esakal | इच्छुकांच्या मांदियाळीमुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक होणार चुरशीची अन्‌ रंगतदार !
sakal

बोलून बातमी शोधा

PDR_Mandiyali.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक मंगळवारी जाहीर झाली. त्यामुळे मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, कोण आमदार होणार? याची उत्सुकता वाढली आहे. 

इच्छुकांच्या मांदियाळीमुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक होणार चुरशीची अन्‌ रंगतदार !

sakal_logo
By
अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक मंगळवारी जाहीर झाली. त्यामुळे मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, कोण आमदार होणार? याची उत्सुकता वाढली आहे. आमदार (कै.) भारत भालके यांचे पुत्र, श्री विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके किंवा (कै.) भालके यांच्या पत्नी जयश्री भालके तसेच दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे हे प्रमुख उमेदवार असण्याची शक्‍यता आहे. दुसरीकडे, परिचारक गटाची भूमिका अजूनही गुलदस्तात आहे तर डीव्हीपी उद्योग समूहाचे प्रमुख अभिजित पाटील, शिवसेनेच्या शैला गोडसे हे देखील या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे पोटनिवडणूक चुरशीची आणि रंगतदार होणार, हे निश्‍चित आहे. 

पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघात सलग तीन वेळा (कै.) भारत भालके यांनी बाजी मारून हॅट्ट्रिक केली होती. त्यामुळे मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार झाली होती. आजारी असताना देखील ते शेवटपर्यंत कार्यरत होते. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेतेमंडळींनी त्यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या. तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्याची आग्रही मागणी केली. पक्ष निरीक्षकांनी घेतलेल्या बैठकीत देखील भगीरथ यांचेच एकमेव नाव पुढे आले. 

तथापि, निवडणुकीसाठी इच्छुक असलेले डीव्हीपी उद्योग समूहाचे अभिजित पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत जाऊन श्री. पवार यांची भेट घेतली होती. दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनीही आपल्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून उमेदवारी देण्याविषयी विचारणा होत असल्याचे वक्तव्य जाहीरपणे केले आहे. परंतु कोणत्याही पक्षाने अजून उमेदवारीची घोषणा केलेली नाही. 

राष्ट्रवादीमध्येच मतभेद 
(कै.) भारत भालके यांच्या निधनानंतर माजी आमदार (कै.) औदुंबरअण्णा पाटील यांचे नातू विठ्ठल कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी विठ्ठल कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी दावा केला होता. परंतु संचालक भगीरथ भालके यांचे नाव पुढे केल्याने भगीरथ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यानंतर आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर पंढरपूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. युवराज पाटील यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी भगीरथ भालके यांच्या नावाला जाहीर विरोध केला आहे. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्ष निवडीवरून देखील धुसफूस सुरू आहे. अशा परिस्थितीत भगीरथ भालके यांच्याऐवजी जयश्री भारत भालके यांच्या नावाचा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्राधान्याने विचार होण्याची शक्‍यता आहे. तथापि, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अद्याप कोणालाही उमेदवारीचे संकेत देण्यात आलेले नाहीत. 

परिचारक गटाची भूमिका गुलदस्तात 
राजकीय हालचालींना वेग आलेला असताना परिचारक गटाची भूमिका अजूनही गुलदस्तातच आहे. आमदार प्रशांत परिचारक यांची विधान परिषदेची मुदत आणखी साधारण एक वर्ष आहे. त्यामुळे युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक अथवा युवा नेते प्रणव परिचारक यांना रिंगणात उतरवावे, असा सूर कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. परंतु, आमदार प्रशांत परिचारक यांनी अजून नेमकी भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे या वेळी परिचारक कुटुंबातील कोणीही निवडणूक लढवणार, की भाजप जो उमेदवार देईल, त्याच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली जाणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. 

भाजपकडून चाचपणी सुरू 
भाजपकडून कोणाला उमेदवारी द्यायची, याविषयी चाचपणी सुरू आहे. (कै.) भालके यांच्या निधनानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर दौऱ्यावर आलेले असताना खास सरकोली येथे येऊन भालके कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. बांधकाम ठेकेदार म्हणून समाधान आवताडे हे देखील भाजप नेत्यांच्या परिचयाचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी नाकारलेल्या या दोघांपैकी एकाला भाजपकडून उमेदवारी देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसला शह दिला जाऊ शकतो. 

अनेक इच्छुकांमुळे निवडणूक रंगणार 
शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे या देखील शिवसेनेकडून इच्छुक आहेत. शेतकरी संघटनेनेही निवडणुकीत उडी घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीने देखील उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे. त्यासाठी ऍड. प्रकाश आंबेडकर हे 21 मार्च रोजी पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे निवडणूक कमालीची चुरशीची आणि रंगतदार होणार हे निश्‍चित. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल