सोलापुरातील प्रतिबंधित क्षेत्रातील दुकानदारांसाठी कॅशलेस व्यवस्था बंधनकारक (VIDEO) 

विजयकुमार सोनवणे
Saturday, 30 May 2020

पी. शिवशंकर यांनी आपल्या धडक कामगिरीने आदिवासी विकास विभागातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला होता. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत होणारे कामकाज, आश्रमशाळा व वसतिगृहांची स्थिती, तेथील समस्यांची सोडवणूक करतानाच प्रशासकीय यंत्रणेतील कामचुकारपणा दूर करण्याचे काम त्यांनी केले. बनावट विद्यार्थी दाखवून शिष्यवृत्ती हडपण्याची घटनाही त्यांनी उघडकीस आणली होती. 

सोलापूर : कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यामुळे प्रतिबंधित करण्यात आलेल्या क्षेत्रातील दुकानदारांना कॅशलेस व्यवस्था बंधनकारक करण्यात येणार आहे. जे दुकानदार ही व्यवस्था करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित आहे, असे महापालिकेचे नूतन आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. 

तत्कालीन आयुक्त दीपक तावरे यांची काल सायंकाळी तडकाफडकी बदली करण्यात आली व त्यांच्या जागी पी. शिवशंकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी आज शनिवारी दुपारी साडेबारा वाजता पदभार स्वीकारला. श्री. शिवशंकर हे महापालिकेचे 33 वे आयुक्त आहेत. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

श्री. शिवशंकर म्हणाले,""प्रतिबंधित क्षेत्रामध्ये किराणा किंवा इतर दुकानांतून पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी संपूर्ण प्रतिबंधित क्षेत्रातील व्यवहार हा कॅशेलस झाला पाहिजे यासाठी नियोजन करणार आहे. तसेच जे दुकानदार किंवा व्यावसायिक ही व्यवस्था करणार नाहीत, त्यांच्यावर निश्‍चित कारवाई केली जाईल. त्यासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून निर्णय घेणार आहे.'' 

प्रतिबंधित क्षेत्र हा शंभर टक्के "लॉकडाऊन' करण्याचे नियोजन आहे. या क्षेत्रातील रहिवाशांना घरोघरी अन्नधान्य पुरवठ्याचे नियोजन आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशी खरेदीच्या निमित्ताने बाहेर पडत असल्यानेही रुग्णांची संख्या वाढत आहे. घरोघरी जीवनावश्‍यक वस्तु पुरविण्याचे नियोजन केले तर निश्‍चितच प्रतिबंधित क्षेत्रातही पॉझिटीव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होईल, असेही श्री. पी. शिवशंकर म्हणाले. खासगी रुग्णायासंदर्भात विचारले असता, या संदर्भात अधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहे, त्यानंतर कारवाईचे नियोजन करण्यात येईल. कोरोना नियंत्रित आणण्यासाठी लोकप्रतिनिधीबरोबरच शहरवासियांचेही सहकार्य अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले. 

पी. शिवशंकर यांचा परिचय 
अनंतपूर (आंध्र प्रदेश) येथील मूळ रहिवाशी असलेले पी. शिवशंकर हे 2011 मध्ये भारतीय प्रशासन सेवेत दाखल झाले. यापूर्वी त्यांनी वर्धा जिल्ह्यात प्रांताधिकारी, गडचिरोली जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी आणि एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचा अतिरिक्त कार्यभार, तसेच कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. वर्धा येथे प्रशिक्षणार्थी म्हणून काम केल्यानंतर गडचिरोलीत सहायक जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांनी आपल्या धडक कामगिरीने आदिवासी विकास विभागातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला होता. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत होणारे कामकाज, आश्रमशाळा व वसतिगृहांची स्थिती, तेथील समस्यांची सोडवणूक करतानाच प्रशासकीय यंत्रणेतील कामचुकारपणा दूर करण्याचे काम त्यांनी केले. बनावट विद्यार्थी दाखवून शिष्यवृत्ती हडपण्याची घटनाही त्यांनी उघडकीस आणली होती. 

महापालिका नूतन आयुक्त पी. शिवशंकर रुजू  (VIDEO)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: p.shivshankar take a charge of solapur Municipal corporation Commissioner