मर्दानी महाराष्ट्राची गौरव सोहळ्यातून कोरोना लढवय्यांना राष्ट्रवादीचे पाठबळ 

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 21 जून 2020

मार्डी येथे मर्दानी महाराष्ट्राची गौरव सोहळा या उपक्रमांतर्गत कोरोनामध्ये कामगिरी बजावणारे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, पोलिस, अंगणवाडी सेविका, सामाजिक कार्यकर्ते, आशा स्वयंसेविका, सफाई कामगार यांचा सत्कार बळीरामकाका साठे यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद अध्यक्षस्थानी होते.

वडाळा(सोलापूर)ः कोरोनामुळे सारे जग धास्तावले असून प्रत्येकजण जीव मुठीत धरुन मार्गक्रमण करीत आहे. या स्थितीत डॉक्‍टर,आरोग्य कर्मचारी,पोलिस,अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, सफाई कामगार हे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा करीत आहेत.  त्यांना हे कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे ही भुमीका राष्ट्रवादीने घेतली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून मर्दानी महाराष्ट्राची गौरव सोहळा हा उपक्रम राज्यभर सुरु असल्याचे अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांनी दिली. 

हेही वाचाः या आमदारांनी ग्रामीण रुग्णालयांना केले 50 लाखाचे साहित्य केले वितरीत 

मार्डी येथे मर्दानी महाराष्ट्राची गौरव सोहळा या उपक्रमांतर्गत कोरोनामध्ये कामगिरी बजावणारे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, पोलिस, अंगणवाडी सेविका, सामाजिक कार्यकर्ते, आशा स्वयंसेविका, सफाई कामगार यांचा सत्कार बळीरामकाका साठे यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद अध्यक्षस्थानी होते. मार्डीचे सरपंच अविनाश मार्तंडे, माजी जि.प.सदस्या ज्योतीताई मार्तंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर मंगेडकर, वडाळा ग्रामपंचायत सदस्य मनोज साठे, ग्रामविकास अधिकारी प्रवीण विभुते यावेळी उपस्थित होते. 

हेही वाचाः कोरोनामुळे शाळांच्या बदलत्या वातावरणात मुले स्वकेंद्री होण्यची भीती 

मार्डी ग्रामपंचायतीच्या वतीने आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांच्या बॅंक खात्यावर प्रोत्साहन अनुदान म्हणून प्रत्येकी एक हजार रुपये जमा केल्याचे पत्र, सॅनिटायझर व मास्कचे वाटप सरपंच अविनाश मार्तंडे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने आशा स्वयंसेविकांना यावेळी थर्मल स्कॅनर व कीटचे वाटप करण्यात आले. तुटपुंजे मानधन असताना देखील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कर्मचारी प्रामाणिकपणे काम करीत असल्याबद्दल तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद यांनी त्यांचे कौतुक केले. चंद्रकांत शिंदे यांनी सुत्रसंचालन तर लक्ष्मण अडसूळ यांनी आभार मानले. 

राष्ट्रवादीचे पाठबळ 
कोरोना लढवय्यांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. त्यासाठी राज्यभर हे अभियान सुरु आहे. 
- बळीरामकाका साठे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ncp supporting corona warriours by special activity