भुजबळ कडाडले ! ज्यादा दराने वस्तू विकल्यास सात वर्षांची शिक्षा 

तात्या लांडगे
मंगळवार, 24 मार्च 2020

भुजबळ म्हणाले... 

  • संचारबंदीत जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहणार 
  • किरणा दुकानांवर नागरिकांनी एकाचवेळी गर्दी न करण्याचे आवाहन 
  • भाजीपाला, कांदा, बटाटा मार्केट बंद केले नसल्याचेही स्पष्टीकरण 
  • शेतकरीदेखील थेट ग्राहकांना भाजीपाला विकू शकतात 
  • राज्यात सहा महिने पुरेल इतके अन्नधान्य साठा 

सोलापूर : सहा महिने पुरेल एवढे अन्नधान्य उपलब्ध असल्याने नागरिकांनी काळजी करू नये. त्यासाठी किराणा दुकानांवर एकाचवेळी गर्दीदेखील करू नये. ज्यादा दराने वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर ठोस कारवाई करुन त्यांना सात वर्षांची शिक्षा होईल, असेही अन्न नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. 

हेही नक्‍की वाचा : रोजगार हिरावला ! बचत गटांच्या दहा लाख महिला बेरोजगार 

अन्नधान्य, भाजीपाला किंवा मटण, मच्छी यासारख्या जीवनावश्‍यक वस्तू मिळणारी दुकाने, दवाखाने, मेडिकल या सेवा संचारबंदीतून वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे या सेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे. त्याचप्रमाणे भाजीपाला, कांदा, बटाटा मार्केट बंद केले नसून त्या ठिकाणी माथाडी कामगार कामावर जाणार असतील, तर त्यासंबंधी पोलिसांनी सारासार विचार करून त्यांना कामावर जाऊ द्यावे, असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले. शेतकरीही थेट ग्राहकांना भाजीपाला विकू शकतात, परंतु गर्दी होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. जीवनावश्‍यक व अत्यावश्‍यक वस्तूंचा पुरवठा आवश्‍यकतेनुसार व सातत्याने सुरू ठेवण्यासाठी पोलीस व सर्व संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या असल्याचेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले आहे. नागरिकांनी संचारबंदी काळात अनावश्‍यक घराबाहेर पडू नये. तसेच जीवनावश्‍यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी जाताना एकाच व्यक्तिने जावे, संबंधित दुकानांवर जास्त गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. नागरिकांनी कोरोना विषाणूची भीती न बाळगता, सतर्कतेने, स्वच्छता ठेवून व एकमेकांपासून लांब राहून या परिस्थितीचा सामना करावा, असे आवाहनही त्यांनी केले. 

हेही नक्‍की वाचा : मोठी बातमी ! रेल्वेला बसणार 11 हजार कोटींचा फटका 

खबरदार ! ज्यादा दराने वस्तू विकाल सात वर्षांची शिक्षा 
किराणा किंवा इतर जीवनावश्‍यक वस्तू जास्त भावाने विकल्या जाण्याच्या तक्रारी समोर येत आहेत. याबाबत नागरिकांनी जागरूक राहून संबंधित ग्राहक संरक्षण, पोलीस किंवा महसूल अशा यंत्रणांनाकडे त्वरित तक्रार करावी. जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये मास्क आणि सॅनिटायझर यांचाही समावेश असल्याने यात काळाबाजार झाल्यास सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येईल. 
- छगन भुजबळ, अन्न नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven year sentence for selling goods at high rates