गोव्यातून लहान बाळ आणले पळवून; अकलूज येथे एकाला अटक 

Goa
Goa

श्रीपूर (सोलापूर) : गोव्यातून लहान बाळ पळवून आणलेल्या एका व्यक्तीला अकलूज पोलिसांनी अटक केली आहे. या बाळाला पंढरपूर येथील अनाथाश्रमात दाखल करण्यात आले आहे. तपासासाठी अकलूज पोलिसांनी गोवा पोलिसांशी संपर्क साधला आहे. हणमंत बाबूराव डोंबाळे (वय 65, रा. शेळगाव, ता. इंदापूर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

रविवारी (ता. 9) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमाराला चेतन ईश्वर सोलंके (रा. विजयनगर कॉलनी, अकलूज) यांचा अकलूज पोलिसांना फोन आला. अकलूज येथील बाजार समितीच्या व्यापारी संकुलासमोरील पत्राशेडमध्ये एक व्यक्ती लहान बाळासह थांबली आहे व त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत आहेत, अशी माहिती श्री. सोलंके यांनी पोलिस कॉन्स्टेबल संदेश रोकडे यांना दिली. ही माहिती मिळताच महिला पोलिस उपनिरीक्षक शिंदे, श्री. घाटगे, श्री. मोरे हे तातडीने घटनास्थळी पोचले. त्या ठिकाणी हणमंत डोंबाळे हा आढळला. त्याच्याकडे एक आठ-दहा महिन्यांचे लहान बाळ होते. 

पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, माझे व पत्नीचे भांडण झाले आहे. मी बाळाला घेऊन बाहेर पडलो आहे, असे त्याने सांगितले. त्याच्याकडे सासूरवाडीची चौकशी केली असता त्याने बारगावमळा, एकशिव (ता. माळशिरस) येथील त्याच्या मेव्हण्याचे नाव सांगितले. त्यानंतर पोलिसांनी एकशिवचे पोलिस पाटील, सरपंच व संबंधित व्यक्तीच्या मेव्हण्याकडे चौकशी केली. पोलिसांना त्यांच्याकडून अतिशय धक्कादायक माहिती मिळाली. ही व्यक्ती गेल्या सोळा वर्षांपासून घरीच आलेली नाही. तो त्याच्या पत्नीला सांभाळत नाही. त्याचा मुलगा अठरा वर्षांचा असून मुलीचे लग्न झाल्याचे समजले. त्यानंतर त्यास ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. त्याची कसून चौकशी करून त्यास पोलिसी खाक्‍या दाखविल्यानंतर हे बाळ मडगाव (गोवा) येथून उचलले असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित बाळाला पंढरपूर येथील अनाथाश्रमात दाखल केले असून, डोंबाळे यास न्यायालयात हजर करून गोवा पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com