अशी मानवसेवा, रुग्णसेवा पाहिली का कुठे? वाचा सविस्तर 

श्रीनिवास दुध्याल 
रविवार, 21 जून 2020

घाणीने माखलेले कपडे व मनोरुग्णाची झालेली दुर्दशा पाहून त्याला ज्यूस व अल्पोपाहार देण्यात आला व अंघोळ घालून स्वच्छ केले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने ऍम्ब्युलन्सने शासकीय रुग्णालयात दाखल केले. गेल्या 15 दिवसांपासून त्यांना एमजेमार्फत रोज जेवण, चहा, नास्ता देण्यात येत आहे. रोज जेवण मिळत असल्यामुळे तो रुग्ण आता बरा झाला असून, तुटकं-तुटकं बोलायचा प्रयत्न करीत आहे. 

सोलापूर : मानवसेवेचा ध्यास घेऊन एम. जे. प्रथम मानव सेवा संस्थेची स्थापना मोहन तलकोकूल यांनी केली आहे. संस्थेच्या नावातच प्रथम मानव सेवेचा उल्लेख केल्याप्रमाणे या संस्थेतील स्वयंसेवक निराश्रित, गरीब व मनोरुग्णांच्या सेवेला वाहून घेतल्याचे दिसून येते. दररोज बेघर व गरिबांना अन्नदानाचे काम करतात तसेच लॉकडाउनमध्ये कोणी पाणीही न विचारणाऱ्या निराधारांना अन्नदानासह मनोरुग्णांची सेवा या स्वयंसेवकांनी केली. 

हेही वाचा : तीन वर्षे अभ्यास करत ज्योत्स्ना मुळीक एमपीएससीत यशस्वी 

पूर्व भागातील आशानगर येथे लॉकडाउनच्या दरम्यान बेवारस मनोरुग्ण जेवणाविना अशक्त होऊन पडल्याची माहिती "एमजे'ला मिळाली. त्यानंतर "एमजे'चे संस्थापक तलकोकूल यांनी स्वत: तेथे जाऊन त्या मनोरुग्णाची परिस्थिती पाहिली. त्याला अशक्तपणामुळे बोलता येत नव्हते. घाणीने माखलेले कपडे व मनोरुग्णाची झालेली दुर्दशा पाहून त्याला ज्यूस व अल्पोपाहार देण्यात आला व अंघोळ घालून स्वच्छ केले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने ऍम्ब्युलन्सने शासकीय रुग्णालयात दाखल केले. गेल्या 15 दिवसांपासून त्यांना एमजेमार्फत रोज जेवण, चहा, नास्ता देण्यात येत आहे. रोज जेवण मिळत असल्यामुळे तो रुग्ण आता बरा झाला असून, तुटकं-तुटकं बोलायचा प्रयत्न करीत आहे. 

हेही वाचा : जागतिक योग दिवस : स्वस्थ भारतासाठी योग चळवळ 

"एमजे'ने गेल्या दीड वर्षांपासून 12 ते 15 मनोरुग्णांची अशा प्रकारे सेवा केली आहे. इतर वेळी शहरातील फूटपाथ व रस्त्यांवर फिरणाऱ्या मनोरुग्णांसाठी जेवण व उन्हाळ्यात चप्पल दिले जातात. हिवाळ्यात चहा, दूध व बिस्किेट दिली जातात. दर आठवड्याला मनोरुग्णांना अंघोळ घातली जाते. त्यांची दाढी-कटिंगही केली जाते. 

दानशूर व्यक्तींच्या मदतीने सुरू आहे कार्य 
आमची संस्था मनोरुग्णाच्या सेवेसाठी स्थापन केली आहे. वर्षभर वंचित, निराश्रित व गरिबांची उपासमार होऊ नये म्हणून त्यांच्या जेवणाची व्यवस्था संस्थेतील इतर सभासदांच्या सहकार्याने आम्ही करतो. या कार्यासाठी आम्हाला शहरातील दानशूर व्यक्तींची मदत मिळत असते. लॉकडाउनच्या काळातदेखील अन्नदान सेवेत खंड पडू न देता वंचित व निराधारांसाठी जेवणाची व्यवस्था केली. आवश्‍यकतेनुसार वैद्यकीय सुविधा पुरवली. 
- मोहन तलकोकुल, 
संस्थापक- अध्यक्ष, 
एम. जे. प्रथम मानव सेवा संस्था 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Service to homeless, psychiatric by social workers in lockdown