"या' शहर-तालुक्‍यातील कोरोनाबाधित संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करा; कोणी व का दिले आदेश? वाचा 

Swab Tasting
Swab Tasting
Updated on

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर शहरासह तालुक्‍यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये वाढ करावी तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना तत्काळ संस्थात्मक क्वारंटाईन करून त्यांची कोरोना चाचणी घ्यावी, अशा सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या. 

पंढरपूर तालुक्‍यात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत नवीन भक्त निवास येथे बैठक घेण्यात आली. बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. जयश्री ढवळे, उपकार्यकारी अभियंता हनुमंत बागल, न. पा. चे उपमुख्य अधिकारी सुनील वाळूजकर, डॉ. सरोदे आदी उपस्थित होते. 

श्री. ढोले म्हणाले, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपर्कातील व्यक्तींना तत्काळ संस्थात्मक विलगीकरण करावे. संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी वॉर्डस्तरीय व ग्रामस्तरीय समिती तसेच पोलिस प्रशासनाने समन्वयाने काम करावे. यामध्ये नवीन रुग्णांची भर पडणार नाही याची दक्षता घ्यावी. नगरपालिकेने शहरातील मठांचे तसेच शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायतीने मठांचे, शाळांचे अधिग्रहण करण्याबाबत नियोजन करावे. ताब्यात घेतलेल्या मठांचे व शाळांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सनियंत्रण समितीची स्थापना करावी. क्वारंटाईन केंद्रावर उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना जेवणाचा तसेच तेथे आवश्‍यक असणाऱ्या साहित्याचा पुरवठा बांधकाम विभागाने करावा. आरोग्य विभागाने आरोग्य कर्मचारी यांना आवश्‍यक ते प्रशिक्षण द्यावे. रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या इतर आजारांच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी. कोरोनाची रुग्णसंख्या वाढू नये यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करावी, असेही श्री. ढोले यांनी सांगितले. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशानाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे. अलगीकरणातील व्यक्ती बाहेर फिरताना तसेच अनावश्‍यक गर्दी करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी सांगितले. 

या वेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती गटविकास अधिकारी रविकिरण घोडके व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली. कोरोनाबाधित रुग्ण, कोरोनामुक्त झालेले रुग्ण तसेच कोरोना संसर्ग विषयक सद्य:स्थिती, आरोग्य सुविधा आणि उपलब्ध सामग्रीबाबत माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले व उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. जयश्री ढवळे यांनी दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com