सोलापूर केळी क्‍लस्टरसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण 

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

सोलापूर जिल्ह्यातील केळी निर्यातीसाठी सोलापुरातच क्‍लस्टर निर्माण होणार असून यासंबंधीची तयारी प्रशासनाने दर्शवली आहे. यासाठी शासनाच्या वतीने विविध सुविधा निर्माण करण्यासाठी शुक्रवारी (ता. 24) जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण बैठक होत आहे.

चिखलठाण (जि. सोलापूर) ः सोलापूर जिल्ह्यातील केळी निर्यातीसाठी सोलापुरातच क्‍लस्टर निर्माण होणार असून यासंबंधीची तयारी प्रशासनाने दर्शवली आहे. यासाठी शासनाच्या वतीने विविध सुविधा निर्माण करण्यासाठी शुक्रवारी (ता. 24) जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. केळी निर्यातीस चालना मिळाल्यास निर्यातदार शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. 

हेही वाचा - हवामान बदलाचा होतोय या पिकावर परिणाम

जिल्ह्यातील करमाळा, माढा, माळशिरस तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर निर्यातक्षम केळी उत्पादन घेतले जाते. सध्या आखाती ओमान, सौदी, इराण, अफगाणिस्तान या देशांत सात, 13 आणि 16 किलोच्या बॉक्‍समध्ये निर्जंतुकीकरण केलेली केळी व्यवस्थित पॅकिंग करून कंटेनरमध्ये भरून पाठवली जाते. या देशांमध्ये या केळीला चांगली मागणी आहे. याबरोबरच रशियामध्ये केळी पाठवण्यास सुरवात झाल्याने युरोपियन मार्केटही खुले झाले आहे. परकीय चलन मिळण्याच्या दृष्टीने ही गोष्ट महत्त्वाची असल्याने केळी निर्यातीसाठी आपेडाचे सहायक महाप्रबंधक प्रशांत वाघमारे यांची समन्वयक अधिकारी म्हणून निवड केली आहे. शासनाकडूनही सकारात्मक धोरण आखले जात आहे. 

हेही वाचा - पहा याच्याकडून पशुपालकांची कशी होतेय लूट 

याबाबतीत निर्यातीची मोठी संधी असल्याने शेतकऱ्यांना निर्यातीच्या दृष्टीने येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी कृषी विभागाच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर येथे अपेडाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत निर्यातदार शेतकरी व कृषी विभागातील अधिकारी यांची संयुक्तपणे बैठक शुक्रवारी (ता. 24) होत आहे. या बैठकीत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा होऊन केळीचे क्‍लस्टर धोरण ठरवण्यात येणार आहे. निर्यातीसाठी लागणारे परवाने कृषी विभागाच्या जिल्हा कार्यालयामधून देण्यास सुरवात झाल्याने या संबंधीच्या शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर होत आहेत. अपेडाच्या माध्यमातून विविध देशांतील या पिकासंदर्भात मानके आवश्‍यक दर्जानुसार माल पाठवण्याबाबत मार्गदर्शन व सुविधा देण्याचे धोरण असल्याने निर्यातीला चालना मिळणार आहे. 

केळी निर्यातीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना असणाऱ्या संधी लक्षात घेऊन जिल्ह्यात क्‍लस्टर निर्माण होत आहे. या संबंधीच्या अडचणी दूर करण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. अपेडाच्या माध्यमातून शासनाच्या वतीने विविध सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याने याचा फायदा जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. 
- रवींद्र माने, कृषी उपसंचालक, सोलापूर 

केळी निर्यातीसाठी सोलापूर जिल्ह्यात क्‍लस्टर निर्माण झाल्यास याचा फायदा जिल्ह्यातील केळी उत्पादकांना होणार असून मोठे शेतकरी स्वतः निर्यातदार होऊ शकतात. याबरोबरच शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपन्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणावर या क्षेत्रामध्ये संधी निर्माण होणार असल्याने अंतिमत: केळीला चांगला दर मिळेल. केळी उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. 
- विष्णू पोळ, अध्यक्ष, लोकविकास फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, शेटफळ, करमाळा 

महाराष्ट्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preparation of administration for Solapur banana cluster is complete