धक्कादायक ! ग्राहक सेवा केंद्रातून दहा लाखांचा अपहार; संचालक, सहसंचालकाविरुद्ध गुन्हा

हुकूम मुलाणी 
Thursday, 3 September 2020

संजीवनी विकास फाउंडेशन यांच्या वतीने मंगळवेढा येथे भारतीय स्टेट बॅंकेचे ग्राहक सेवा केंद्र चालविण्यात येत असून, या केंद्राचे संचालक बाळासाहेब शिवाजी कोळेकर (रा. खुपसंगी), सहसंचालक सतीश औदुंबर भगरे (रा. मंगळवेढा) यांनी 1 मे 2019 ते 18 जानेवारी 2020 या कालावधीत 68 बॅंक खातेदारांच्या खात्यांतून परस्पर 10 लाख 19 हजार 998 रुपये काढून ग्राहकांची व कंपनीची फसवणूक केली. 

मंगळवेढा (सोलापूर) : शहरातील भारतीय स्टेट बॅंकेच्या ग्राहक सेवा केंद्रातून खातेदाराच्या खात्यावरील 10 लाख 19 हजार 998 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी ग्राहक सेवा केंद्राचे संचालक व सहसंचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जिल्हा समन्वयक सरताज सलीम गोंडी (वय 25, रा. सिद्धेवाडी हल्ली, मुक्काम दत्तू गल्ली, मंगळवेढा) यांनी फिर्याद दिली आहे. 

हेही वाचा : कोळा परिसरातील वाळू माफियांवर पोलिसांची मोठी कारवाई ! 1.40 कोटींचा मुद्देमाल जप्त 

संजीवनी विकास फाउंडेशन यांच्या वतीने मंगळवेढा येथे भारतीय स्टेट बॅंकेचे ग्राहक सेवा केंद्र चालविण्यात येत असून, या केंद्राचे संचालक बाळासाहेब शिवाजी कोळेकर (रा. खुपसंगी), सहसंचालक सतीश औदुंबर भगरे (रा. मंगळवेढा) यांनी 1 मे 2019 ते 18 जानेवारी 2020 या कालावधीत 68 बॅंक खातेदारांच्या खात्यांतून परस्पर 10 लाख 19 हजार 998 रुपये काढून ग्राहकांची व कंपनीची फसवणूक केली. या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. हे ग्राहक सेवा केंद्र जानेवारीमध्ये बॅंक खातेदारांच्या तक्रारीवरून बंद करण्यात आले. 

हेही वाचा : बापरे ! "आयटीआय'च्या दीड लाख जागांसाठी तब्बल 24 लाखांहून अधिक अर्ज ! 

खातेदारांना आपल्या खात्यातील रक्कम कमी झाल्याचा संशय आल्यानंतर खातेदारांनी भारतीय स्टेट बॅंकेच्या शाखाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मंगळवेढा येथील भारतीय स्टेट बॅंकेने या प्रकरणी हात वर करत, आपला काही संबंध नसून यासाठी बॅंकेने कंपनी नियुक्ती केली आहे. कंपनीकडे तक्रार करण्याचा सल्ला दिल्यानंतर अखेरीस कंपनीने या संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे पत्र दिल्यानंतर सरताज गवंडी यांनी गुन्हा दाखल केला. शहरातील राष्ट्रीयीकृत बॅंकांमधून पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर खातेदारांना समाधानकारक वागणूक मिळत नसून, पैसे काढताना त्यांना थेट ग्राहक सेवा केंद्रातून पैसे काढण्याचा सल्ला दिला जातो. अशा वेळी ग्राहक सेवा केंद्रातून फसवणूक झाली की बॅंक हात वर करत असल्यामुळे एकूणच, राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या कारभाराबद्दल बॅंक खातेदारांतून नाराजी व्यक्त होत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mutual amount withdrawn from the account holder's account by the director from the customer service center