प्रिसिजन पुरस्काराच्या निमित्ताने उलगडला वंचिताच्या उत्थानाचा आगळा प्रवास 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 November 2020

यावेळी प्रिसिजन कॅमशाफ्ट्‌सचे चेअरमन यतिन शहा, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी तथा संचालक रवींद्र जोशी, कार्यकारी संचालक करण शहा, मयूरा शहा यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा झाला. 

सोलापूरः वंचिताच्या पूर्नवसनासाठी कार्य करून त्यांची प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करणारे सामाजिक कार्यकर्ते नरसिंग झरे, प्रसाद मोहिते व अनु मोहिते यांना प्रिसिजन सामाजीक कृतज्ञता पुरस्कार व स्व.सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रिसिजन दिवाळी गप्पा पर्वाचा समारोप या पुरस्कार वितरणाने आज झाला. 

हेही वाचा ः सोलापूरच्या कोरोना बाधितांची संख्या 42 हजार 4, मृतांची संख्या 1501 

यावेळी प्रिसिजन कॅमशाफ्ट्‌सचे चेअरमन यतिन शहा, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी तथा संचालक रवींद्र जोशी, कार्यकारी संचालक करण शहा, मयूरा शहा यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा झाला. 

हेही वाचाः मारुती चितमपल्ली यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करा ः कॉ.आडम मास्तर यांची मागणी 

गोविंद महाराज गोपाळ समाज विकास परिषद (अनसरवाडा ता. निलंगा जि. लातूर) या संस्थेला यंदाचा 'प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार' देऊन गौरविण्यात आलं. सन्मानचिन्ह आणि तीन लाख रुपयांचा हा पुरस्कार संस्थेच्या वतीने नरसिंग झरे यांनी स्वीकारला. सोलापूरच्या प्रार्थना फाउंडेशनला यंदाचा 'स्व. सुभाष रावजी शहा स्मृति पुरस्कार' देऊन गौरविण्यात आलं. सन्मानचिन्ह आणि दोन लाख रुपयांचा हा पुरस्कार संस्थेच्या वतीने अनु आणि प्रसाद मोहिते यांनी स्वीकारला. 
यावेळी प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी पुरस्कारार्थीची प्रकट मुलाखत घेतली. 
श्रीकृष्णाचे वंशज म्हणवणाऱ्या गोपाळ समाज हा सामाजिक दुर्दशेने भटका समाज बनला. कसरतीचे खेळ करण्यासाठी अनसरवाड्यात आलेल्या या समाजाशी नरसिंग झरे यांचा संबंध आला. दारिद्रय, अस्वच्छता, व्यसनाधिनता आणि अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सोडवण्याचे काम झाले. अनसरवाडा येथे गोविंद महाराज गोपाळ समाज विकास परिषदे या संस्थेद्वारे त्यांनी बचतगट, मुलांचे शिक्षण, रोजगार निर्मिती आदी सामाजिक प्रयोग यशस्वी केले. त्यांच्या या कार्यामुळे जीवघेण्या कसरतीं करून कमाईपासून सुटका झाली. आता या वस्तीमध्ये त्यांची स्वतःची पक्की घरे झाली आहेत. एकप्रकारे हरवलेलं अस्तित्व पुन्हा गवसलं असल्याचे असं नरसिंग झरे यांनी सांगितलं. 
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा असणाऱ्या प्रसाद मोहिते व अनु मोहितेने प्रतिकुल स्थितीत पिचलेल्या शेतकऱ्यांची मुलं त्याचप्रमाणं वंचित, निराधार मुलांसाठी काम सुरू केले. त्या दांपत्याच्या सहप्रवास सामाजिक कार्यातून घडला. मुलांना भीक मागण्यापासून परावृत्त करणं, पालावर जाऊन मुलांना शिकवणं, निराधार माणसांची सेवाशुश्रूषा करणं ही कामे त्यांनी सुरू केली. यातूनच भिक्षामुक्ती अभियान, 'कृतिशील तरुणाई शिबीर' असे उपक्रमही राबवले. रिक्षा चालवत आणि मेसचे डबे देत या मुलांसोबतच स्वतःच्या संसाराचा गाडा ओढणं सुरू होतं. या वंचित मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी इर्लेवाडीची (ता. बार्शी) शेतजमीन विकून मोरवंची (ता. मोहोळ) इथं प्रकल्पाची उभारणीची तयारी केली आहे. बालग्राम हा प्रकल्प म्हणजे निराधार मुलं आणि निराधार वृद्ध यांचं हक्काचं घर असेल अशा शब्दांत अनु आणि प्रसाद मोहिते यांनी आपलं ध्येय स्पष्ट केलं.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Precision Awards Unveil Journey to Upliftment of Deprivation