...अखेर "त्या' अपहृत बाळाच्या माता-पित्याचा लावला पोलिसांनी शोध

मनोज गायकवाड 
Friday, 14 August 2020

आनंद क्षेत्री (वय 32) आणि पूजा क्षेत्री (वय 28) असे या बाळाच्या आई-वडिलांचे नाव आहे. बाळाचे नाव राहुल आहे. त्यांच्या राहण्याचे निश्‍चित असे ठिकाण नाही. जेथे काम मिळते तेथेच ते थांबतात. आनंद मिळेल ते काम करतो तर पूजा हॉटेलमध्ये भांडी घासायचे काम करते. जुन्या मार्केटमधील फास्टफूड गाड्याजवळ हे जोडपे लहान बाळासह रात्री झोपत असे. डोंबाळे हा तेथेच वास्तव्याला होता. त्यामुळे त्यांची ओळख झाली. मागील आठवड्यात राहुलला चॉकलेट देतो असे सांगून तो बाळाला घेऊन गेला आणि परत आलाच नाही. 

श्रीपूर (सोलापूर) : गोव्यातून पळवून आणलेल्या त्या बाळाच्या आईवडिलांचा शोध घेण्यात अकलूज पोलिस यशस्वी झाले आहेत. कोणत्याही पोलिस ठाण्यात अपहरणाची नोंद नसताना आणि तपासाच्या दृष्टीने कसलाही पुरावा हाती नसताना, अकलूज पोलिसांनी परराज्यात जाऊन लावलेला हा शोध पोलिस विभागाची प्रतिमा उंचावणारा ठरला आहे. 

हेही वाचा : गुरुजींच्या विनंती बदल्या लांबल्या; राज्यातील केवळ "या' जिल्ह्यांनीच केल्या बदल्या; वाचा सविस्तर 

अपहरणाचा सविस्तर घटनाक्रम 
रविवारी (ता. 9) पहाटे साडेचारच्या सुमारास अकलूज बाजार समितीच्या परिसरात एक व्यक्ती लहान बाळासह थांबली होती. चेतन सोलंके या नागरिकाने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसानी हणमंत बाबूराव डोंबाळे (वय 65, रा. शेळगाव, ता. इंदापूर) याला ताब्यात घेतले होते. हे बाळ आपलेच असून पत्नीशी भांडण झाल्यामुळे मी बाळासह बाहेर पडलो आहे, अशी बतावणी त्याने केली होती. मात्र पोलिसांनी त्यावर विश्वास ठेवला नव्हता. त्याचे गाव व सासरवाडी येथील सरपंच, पोलिस पाटील व नातेवाईक यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा गेल्या अठरा वर्षांपासून हणमंत हा घरीच आला नसल्याची माहिती मिळाली. त्याला पोलिसी खाक्‍या दाखविल्यानंतर हे बाळ मडगाव (गोवा) येथून पळवून आणल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी या बाळाला पंढरपूर येथील अनाथालयात दाखल करून डोंबाळे याला माळशिरस न्यायालयात दाखल केले. त्या वेळी न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे त्याला सोडावे लागत होते आणि त्याला सोडले तर तपास करणे अवघड होते. याचा विचार करून पोलिसांनी त्याला वेगळ्या आरोपाखाली आपल्या ताब्यात घेतले आणि तपासयंत्रणा गतिमान करीत मडगाव गाठले. 

हेही वाचा : सकाळ इम्पॅक्‍ट : धर्मवीर संभाजी तलाव सुशोभीकरणासाठी वर्क ऑर्डर निघाली, पावसाळ्यानंतर प्रारंभ 

मडगाव येथील पोलिस ठाण्यात चौकशी केली मात्र तेथे अपहरणाचा कसलाही गुन्हा नोंदवला नसल्याचे समजले. त्यानंतर अकलूज पोलिसांनी डोंबाळेची कसून चौकशी केली, त्या वेळी या मुलाचे आईवडील फूटपाथवर राहात असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी रस्त्यावर आणि फूटपाथवर भटकणाऱ्यांच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. रस्त्यावरील या शोध मोहिमेत रात्री त्या बाळाच्या वडिलांचा तर सकाळी आईचा शोध पोलिसांना लागला. 

ओल्ड मार्केट परिसरातून पळविले होते बाळ 
आनंद क्षेत्री (वय 32) आणि पूजा क्षेत्री (वय 28) असे या बाळाच्या आई-वडिलांचे नाव आहे. बाळाचे नाव राहुल आहे. त्यांच्या राहण्याचे निश्‍चित असे ठिकाण नाही. जेथे काम मिळते तेथेच ते थांबतात. आनंद मिळेल ते काम करतो तर पूजा हॉटेलमध्ये भांडी घासायचे काम करते. जुन्या मार्केटमधील फास्टफूड गाड्याजवळ हे जोडपे लहान बाळासह रात्री झोपत असे. डोंबाळे हा तेथेच वास्तव्याला होता. त्यामुळे त्यांची ओळख झाली. मागील आठवड्यात राहुलला चॉकलेट देतो असे सांगून तो बाळाला घेऊन गेला आणि परत आलाच नाही. शोधाशोध केली मात्र तो सापडला नाही, असे आनंदने पोलिसांना सांगितले. ज्या ठिकाणाहून बाळाचे अपहरण झाले तो भाग हातोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो. मात्र पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार नोंद झाली नव्हती. त्यामुळे स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती नव्हती. 

अकलूजचे पोलिस हेड कॉन्स्टेबल राजू नाईकवाडी आणि पोलिस शिपाई संदेश रोकडे यांनी या अपहृत बाळाच्या आईवडिलांना शोधून काढले आहे. मडगावात आल्यानंतर त्यांनी मडगावचे पोलिस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला, मात्र तेथे अपहरणाची नोंदच नव्हती. त्यानंतर परराज्यातील रस्त्यांवर शोध मोहीम राबवून या दोघांनी लावलेला हा शोध पोलिस खात्याची मान अभिमानाने उंचावणारा ठरला आहे. 

या यशस्वी कार्याबाबत पोलिस हेडकॉन्स्टेबल तथा तपास अधिकारी राजू नाईकवाडी म्हणाले, तपास करणे अवघड होते, मात्र निश्‍चय पक्का होता. कोरोनामुळे फिरायला आणि तपासालाही मर्यादा होत्या. लॉकडाउनमुळे रस्त्यावर माणसेच दिसत नव्हती. तरीही आम्ही प्रत्येकाला न्याहाळत होतो. दोन दिवस पायपीट केल्यानंतर त्या बाळाच्या आईवडिलाचा शोध घेण्यात यश आले तेव्हा अतिशय आनंद झाला. या पालकांना रीतसर नोटीस बजावून मडगाव (द.) पोलिस ठाण्यात नोंद केली आहे. एक-दोन दिवसांत या पालकांना अकलूज पोलिस ठाण्यात बोलावून, ओळख पटवून वरिष्ठ अधिकारी पुढील प्रक्रिया पार पाडतील. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police succeed in tracing baby's parents from Goa