कोरोनामुक्त तीन डॉक्‍टरांच्या प्लाझ्मा दानाने सोलापूरात प्लाझ्मा उपचारास होणार सुरवात 

plasma donation.jpg
plasma donation.jpg

सोलापूरः शहरामध्ये कोरोना उपचारासाठी आता प्लाझ्मा दानास परवानगी आश्‍विनी हॉस्पिटल कुंभारी या वैद्यकीय संस्थेला मिळाली आहे. शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना प्लाझ्मा उपचार देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. प्लाझ्मा दानाची परवानगी मिळाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोरोनामुक्त झालेल्या तीन डॉक्‍टरांनी प्लाझ्मा दान केले. 

कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा उपचार करून या रुग्णांना या माध्यमातून कृत्रिम प्रतिकारक्षमता मिळवता येईल या दृष्टीने वैदकीय क्षेत्रात प्लाझ्मा थेरपी महत्वाची मानली जात होती. कोरोना आजारातून मुक्त झाल्यानंतर या व्यक्तीच्या शरिरातील रक्तामध्ये कोरोना आजाराच्य विरोधात लढण्यासाठी निर्माण झालेल्या आयजीजी (IgG) अँटीबॉडीजचा उपयोग रुग्णांना केल्यास त्यांना या माध्यमातून कृत्रीम प्रतिकारक्षमता (आर्टीफिशीअल इम्युनिटी) आजाराची तिव्रता कमी होऊ शकते. पुणे व मुंबईत हे प्रयोग आधीपासून सुरू झाले आहेत. 
मागील काही दिवसापासून आश्‍विनी हॉस्पिटल कुंभारी या संस्थेने प्लाझ्मा दानाच्या संदर्भात हवी असलेली परवानगी शासनाच्या फुड अँड ड्रग्ज विभागाकडे मागितली होती. या विभागाने हॉस्पिटलला त्या बाबतची परवानगी दिली आहे. 

त्यानुसार शहरात प्रथमच आज प्लाझ्मा दानाची सुरुवात झाली आहे. परवानगी मिळाल्याचे समजताच आश्‍विनी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निर्मलकुमार तापडीया, डॉ. मनोज मुंढे व डॉ. करण चावला या कोरोनामुक्त झालेल्या डॉक्‍टरांनी त्यांचे प्लाझ्मादान आज आश्‍विनी हॉस्पिटलच्या रक्तपेढीत जाऊन केले. त्यामुळे प्लाझ्मा दान करणारे हे पहिले तीन दाते ठरले आहेत. मागील काही दिवसापासून शहर व जिल्ह्यातील कोरोना स्थिती हाताबाहेर गेली असताना प्लाझ्मा उपचाराचा हा प्रयोग वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. 
प्लाझ्मा दानाच्या बाबत आश्‍विनी हॉस्पिटलच्या रक्तपेढीच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा संगमेश्‍वर काडादी यांनी सांगितले की, आज प्लाझ्मा दानास सुरुवात झाली आहे. तीन कोरोनामुक्त ड़ॉक्‍टरांनी आज प्लाझ्मा दान करून त्याची सुरुवात केली आहे. आता आवश्‍यकते नुसार वैद्यकीय अधिकारी कोरोना उपचारात या प्लाझ्माचा उपयोग करु शकणार आहेत. 

प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग महत्वाचा 
वैद्यकीय अधिकारी डॉ. निर्मलकुमार तापडीया यांनी सांगितले की, दात्यांनी दिलेला प्लाझ्मा हा ज्या कोरोना रुग्णांच्या स्थितीनुसार उपचारसाठी वापरला जाऊ लागतो. त्यास प्लाझ्मा थेरपी असे म्हंटले जाते. ज्या कोरोना रुग्णांची प्रतिकारक्षमता कमी व संसर्ग अधिक तिव्र आहे त्यांच्यासाठी ही थेरपी उपयुक्त ठरू शकेल. मात्र प्रत्यक्षात रुग्णांना प्लाझ्मा थेरपी दिल्यानंतरच त्याचे परिणाम नेमके कीती उपयुक्त ठरतील हे समजणार आहे. सध्या तरी कोरोना उपचारात थेट रामबाण औषध नसल्याने अनेक उपचाराप्रमाणे प्लाझ्मा थेरपी हा एक सहउपचार (ऍडज्युरंट थेरपी) म्हणून उपयोगी ठरेल. 

प्लाझ्मा दानाची प्रक्रिया 
- प्लाझ्मा दानाची प्रक्रिया रक्तदानाच्या तुलनेत सोपी आहे. 
- दात्याला रक्तातून प्लाझ्मा वेगळा करून फक्त प्लाझ्माच घेतला जातो 
- रक्ताचे उर्वरीत घटक दात्याच्या शरिरात कायम राहतात

कोण करु शकेल प्लाझ्मा दान ? 
- कोरोना आजारातून मुक्तीनंतर अठ्ठावीस दिवस पूर्ण झाल्यानंतर अशा निरोगी दात्याला प्लाझ्मा दान करता येईल. 
- आरटीसीपी चाचणीचा कोविड पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आवश्‍यक 
- दात्याच्या रक्तात संबधित ऍटिबॉडीज आढळल्या तरच प्लाझ्मा दान करता येईल. 
- तसेच माता बनण्यापुर्वीच्या गटातील महिलांना प्लाझ्मा दान करता येते. 

कुणाला प्लाझ्मा दान करता येणार नाही 
- मधुमेह, हायपर टेन्शन अशा आजाराच्या कोरोनामुक्त व्यक्तीला प्लाझ्मा दान करता येणार नाही. 
- रक्तात आवश्‍यक अँटिबॉडीज आढळल्या नाही तर प्लाझ्मा दान करता येणार नाही. 

प्लाझ्मा कसा घेतला जातो ? 
रक्तदानाप्रमाणे रक्तातील केवळ प्लाझ्मा काढून घेण्याची यंत्रणेचा वापर 
400 मिली प्लाझ्मा काढून घेतला जातो 
रक्ताचे उर्वरीत सर्व घटक कायम राहतात 

प्लाझ्मा दानाचा त्रास होतो का ? 
कोणताही त्रास होत नाही 
चोवीस तासात दान केलेल्या प्लाझ्माची उणीव शरीर भरून काढते 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com