सून नको आम्हाला पैसे दे मला...सासरच्यांकडून विवाहितेचा छळ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

  • विवाहितेच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे मंगळसूत्र काढून घेतले 
  • सोन्याची चैन मोडूनही वारंवार पैशासाठी विवाहितेचा छळ 
  • नोकरी अन्‌ कर्ज फेडीच्या पैशांसाठी मारहाण : प्लॅट, फर्निचरसाठी मागितले पैसे 
  • कुकरच्या झाकणाने व काचेच्या बाटलीने पती, सासू, सासरे दिरांकडून मारहाण 

सोलापूर : प्लॅट घेण्यासाठी, नोकरीसाठी, मुल होण्याचे उपचार घेण्यासाठी, सासूचे उपचार घेण्यासाठी पैशांची मागणी करीत पती, सासू, सासरे, दिर या सर्वांनी विवाहितेला मारहाण करुन घराबाहेर हाकलल्याने गुरुवारी (ता. 23) रात्री 10 च्या सुमारास विवाहितेने सदर बझार पोलिस ठाणे गाठले. ही घटना सोलापुरातील मोदीखाना येथील लोखंडवाला अपार्टमेंटमध्ये घडली. विवाहितेच्या फिर्यादीनुसार पती अक्षय अजय बजरंगी, सासू मनिषा, दिर समित, सासरे अजय (रा. एतिराज हॉटेलजवळ, मश्‍जिदच्या मागे, सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही आवश्‍य वाचा : महाराष्ट्र बंद : सोलापुरातील महापालिका परिवहन बससेवा कोलमडली 

शहरात स्वत:चे घर घेण्यासाठी पैसे आण, पतीला नोकरी लावायची असून पैसे लागणार आहेत, घरात फर्निचर घ्यायचे आहे असे म्हणत सासरच्यांनी विवाहितेला पैशाची मागणी केली. त्यासाठी विवाहितेने गळ्यातील सोन्याची चैन मोडून पैसे दिले. तरीही सासूचे कर्ज फेडायचे आहे, मुल होत नसल्याने दवाखान्यात उपचार घ्यायचे आहेत, त्यासाठीही पैशांची मागणी करीत सासू, सासरे, दिराने छळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सासरचा जाच कमी व्हावा म्हणून विवाहितेने वारंवार पैशांची जुळवाजुळव केली. तरीही शिवीगाळ, मारहाण सुरुच होती. कुकरच्या झाकणाने व काचेच्या बाटलीनेही सासरच्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. पैसे देऊ न शकल्याने गळ्यातील मंगळसूत्र काढून घराबाहेर हाकलल्याचे विवाहितेने पोलिसांना सांगितले. त्यानुसार सासू, सासरे, पती व दिराविरुध्द कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

हेही आवश्‍य वाचा : सोलापुरातील 'हे' विमानतळ डिसेंबर 2020 पर्यंत सुरु होणार ! 

 

उधारी का मागितली म्हणून दुकानदारालाच बदडले 
सोलापूर : दुकानात बाजार आणायला गेलेल्या ग्राहकाला अगोदरची उधारी कधी देणार, अशी विचारणा दुकानदार गणेश उर्फ हेमंत लक्ष्मण गायकवाड (रा. शहा नगर हौसिंग सोसायटी, जुना वांगी रोड) यांनी केली. त्यावेळी विवेक नारायण जाधव हा दुकानदाराशी किरकोळ वाद घालून निघून गेला. थोड्यावेळाने तो दोघांना सोबत घेऊन आला. पाठिमागील पैसे देणार नाही असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर हातातील हॉकी स्टिकने, लोखंडी रॉड व लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करुन जखमी केले, अशी फिर्याद गणेश गायकवाड यांनी सलगर वस्ती पोलिसांत दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नारायण जाधव, युवराज नारायण जाधव, विवेक नारायण जाधव (रा. सेटलमेंट रि. कॉलनी) यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. 

हेही आवश्‍य वाचाच : बाबासाहेबांच्या आठवणी आज झाल्या ताज्या 

बंद कारखान्यातून 29 हजारांचे लोखंडी साहित्य लंपास 
सोलापुरातील गांधीनगर येथील चिलवेरी टेक्‍सटाईल कारखाना मागील काही दिवसांपासून बंद असून त्याठिकाणी वॉचमन नाही. कारखाना बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने लुमबीम, बीमचे लोखंडी ड्रम, लुमचे लोखंडी रस्ती व्हिलचे 25 नग असा 29 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी बालकिसन बालाप्पा चिलवेरी (रा. भद्रावती पेठ) यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे. दुसरीकडे आसार मैदानातील गेटजवळील विहिरीतून विद्युत मोटारीचे 45 फूट केबल अज्ञात चोरट्याने लांबविल्याची फिर्याद रविंद्रकुमार कालिदास भक्‍त यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली आहे. किल्ला बगिचाला पाणी देण्यासाठी विहिरीत मोटार टाकण्यात आली असून त्या मोटारीचे ते केबल असल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Married torture by father-in-law