मका खरेदी अडचणीवर कुणी उठवला आवाज ते वाचा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

सोलापूर जिल्ह्यात मका हमीभाव खरेदी केंद्र चालू करण्याचा निर्णय झाला आहे. या हमीभाव खरेदी केंद्रावर काही अटी घातल्या आहेत. त्या शेतकरी वर्गासाठी खूप अडचणीच्या आहेत.

नातेपुते(सोलापूर)ः जिल्ह्यात मका खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांच्या सात-बारावर पेऱ्याची नोंद केलेली नाही. या नोंदीअभावी शेतकऱ्यांना मका खरेदी केंद्रावर देण्याची अडचण झाली आहे. एकरी 25 क्विंटल मका उत्पादन असताना खरेदी केंद्रावर मात्र आठ क्विंटल मक्‍याची अट घातल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याप्रश्‍नी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्याचे लक्ष वेधून नियमात सुधारणा करण्याच्या मागण्या केल्या आहेत. 

हेही वाचाः उर्जा क्षेत्राचे करणार खासगीकरण 

सोलापूर जिल्ह्यात मका हमीभाव खरेदी केंद्र चालू करण्याचा निर्णय झाला आहे. या हमीभाव खरेदी केंद्रावर काही अटी घातल्या आहेत. त्या शेतकरी वर्गासाठी खूप अडचणीच्या आहेत. जिल्हा कृषी अधिकारी सोलापूर यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी सोलापूर यांना मकाचे एकरी उत्पादन फक्त आठ क्विंटल दिले आहे. वास्तविक पाहता जिल्ह्यात मक्‍याचे एकरी उत्पादन 25 ते 30 क्विंटलपर्यंत निघते. जिल्हा मार्केटिंग अधिकारी, सोलापूर यांनी हमीभाव खरेदी केंद्रावर एकरी फक्त आठ क्विंटल मका घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. त्यात बदल करून एकरी 25 क्विंटल मका खरेदीस खरेदी केंद्रावर परवानगी द्यावी. 

हेही वाचाः गरजेवेळी मदत करणे हीच खरी माणुसकी 

लॉकडाउनमुळे जवळपास सर्व शेतकरी वर्गाने सात-बारावर मका पिकाची नोंद केलेली नाही. त्यामुळे मका हमीभाव केंद्रावर शेतकरी वर्गाला अडचण निर्माण होणार आहे. तरी प्रशासनास संबंधित शेतकरी वर्गाच्या सात-बारावर मका पिकाची त्वरित नोंद करण्याबाबत आदेश द्यावेत किंवा हमीभाव खरेदी केंद्रावर मका असल्याबाबतचा तलाठ्यांचा दाखला चालावा. कोणत्याही शेतकऱ्यांना या तांत्रिक अडचणीमुळे मका खरेदी केंद्रावर देता येणार नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाची ही अडचण दूर करण्यासाठी वरील दोन्ही बाबतीत संबंधित अधिकारी वर्गाला सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read the voice of someone who raised the issue of buying maize