#Lockdown : मित्रांसोबत पोलिस जीपमध्ये पार्टी! चौघांवर गुन्हा; पोलिस निलंबीत

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 7 एप्रिल 2020

पोलिसाच्या जीपमधून फिरताना चेतन याने विविध ठिकाणी फेसबुक लाईव्ह केले. भूक लागली म्हणून हॉटेलमधून पार्सल घेतले. बिर्याणी खात, बिअर पित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सोलापूर : संचारबंदीच्या कालावधी पोलिसाच्या जीपमध्ये बसून बिअर पित, बिर्याणी खात पार्टी केल्याचे प्रकरण सोमवारी सोलापुरात घडले. या घटनेनंतर गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस कर्मचारी, वकील आणि सावकारासह चौघांना अटक केली. याप्रकरणात मित्राला पोलिस जीपमधून फिरवणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

#Solapur : बापरे.. संचारबंदीत पोलिसाच्या जीपमध्ये ओली पार्टी

याप्रकरणात पोलिस शिपाई विनोद सूर्यकांत दंतकाळे, त्याचा मित्र केतन श्रीकांत कसबे (रा. लक्ष्मी नारायण अपार्टमेंट, सदर बझार, सोलापूर), राहूल गेनबा शिंदे (रा. टिकेकरवाडी, होटगी रोड, सोलापूर), ऍड. सुमेध अशोक वाघमारे (रा. मल्लिकार्जुन मल्लिकार्जुन नगर, यशराज नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) या चौघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. मोटार परिवहन विभागातील चालक असलेला पोलिस शिपाई दंतकाळे हा जेलरोड पोलिस ठाण्याकडे पोलिस जीप चालविण्याच्या कर्तव्यावर होता. चेतन हा निवृत्त नायब तहसीलदार श्रीकांत कसबे यांचा मुलगा आहे. तो गांधीनगर परिसरात फायनान्स कंपनी चालवतो. एक महिन्यापूर्वी अपघातात त्याचा पाय फॅक्‍चर झाला आहे. 

#Coronavirus : तो पुण्याहून आला चालत अन्‌ मग...

दवाखान्याला जायचे म्हणून केतन कसबे हा मित्र पोलिस शिपाई विनोद दंतकाळे यास बोलावून घेतले. दंतकाळे याच्याकडील पोलिस जीपमध्ये चेतन आणि त्याचे मित्र बसले. त्यानंतर ते शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पोलिस जीपमधून फिरले. पोलिसाच्या जीपमधून फिरताना चेतन याने विविध ठिकाणी फेसबुक लाईव्ह केले. भूक लागली म्हणून हॉटेलमधून पार्सल घेतले. बिर्याणी खात, बिअर पित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा प्रकार समजल्यानंतर पोलिसांनी संशयितांना शोधून काढले. पोलिसांच्या कारवाईनंतर चेतनच्या फेसबुकवरील काही व्हिडीओ डिलीट करण्यात आले आहेत. 

#Solapur : बाहेर पडू नका... किराणा, भाजीपाला, औषध मिळेल घरपोच!

याप्रकरणात चेतनसह त्याच्या मित्रांवर जेलरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक जे.एन.मोगल यांनी सांगितली. पोलिस कर्मचारी विनोद दंतकाळे याच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police suspended at solapur