कोळा परिसरातील वाळू माफियांवर पोलिसांची मोठी कारवाई ! 1.40 कोटींचा मुद्देमाल जप्त 

दत्तात्रय खंडागळे 
Thursday, 3 September 2020

कोळा गावातील देशमुख वस्तीवरील ओढ्यातून मोठ्या प्रमाणात जेसीबी व वाहनांच्या साह्याने वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी देशमुखवस्ती, कोळा येथे धाड टाकली असता त्या ठिकाणी ट्रॅक्‍टर, टिपर, ट्रक व जेसीबीच्या साहाय्याने वाळू उपसा होत असल्याचे दिसून आले. त्या वेळी एक ट्रकचालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. 

सांगोला (सोलापूर) : कोळा (ता. सांगोला) येथील परिसरात सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने घातलेल्या छाप्यात शासनाची रॉयल्टी बुडवून विनापरवाना वाळू उपसा करणाऱ्या अकरा जणांविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत तीन जेसीबी, तीन ट्रॅक्‍टर, दोन ट्रक, एक टिपर व 14 ब्रास वाळू असा एक कोटी 39 लाख 98 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

हेही वाचा : बापरे ! "आयटीआय'च्या दीड लाख जागांसाठी तब्बल 24 लाखांहून अधिक अर्ज ! 

पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार विशेष पोलिस पथक कोळा भागात वाळू चोरी संबंधित संयुक्त गस्त करत असताना कोळा गावातून जुनोनीकडे भरधाव वेगाने वाळू घेऊन जाणारा एमएच 10 बीआर 7791 या क्रमांकाचा ट्रक दिसला. पोलिसांनी ट्रकचालक सिकंदर कुडची (रा. विनायकनगर, सांगली) यास वाळू कोठून आणली, याबाबत विचारणा केली असता त्याने ही वाळू कोळा गावातील देशमुख वस्तीवरील ओढ्यातून आणल्याचे सांगितले. तसेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जेसीबी व वाहनांच्या साह्याने वाळू उपसा होत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी देशमुखवस्ती, कोळा येथे धाड टाकली असता त्या ठिकाणी ट्रॅक्‍टर, टिपर, ट्रक व जेसीबीच्या साहाय्याने वाळू उपसा होत असल्याचे दिसून आले. त्या वेळी एक ट्रकचालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. 

हेही वाचा : "सातव्या वेतन'साठी "महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी' पाडणार शासनावर ई-मेलचा पाऊस ! 

या कारवाईत पोलिसांनी 44 लाख रुपये किमतीचे बिगर क्रमांकाचे दोन जेसीबी, 20 लाख रुपये किमतीचा एमएच 45 एडी 8488 या क्रमांकाचा जेसीबी, 14 लाख रुपये किमतीचे बिगर नंबरचे दोन ट्रॅक्‍टर, 18 लाख रुपये किमतीचा बिगर नंबरचा सहा चाकी टिपर, सात लाख रुपये किमतीचा एमएच 45 एफ 7213 या क्रमांकाचा ट्रॅक्‍टर, 18 लाख रुपये किमतीचा एमएच 10 बीआर 7791 या क्रमांकाचा सहाचाकी ट्रक, 18 लाख रुपये किमतीची एमएच 04 एच डी 5548 या क्रमांकाचा सहाचाकी ट्रक, 98 हजार रुपयांची 14 ब्रास वाळू असा एक कोटी 39 लाख 98 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. 

पोलिसांनी वाहनांचे चालक सिकंदर सुलेमान कुडची (रा. विनायकनगर, सांगली), राहुल शिवाजी चव्हाण (रा. करगणी, ता. आटपाडी), मच्छिंद्र ज्ञानू सांगोलकर (रा. तिप्पेहळ्ळी, ता. सांगोला), हणमंत गोविंद कुऱ्हाडे, (रा. विटा, ता. खानापूर, जि. सांगली), सुनील राम जाधव, ऋतिक रवींद्र देशमुख, लक्ष्मण तानाजी माने, गणेश हरी मोहिते (चौघेही रा. कोळा, ता. सांगोला) तसेच घटनास्थळी वॉचरचे काम करणारे अवधूत सुभाष केंगार व भारत किसन इमडे (दोघेही रा. कोळा, ता. सांगोला) यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी विशेष पथकातील पोलिस शिपाई लक्ष्मण हेमाडे यांनी या अकरा जणांविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

वाळू चोरीकडे प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष 
एकीकडे कोरोनाच्या महामारीच्या विळख्याने प्रशासन त्रस्त झाले असून, दुसरीकडे याचाच फायदा वाळू माफिया घेत आहेत. यामुळे वाळू चोरीचे तालुक्‍यात प्रमाणात वाढले आहे. या वाळू चोरांकडे प्रशासनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Kola Police cracked down on illegal sand dredgers and seized property