भविष्यातील रोजगाराच्या संधींमुळे "आयटीआय' प्रवेशासाठी जागांच्या दुप्पट अर्ज !

दिनेश देशमुख 
Friday, 4 September 2020

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश सत्र ऑगस्ट 2020 साठी प्रवेश प्रक्रिया 1 ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे. केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होत असलेल्या प्रवेश प्रक्रियेत महाराष्ट्रातून आयटीआयतील एक लाख 45 हजार 968 उपलब्ध जागांसाठी दुपटीपेक्षा जास्त तीन लाख 26 हजार 173 उमेदवारांच्या प्रवेश अर्जांची नोंदणी झाली आहे. 

बोंडले (सोलापूर) : कोरोना विषाणूचा प्रसार संसर्गामुळे वाढत असताना, त्याची साखळी तोडण्याच्या हेतूने देशात लावण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये उद्योग क्षेत्रातील चक्र थांबवले गेले. परिणामी यातील बऱ्याचशा युवकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली. तरीही हा काळ मर्यादित असल्याने भविष्यातील उद्योग क्षेत्रात निर्माण होणाऱ्या नोकऱ्या, रोजगार व स्वयंरोजगारातील संधी यामुळे यंदा कोरोनातसुद्धा विद्यार्थ्यांचा ओद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रवेशाकडे वाढता कल असल्याचे प्रवेशास आलेल्या अर्जावरून दिसून येत आहे. 

हेही वाचा : मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी कुटुंबीयांसह केली कोरोनावर मात 

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश सत्र ऑगस्ट 2020 साठी प्रवेश प्रक्रिया 1 ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे. केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होत असलेल्या प्रवेश प्रक्रियेत उमेदवारांना प्रवेश अर्ज करणे, व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे, प्रवेश शुल्क भरणे याकरिता 31 ऑगस्ट 2020 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातून आयटीआयतील एक लाख 45 हजार 968 उपलब्ध जागांसाठी दुपटीपेक्षा जास्त तीन लाख 26 हजार 173 उमेदवारांच्या प्रवेश अर्जांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी दोन लाख 89 हजार 954 उमेदवारांनी प्रवेश शुल्क जमा केले आहे तर दोन लाख 78 हजार 248 उमेदवारांनी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्यक्रम सादर केले आहेत. 

हेही वाचा : टेंभुर्णी उपजिल्हा रुग्णालय निर्मितीसाठी उपमुख्यमंत्री पवार सकारात्मक : आमदार बबनराव शिंदे 

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या प्रवेश वेळापत्रकानुसार 5 सप्टेंबरच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. तर 9 सप्टेंबरच्या सकाळी नऊपासून पहिल्या प्रवेश फेरीस सुरवात होणार आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील तालुकानिहाय शासकीय व खासगी आयटीआयमधील उपलब्ध जागा व प्रवेशासाठी व्यवसाय व संस्थानिहाय प्राधान्यक्रम सादर केलेल्या उमेदवारांची संख्या : उत्तर सोलापूर 2024-28932, दक्षिण सोलापूर 152-2410, माळशिरस 688-4391, अक्कलकोट 180-2640, पंढरपूर 588-8279, बार्शी 704-9646, करमाळा 124-2244, माढा 212-1893, सांगोला 80-479, मंगळवेढा 376-3974, मोहोळ 152-2410. 

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्याचे संचालक दीपेंद्रसिंह कुशवाह म्हणाले, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने राज्यातील शासकीय व खासगी आयटीआयमधील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रवेश इच्छुक उमेदवारांना प्रवेश अर्ज भरणे, प्रवेश शुल्क भरणे, प्रवेश अर्ज निश्‍चित करणे ही सर्व प्रक्रिया उमेदवारांना या वर्षी ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली होती. यासाठी उमेदवारांना आयटीआयवर जावे लागले नाही. यामुळे सुलभ प्रवेश प्रक्रियेमुळे निश्‍चितच प्रवेश अर्जांची संख्या वाढली आहे. तसेच यापुढीलही प्रवेश प्रक्रिया सोपी करण्याचा मानस आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of applications for ITI admission has doubled