आयपीएस अधिकाऱ्याने दिलं 'बूस्ट' अन्‌ खाकी वर्दीतील पीएसआय अभिजित भोसले बनले दर्दी गायक !

अक्षय गुंड 
Thursday, 14 January 2021

वडिलांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून पोलिस उपनिरीक्षक म्हणून पोलिस दलात नोकरी स्वीकारली. पण, लहानपणापासून असलेली गायनाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात कठीण व खडतर सेवा बजावत असताना थकवा व ताणतणाव कमी करण्यासाठी आपल्या कलेने त्यांना साथ दिली. 

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : प्रत्येकाच्या अंगी एक कला दडलेली असते. परंतु त्या कलेला पाहिजे तसा वाव अथवा संधी मिळत नाही. कारण की, काही जणांना परिस्थितीमुळे कलेला मुकावे लागते, तर काही जणांना संधीच मिळत नाही. परंतु असतात असेही काहीजण, ज्यांना अंगातील कला शांत बसू देत नाही ! मिळेल त्या वेळेत संधीचे सोने करतात व अंगातील कला जोपासण्याचा प्रयत्न करतात. यातील मोजकेच कलाकार जगासमोर येतात. यातीलच एक कलाकार म्हणजे कोल्हापूर पोलिस दलात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक अभिजित भोसले. 

सध्याच्या काळात प्रत्येकाला खाकी वर्दीचे आकर्षण लागलेले आहे. खाकी वर्दीचा रुबाब व खाकी वर्दीत काम करण्याची संधी ही काही वेगळीच मजा असते. त्यामुळे प्रत्येकजण ही खाकी वर्दी आपल्या अंगावर कशी येईल यासाठी धडपडत असतो. त्याचप्रमाणे अभिजित भोसले यांना देखील बालपणापासून खाकी वर्दीचे आकर्षण होते. कारण, मनात देशसेवेची प्रबळ इच्छा. म्हणूनच त्यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून पोलिस उपनिरीक्षक म्हणून पोलिस दलात नोकरी स्वीकारली. पण, लहानपणापासून असलेली गायनाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात कठीण व खडतर सेवा बजावत असताना थकवा व ताणतणाव कमी करण्यासाठी आपल्या कलेने त्यांना साथ दिली. 

सातारा जिल्ह्यातील फलटण या गावचे रहिवासी असलेले पोलिस उपनिरीक्षक अभिजित प्रभाकर भोसले यांची प्रेरणादायी कहाणी रंजक अशीच आहे. अभिजित त्यांच्या वडिलांनी स्वतःला शिकण्यासाठी हार्मोनियम घरात आणले होते. वडील जेव्हा ते वाजवत असत त्या वेळी अभिजित यांची पावले आपोआपच त्या दिशेने जात असत व अभिजित यांना देखील त्याची आवड निर्माण झाली. त्यामुळे वडिलांनी त्यांना संगीताचे विविध क्‍लासेस लावले. संगीताची आवड बघता शालेय जीवनात प्रत्येक गायनाच्या स्पर्धेत ते आवर्जून भाग घेत असत. त्यांची ही कला पाहता या क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या हस्ते अभिजित यांचा सत्कार करण्यात आला. त्यामुळे अभिजित यांचे या क्षेत्रातच करिअर होईल असे वाटत असताना वडिलांनी अभिजित यांना "संगीत- गायन या क्षेत्राकडे छंद म्हणून बघू शकतोस, परंतु अगोदर पोटापाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, त्या दृष्टीने तू करिअर घडव' असा मौलिक सल्ला दिला. 

वडिलांनी अभिजित यांच्याकडून डॉक्‍टर होण्याचे स्वप्न पाहिले होते. परंतु अगदी थोड्या मार्कांनी त्यांची ही संधी हुकली. त्यामुळे बारावीनंतर त्यांनी बीएस्सी ऍग्रीला प्रवेश घेतला. तिथे त्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करत पुढील शिक्षण राहुरी येथून एमएस्सी ऍग्रीमध्ये पूर्ण केले. या कालावधीत त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. जशी लहानपणापासून गायन व संगीताची आवड होती तसेच खाकी वर्दीबद्दलही आकर्षण होते. त्यामुळे त्यांनी या क्षेत्रात आपले नशीब आजमावण्याचे ठरवले. पहिल्या प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक या परीक्षेत त्यांना अपेक्षित असलेले यश मिळाले नाही; परंतु ते खचून जाणारे नव्हते. त्यांनी पुन्हा त्याच जिद्दीने व कष्टाने प्रयत्न केला. त्यामुळे दुसऱ्या प्रयत्नात त्यांची पोलिस उपनिरीक्षक या पदी निवड झाली. 

या सर्व कालावधीत त्यांनी आवड असलेल्या गायन व संगीताच्या या क्षेत्राकडे किंचितही दुर्लक्ष केले नाही. पुढे त्यांची नियुक्ती अतिशय संवेदनशील असलेल्या गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात करण्यात आली. पोलिस हे असे क्षेत्र आहे की येथे सहजासहजी इतर गोष्टींसाठी वेळच मिळत नाही. असे असताना देखील अभिजित भोसले यांना खरी साथ लाभली ती गडचिरोलीचे तत्कालीन पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांची. अभिजित यांची कला पाहता अभिनव देशमुख हे त्यांना विविध स्पर्धांना जाण्यासाठी मुभा देत असत. अभिनव देशमुख यांनी खऱ्या अर्थाने अभिजित भोसले यांच्या कलेचा सन्मान केला. त्यांची प्रेरणा घेऊनच, मी आज पोलिस खात्यात असून देखील गायन व संगीताची कला जोपासत आहे, असे अभिजित सांगतात. पोलिस क्षेत्रात वावरत असताना टेन्शन, थकवा या सर्व गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे वैयक्तिक गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसतो. परंतु या सर्व गोष्टी सांभाळत खाकी वर्दीतील गायक असलेले अभिजित भोसले यांनी पोलिस उपनिरीक्षक या पदाचे कर्तव्य बजावत आपली कला जोपासली आहे, हे आदर्शवत व प्रेरणादायी असेच आहे. कारण की, नोकरी मिळाल्यानंतर बरेच जण स्वतःला आवडत असलेल्या कलेपासून वेळ मिळत नसल्याने, जाणीपूर्वक अथवा नकळत दूर जातात. परंतु ज्यांच्या नसानसांत कला असते ते कुठेही गेले तरी मिळालेल्या संधीचे सोने करत व कला जोपासण्याचा प्रयत्न करतात. त्यातीलच खाकी वर्दीतील वरिष्ठ पदावर असलेले पोलिस उपनिरीक्षक अभिजित भोसले हे व्यक्तिमत्त्व होय. 

पोलिस खात्यातील अधिकारी व कर्मचारी या सर्वांनी आपल्या अंगी असलेल्या कला जोपासण्याचा प्रयत्न करावा. छंद जोपासल्यामुळे ताणतणाव, नैराश्‍य या गोष्टीपासून सुटका होते. त्यामुळे पोलिस खात्यातील सर्व सहकाऱ्यांनी अंगी असलेल्या कला आवर्जून जोपासावेत. 
- अभिजित भोसले, 
पोलिस उपनिरीक्षक 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PSI Abhijit Bhosale also has a passion for singing