर तिने आता गंगा नदी आणि समुद्रात पोहण्याचा नवा विक्रम करण्याची तयारी जिद्दीने सुरू केली आहे.
सोलापूर शहरातील होमकर नगरातील किर्ती नंदकिशोर भराडिया ही इयत्ता नववीची विद्यार्थीनी दमाणी विद्यामंदिरला शिकते. घरामध्ये एकत्रित कुटुंबामध्ये क्रिडाप्रेमाच्या वातावरणाचे संस्कार किर्तीवर झाले आहे. वडिल नंदकिशोर भराडीया हे जलतरणपटू आहेत. जलतरणामध्ये तिने वयाच्या सातव्या वर्षे म्हणजे इयत्ता दुसरीत असल्यापासून सुरुवात केली. नियमित सरावाच्या जोरावर किर्तीने स्वतःच्या जलतरण क्षमता विकसित केल्या आहे. एका उत्तम जलतरणपटूला हवे असलेले जलतरण कौशल्य तिने प्रशिक्षक श्रीकांत शेटे यांच्याकडून आत्मसात करण्यात सुरवात केली. नियमित आठ ते दहा तासाचा सराव हा तिच्या दिनक्रमाचा नित्याचा भाग बनला आहे.
किर्तीला नेमके कशाप्रकारच्या स्पर्धेत सहभागी होता येईल, याचा अभ्यास प्रशिक्षकांनी केला. तिला पंधराशे मीटरसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळवता येईल हे वाढत्या सरावातून स्पष्ट झाले. स्वतःचे दिर्घ अंतराचे जलतरणाचे विक्रम करण्याच्यासाठी तिची क्षमता तयार झालेली होती. पहिला विक्रम सोलापूरच्या विजापूर रोडवरील स्विमिंग पूलमध्ये करण्याचे ठरवले. राष्ट्रीय रेकार्डस संस्थेकडे विचारणा करण्यात आली तेव्हा तिला किमान तीस किमी सलग जलतरण करण्याचा विक्रम करण्याचे उद्दिष्ट मिळाले. मात्र किर्तीच्या सरावाने हा विक्रम मोडण्याची संधी मिळाली. सलग बारा तास पंधरा मिनिटात किर्तीने 34.5 किमी जलतरण केले. तिच्या या कामगिरीची आंतरराष्ट्रीय पातळीचा विक्रम म्हणून नोंद झाली आहे.
त्यानंतर किर्तीचा सराव आजही तेवढाच सुरू आहे. शहरालगत असलेल्या गावातील एका शेततळ्यात ती जलतरणाचा सराव करते. जलतरणात सराव करताना आहार कसा असावा या बाबत तज्ञाकडून सुचना आल्या. मात्र मांसाहाराच्या सुचना बाजूला ठेवत केवळ शाकाहाराच्या आधारे शारिरीक क्षमता विकसित करण्याचे ठरवले. आता सध्या तिचा सराव एका नव्या ध्येयाच्या दिशेने सूरू आहे. तिला आता गंगा नदीमध्ये 81 किमी अंतरापर्यंत सलग जलतरणचा विक्रम करायचा आहे. तसेच मुंबईत धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे 35 किमीचे अंतर सलगपणे पार करण्याचे ठरवले आहे. या विक्रमासाठी सराव संपवून परवानगी मिळण्याची प्रतिक्षा किर्तीला आहे. सोलापूर शहराच्या नावावर किर्ती हे नवे विक्रम जोडण्यासाठी कठोर सराव व मेहनतीच्या आधारावर प्रयत्न करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.