शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसेंनी फडकावले बंडाचे निशाण 

4PDR_Mandiyali.jpg
4PDR_Mandiyali.jpg

सोलापूर : पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडे उमेदवारी मागूनही मिळाली नसल्याने महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी बंडखोरीचे निशाण फडकावले आहे. जिल्हा प्रमुख गणेश वानकर, संभाजी शिंदे यांनी मनधरणी करूनही त्या निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. उमेदवारी मागे न घेतल्यास त्यांची पक्षातून हकालपट्टी होऊ शकते, अशी चर्चा आहे.

भगिरथ भालके प्रथमच रिंगणात 
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे आकस्मित निधन झाल्यानंतर त्याठिकाणी आता पोटनिवडणूक लागली आहे. या निवडणुकीत भाजपने समाधान आवताडे यांना संधी दिली. राष्ट्रवादीकडून उमेदवार निश्‍चित झाला नसतानाही भाजपने सर्वप्रथम उमेदवार जाहीर केला. त्यानंतर आवताडे यांना टक्‍कर देण्यासाठी भगिरथ भालके यांना महाविकास आघाडीने उमेदवारी जाहीर केली. समाधान आवताडे यांनी यापूर्वीही निवडणूक लढविली असून भालके प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 

पक्ष संघटनाच्या माध्यमातून पक्षाची ताकद वाढविण्यासाठी गोडसे यांनी मागील काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरु ठेवले. जिल्हा परिषद निवडणुकीत त्या सदस्य म्हणून विजयी झाल्या. त्यांचे काम पाहून पक्षाने त्यांना महिला आघाडीचे जिल्हा प्रमुखपद दिले. तत्पूर्वी, त्यांनी पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्‍त केली. मात्र, महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला गेली. तर भाजप-शिवसेना युतीमुळे मागील विधानसभा निवडणुकीत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची जागा रयत क्रांतीला मिळाली. आता राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची महाविकास आघाडीची सत्ता आल्याने ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडावी लागली. पोटनिवडणुकीत आपल्याला संधी मिळावी, अशी मागणी गोडसे यांनी पक्षाच्या सचिवांकडे केली. दोन्ही जिल्हा प्रमुखांनी त्यांची मागणी वरिष्ठांपर्यंत पोहचविली. मात्र, त्यांच्याकडून काहीच उत्तर न मिळाल्याने अखेर गोडसे यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला. अर्ज माघार घेण्यासाठी आणखी काही दिवस शिल्लक असून उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात त्यांच्याशी बोलणी सुरु असल्याची चर्चा आहे. 

महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांची मदत कोणाला? 
ही निवडणूक दोघांमध्येच होणार असल्याने शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार शैला गोडसे यांना डिपॉझिट वाचविणेही मुश्‍किल होईल, अशी चर्चा शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांमध्ये सुरु आहे. त्यांनी उमेदवारी मागे न घेतल्यास त्यांना पदावरून काढून पक्षातून हाकलपट्टी केली जाईल, अशीही चर्चा आहे. या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेची ताकद भालके यांच्या पाठिशी आहे. तिन्ही पक्षापैकी कोणत्या पक्षातून भालकेंना सर्वाधिक मते मिळाली, यावरून कोणत्या पक्षाने अथवा पदाधिकाऱ्यांनी कोणाला मदत केली, हे स्पष्ट होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com