मोठी बातमी ! रेल्वेला बसणार 11 हजार कोटींचा फटका 

तात्या लांडगे
मंगळवार, 24 मार्च 2020

  • मार्चएण्डपर्यंत रेल्वे वाहतूक बंद राहणार 
  • 14 लाख कर्मचाऱ्यांसाठी 510 कोटींची पदरमोड 
  • लाखो प्रवाशांच्या तिकीटांचे द्यावे लागणार पैसे परत 
  • कोरोनाच्या भितीने 31 मार्चनंतर प्रवासी वाहतूक सुरळीत होईल की नाही याबाबत संभ्रम 

सोलापूर : देशातील कोरोना या विषाणूला हद्दपार करण्याच्या हेतूने रेल्वे वाहतूक 31 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेला दररोज अकराशे कोटींचा फटका सोसावा लागत असून मार्चएण्डपर्यंत तब्बल 11 हजार कोटींचे उत्पन्न बुडणार आहे. 22 मार्च ते 31 मार्चपर्यंत रेल्वेला 14 लाख अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी 510 कोटींची पदरमोड करावी लागणार आहे. 

हेही नक्‍की वाचा : रोजगार हिरावला ! बतच गटांच्या 10 लाख महिला बेरोजगार 

कोरोनाचे संकट देशात पाय पसरू लागल्याने देशाच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण रेल्वे ठप्प ठेवण्यात आली आहे. त्याचा निश्‍चितपणे आगामी काळात रेल्वेला फटका सोसावा लागणार आहे. दरम्यान, 31 मार्चनंतर देशातील संपूर्ण रेल्वे वाहतूक सुरु होईल का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. सेंट्रल रेल्वेचे 2018-19 मध्ये एक लाख 48 हजार 528 कोटींचे भाग भांडवल होते. तर सेंट्रल रेल्वेला दरवर्षी दोन लाख एक हजार 90 कोटी रुपयांचे उत्पन्न मालवाहूक रेल्वेतून मिळते. तसेच प्रवासी वाहतुकीतून दरवर्षी सरासरी दोन लाख 840 कोटींचे उत्पन्न मिळते. रेल्वेचे उत्पन्न दरवर्षी सात ते आठ टक्‍क्‍यांनी वाढत असतानाही रेल्वेची काही स्थानके व गाड्या खासगी तत्त्वावर चालविण्याची प्रायोगिक योजना केंद्र सरकारने नुकतीच सुरु केली आहे. तब्बल 14 लाख अधिकारी व कर्मचारी रेल्वेत काम करीत असून विस्कळीत वेळापत्रकांमुळे काही मार्गांवरील प्रवाशांची संख्या घटल्याने त्याचा उत्पन्नावर परिणाम झाल्याचीही चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर खासगीकरणाला आणखी बळकटी मिळाल्याचेही वरिष्ठ अधिकारी सांगू लागले आहेत. एकूणच कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर बुडालेल्या उत्पन्नातून रेल्वे कसा मार्ग काढणार, याची उत्सुकता लागली आहे. 

हेही नक्‍की वाचा : सोलापुरकरांसाठी खुषखबर ! हवा प्रदूषणात झाली घट 

उत्पन्नात निश्‍चितपणे मोठी घट 
कोरोना हे वैश्‍विक संकट देशातून हद्दपार करण्याच्या हेतूने संपूर्ण रेल्वे वाहतूक 10 दिवस बंद ठेवली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेसह सेंट्रल रेल्वेला मोठा फटका बसत आहे. ज्या प्रवाशांनी तिकीटे घेतली होती, त्यांना आता परतवा देण्याचे नियोजन सुरु असून 31 मार्चनंतर त्यांना पैसे परत दिले जातील. 
- प्रदिप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर रेल्वे 

हेही नक्‍की वाचा : जरा विचार करा ! पोलिसही माणूसच आहेत 

सेंट्रल रेल्वेचा पसारा 
एकूण अधिकारी- कर्मचारी
14.09 लाख 
मालवाहतूक गाड्यांमधून उत्पन्न 
2 लाख 1 हजार 90 कोटी 
(प्रवासी वाहतूक उत्पन्न) 
2 लाख 840 कोटी 
वेतनापोटी होणारा खर्च
1 लाख 88 हजार कोटी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway revenue loss by Rs 11,000 crore