आरे बापरे... कोरोना रुग्णास बिलासाठी ठेवला डांबून

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 June 2020

त्यांना कुंभारी येथील अश्‍विनी रुग्णालयात पाठवले. तेथे उपचार घेतल्यानंतर ते बरे होऊन त्यांचा कोरोना अहवाल बाधित नसल्याचा आला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना ते घरी परतण्याची ओढ निर्माण झाली. 

करकंब (सोलापूर) : बार्डी (ता. पंढरपूर) येथील कोरोनाबाधित रुग्णास उपचारानंतर घरी सोडणे आवश्‍यक असताना कुंभारी येथील अश्‍विनी रुग्णालयाने 32 हजार 800 रुपये बिल भरण्याची मागणी करत डिस्चार्ज देणे नाकारले आहे. अहवाल बाधित नसल्याचा येऊनही मागील दोन दिवसांपासून बिलाची मागणी करत रुग्णास डांबून ठेवल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

तीव्र नाराजी व्यक्त 
याबाबत मनसेचे राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी प्रांताधिकारी सचिन ढोले, आमदार भारत भालके, सोलापुरातील आरोग्य अधिकारी श्री. पांडे, पंढरपूरच्या तहसीलदार वैशाली वाघमारे आदींना सदर घटनेची माहिती देऊन तीव्र नाराजी व्यक्त करत रुग्णास ताबडतोब मुक्त करण्याची विनंती केली. 

हेही वाचा : सोलापूर जिल्ह्यात आज सुरू झाली मद्य विक्रीची 157 दुकाने 

आला नेगेटिव्ह अहवाल 
बार्डी (ता. पंढरपूर) येथील सज्जन खंदारे संस्थात्मक विलिगीकरणात असताना 1 जूनला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आला होता. त्यानंतर तातडीने त्यांना पुढील उपचारासाठी करकंब ग्रामीण रुग्णालयामार्फत सोलापूर येथे पाठविले. तेथून त्यांना कुंभारी येथील अश्‍विनी रुग्णालयात पाठवले. तेथे उपचार घेतल्यानंतर ते बरे होऊन त्यांचा कोरोना अहवाल बाधित नसल्याचा आला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना ते घरी परतण्याची ओढ निर्माण झाली. 

सुटका करण्याची केली विनंती 
रुग्णालयाने कोरोना उपचाराचे 32 हजार 800 रुपये भरा, मग रुग्णास घरी सोडू, असे सांगितल्याने त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. मजुरी करून उपजिविका करणाऱ्या या कुटुंबाला एवढी रक्कम भरणे शक्‍य तर नव्हतेच; पण कोरोनाग्रस्त रुग्णांवर शासन मोफत उपचार करत असताना पैशाची मागणी केल्याने त्यांनी मनसेचे राज्य सरचिटणिस दिलीप धोत्रे यांच्याकडे धाव घेतली. श्री. धोत्रे यांनी तातडीने संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदर रुग्णाची तातडीने सुटका करण्याची विनंती केली आहे. 

हेही वाचा : बापरे..! चित्रपटगृहचालक करताहेत एक्‍झिट पॉलिसीची मागणी

प्रतिसाद मिळाला नाही 
अश्‍विनी ग्रामीण रुग्णालयच्या अधिष्ठता डॉ. माधवी रायते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. 

रक्कम भरू नका म्हणून सांगितले 
बार्डी येथील कोरोनाग्रस्त रुग्णाकडे कुंभारीच्या अश्‍विनी ग्रामीण रुग्णालयाने पैशाची मागणी केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्यांना रक्कम भरू नका म्हणून सांगितले आहे. शिवाय सोलापूर आणि पंढरपुरातील प्रशासनाला याबाबत कल्पना दिली आहे. शासनाकडून जमा होणारी रक्कम संबंधित रुग्णालयास प्राप्त न झाल्याने हा प्रश्‍न निर्माण झाला असून एक-दोन दिवसांत सदर रुग्णास घरी सोडतील. 
- डॉ. तुषार सरवदे, 
वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, करकंब
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The patient was kept for the bill