आमदार भारत भालके अनंतात विलीन ; 'भारत नाना अमर रहे' घोषणांनी झाले अंत्यसंस्कार 

Bhart Bhalke.jpeg
Bhart Bhalke.jpeg

पंढरपूर (सोलापूर) ः सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणाऱ्या आमदार भारत भालके यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकूल वातावरणात सायंकाळी सरकोली येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नेतेमंडळींच्यासह पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्‍याबरोबरच जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो लोकांनी साश्रुपूर्ण नयनांनी कै. भालके यांना अखेरचा निरोप दिला. पंढरपुरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून लोकप्रिय नेत्याला आदरांजली व्यक्त केली. 

(कै.) भालके यांचे पार्थिव दुपारी सरकोली गावात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होता. पोलिस सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन करत होते. मास्क, पंचे, रुमाल बांधून आलेले कार्यकर्ते लाडक्‍या नेत्याचे अंतिम दर्शन घेता यावे यासाठी प्रयत्न करत होते. सायंकाळी पाच च्या सुमारास सरकोली येथे (कै.) भालके यांच्या पार्थिवावर भारत नाना अमर रहे अशा घोषणा देत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार प्रशांत परिचारक, आमदार संजय शिंदे, आमदार यशवंत माने, आमदार प्रणिती शिंदे, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार गणपतराव देशमुख, माजी आमदार दीपक साळुंखे, माजी आमदार नारायण आबा पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. यापैकी बोलताना प्रमुख मान्यवरांनी कै. भालके यांना श्रद्धांजली वाहिली. कै. भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे असे आवाहन यावेळी काही जणांनी बोलताना केले. 
पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. त्यानंतर कै. भालके यांचे पुत्र, युवानेते श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक भगीरथ भालके यांच्या हस्ते पार्थिवास भडाग्नी देण्यात आला. उपस्थित हजारो लोकांनी साश्रुपूर्ण नयनांनी कै. भालके यांना अखेरचा निरोप दिला. 
तत्पूर्वी (कै.) भालके यांचे पार्थिव घेऊन पुण्याहून आलेली शववाहिका दुपारी 11 च्या सुमारास पंढरपुरात आली. त्या आधीच शहरात रस्त्यावर ठिकठिकाणी (कै.) भालके यांच्या विषयी आदरांजली व्यक्त करणारे फलक लावण्यात आले होते. 
आमदार भालके यांचे पुत्र भगिरथ भालके, पुतणे व्यंकटराव भालके हे शववाहिकेच्या पुढील गाडीत होते. रस्त्याच्या दुर्तफा अंत्यदशर्नासाठी महिला पुरुषांसह अबालवृद्ध नागरिक शेकडोंच्या संख्येने थांबले होते. 
या लोकांना पाहून भगिरथ भालके, व्यंकटराव भालके यांना देखील शोक अनावर होत होता. एक वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकीत सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्यानंतर आमदार भारत भालके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले होते. त्याच शिवतीर्थावर आमदार भालके यांचे पार्थिव काही वेळ ठेवण्यात आले. त्यावेळी शोकमग्न झालेल्या उपस्थितांना आवरणे मुश्‍कील झाले होते. शेकडो कार्यकर्ते शववाहिकेच्या पुढे चालत भारत नाना अमर रहे अशा घोषणा देत होते. त्याच वेळी रिमझम पाऊस सुरु झाला. श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिराला वळसा घालून महाव्दारातून श्री कालिकादेवी मंदिरापासून पार्थिव मंगळवेढ्याकडे रवाना झाले. मंगळवेढा येथे हजारो लोकांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर कै. भालके यांचे पार्थिव सरकोली गावात आणण्यात आले.समाज माध्यमांवर देखील आज दिवसभर आमदार श्री. भालके यांच्या विषयी शेकडो लोकांनी आपआपल्या भावना व्यक्त करून आदरांजली व्यक्त केली. 

प्रशांत परिचारक यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आमदार भारत भालके यांचा जनतेसोबतचा प्रवास आज थांबला. सहकार आणि जनसेवेतील एका पांतस्थाचा अंत झाला.त्यांच्या मृतात्म्यास आपण व्यक्तिगत तसेच आपल्या परिचारक व पांडुरंग परिवाराकडून आदरांजली अर्पण करतो. तसेच भालके कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना या दुःखातून सावरण्याची ताकद श्री विठ्ठल रुक्‍मिणी देवोत हीच प्रार्थना. 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीयेत सांगितले की, आमदार भारत भालके यांच्या निधनाने एक उमदा नेता अचानक आपल्यातून निघून गेला आहे. गरिबांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न ते अतिशय हिरीरीने मांडत असत.माझी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली. त्यांचे कुटुंबिय आणि आप्तांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. 

पंढरपूरला एकापाठोपाठ धक्के--- 

कोरोना संसर्गाच्या काळात पंढरपूरचे कधीही न भरुन येणारे नुकसान झाले आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष संजय वाईकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राजूबापू पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील त्यांचे चुलते डॉ.अनंतराव पाटील व बंधू महेश पाटील या दोन व्यक्ती, ज्येष्ठ नेते आणि सहकारातील ऋषितुल्य नेते सुधाकरपंत परिचारक, भागवताचार्य वा.ना.उत्पात, वारकरी संप्रदायातील प्रसिध्द किर्तनकार रामदास महाराज जाधव (कैकाडी) अशा राजकीय आणि धार्मीक क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्तीचे अवघ्या काही दिवसात निधन झाले. त्यामुळे पंढरपूरला एकापाठोपाठ दुःखाचे अनेक धक्के बसले आहेत. या मातब्बर लोकांच्या निधनामुळे पंढरपूरचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.  
 

संपादन ः ्प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com