"सहा लाख द्या, कृषी खात्यात नोकरीला लावतो..!' "या' माजी सरपंचाचे कुटुंबीय फसले

वसंत कांबळे 
Thursday, 3 September 2020

मोहन कुलकर्णी याने दोन वर्षांपूर्वी "महाराष्ट्रात माझ्या विविध सरकारी खात्यांत चांगल्या ओळखी आहेत' असे शिवाजी भोंग व संध्या पाठक यांना सांगितले. तसेच कोणाला नोकरी लावायची असेल तर सांगा, असे सांगून विश्वास संपादन केला. त्याच्या या आमिषेला बळी पडून लऊळ गावच्या माजी सरपंचाचा मुलगा, पुतण्या व अन्य एकाची सहा लाखांची फसवणूक केली. 

कुर्डू (सोलापूर) : कृषी खात्यात नोकरीला लावतो म्हणून लऊळ (ता.) माढा येथील माजी सरपंच शिवाजी भोंग यांचा मुलगा, पुतण्या व अन्य एक अशा तिघांकडून सहा लाख रुपये उकळणाऱ्याला पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. माजी सरपंचाच्या कुटुंबीयांचीच फसवणूक झाल्याने गावात चर्चेचा विषय ठरला आहे. 

हेही वाचा : कट्ट्यावर बसून गप्पा मारल्याने काय होतंय? "या' गावाला मोजावी लागली भली मोठी किंमत 

मोहन दामोदर कुलकर्णी (वय 50, मूळ रा. मांजरी रोड, गणेश मंदिराजवळ, मांजरी बु., पुणे व सध्या प्लॉट नं. चार, डीआय, राजयोग सोसायटी, वडगाव खुर्द, धायरी, पुणे) याने सहा लाख रुपये घेऊनही नोकरी लावली नाही व घेतलेल्या पैशापोटी दिलेला धनादेश न वटल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, या घटनेची फिर्याद माजी सरपंच शिवाजी भोंग यांनी कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात दिली आहे. कुलकर्णी यास मोठ्या शिताफीने कुर्डुवाडी येथे बोलावून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

हेही वाचा : अवैध धंद्यात भागीदारी! पोलिस आयुक्तांनी "या' चार पोलिसांना केले बडतर्फ 

याबाबत अधिक माहिती, अशी की मोहन कुलकर्णी याने दोन वर्षांपूर्वी "महाराष्ट्रात माझ्या विविध सरकारी खात्यांत चांगल्या ओळखी आहेत' असे शिवाजी भोंग व संध्या पाठक यांना सांगितले. तसेच कोणाला नोकरी लावायची असेल तर सांगा, असे सांगून विश्वास संपादन केला. त्याच्या या आमिषेला बळी पडून ज्ञानेश्वर शिवाजी भोंग याला नोकरीला लावण्यासाठी ज्ञानेश्‍वरची आई संगीता व शेजारी राहणाऱ्या संध्या पाठक यांच्यासमक्ष कुलकर्णीकडे रोख तीन लाख व 5 ऑक्‍टोबर 2018 रोजी दोघाजणांच्या बॅंक खात्यातून कुलकर्णी यास 99 हजार 999 रुपये कुलकर्णीच्या खात्यावर पाठवण्यात आले. 

कुलकर्णी याने शिवाजी भोंग यांचे चार लाख व असेच नोकरीला लावतो म्हणून संध्या पाठक व मोहन रामदास भोंग यांच्याकडून प्रत्येकी एक लाख घेऊन, तीन महिन्यांत नोकरीला लावतो असं सांगितलं. नाही लावल्यास तुमचे पैसे परत करतो, असेही म्हणाला होता. नोकरीच्या चौकशीसंदर्भात फोन लावला असता मात्र उडवाउडवीची उत्तरे देऊन, आता सर्व जागा भरल्या आहेत. क्‍लार्कच्या जागा निघाल्या की सांगतो, असं सतत चुकीचे सांगून वेळ मारून नेत होता. 

नोकरीला न लावल्याने कुलकर्णी याने पैशापोटी बॅंक ऑफ बडोदा, माणिकबाग शाखा पुणे या बॅंकेचा 19 मार्च 2020 रोजीचा चेक दिला. तो लऊळ येथील बॅंक ऑफ इंडियात क्‍लिअरिंगसाठी भरला असता अपुऱ्या पैशाअभावी परत आल्याने कुलकर्णी याने फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यास शिताफीने कुर्डुवाडी येथे बोलावून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार धनाजी माळी हे करत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A person cheated Rs 6 lakh by showing the lure of a job