... तर सोलापूरला बाहेरच्या निधीची गरज नाही : अर्थतज्ज्ञ थोरात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

बीजभाषणात डॉ. संग्राम चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राच्या जल वापराचे व्यवस्थापन नव्याने होणे आवश्‍यक आहे. 85 टक्के पेक्षा जास्त पाणी हे शेती सिंचनासाठी वापरले जाते तर उर्वरित पाण्याचा उद्योग व पिण्यासाठी वापर केला जातो. ऊसासारखे राजकीय पीक घेणे बंद करणे आवश्‍यक आहे. त्यावर होणाऱ्या उत्पादन खर्चापेक्षा त्यातून मिळणारे उत्पन्न हे परवडणारे नाही. म्हणून कमी पाण्याच्या पीकांचा पर्याय निवडणे आवश्‍यक आहे.

पंढरपूर (सोलापूर) : सोलापूर हा कमी पावसाचा जिल्हा आहे. जिल्ह्यात 11 नद्या असून त्यातील काही नद्या या हंगामी वाहणाऱ्या आहेत. या नद्यामध्ये असणाऱ्या वाळूची योग्य पध्दतीने विक्री व वितरण केल्यास सोलापूरसाठी बाहेरून कोणत्याही स्वरुपाचा निधी आणण्याची आवश्‍यकता भासणार नाही. यासाठी प्रामाणिक अधिकारी व नेतृत्वाची आवश्‍यकता आहे. उजनी जलाशयामुळे सोलापूर जिल्हा हा साखर उत्पादनात एक नंबर वर आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आर. आर. थोरात यांनी केले.

हेही वाचा - आगळा वेगळा उपक्रम: शिवराय मनामनात... शिवजयंती घराघरात

सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 15व्या अर्थशास्त्र अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रा. उत्तमराव हुंडेकर, सचिव डॉ. राजाराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. आर. आर. थोरात म्हणाले, सोलापूर जिल्हा हा मराठवाडा व विदर्भाच्या तुलनेत कमी पावसाचा प्रदेश असून देखील मराठवाडा-विदर्भाच्या तुलनेत शेतकरी आत्महत्त्या नगण्य आहेत. येथील शेतकरी शेतीला पुरक म्हणून दुग्धव्यवसाय करतो
प्राचार्य डॉ. अशोक भोईटे म्हणाले की, सोलापूर जिल्हातील व्यवसायात वैविध्यता आहे. बाजारपेठातील स्पर्धा लक्षात घेऊन या व्यवसायाने काळानुरुप आपले स्वरुप बदलले पाहिजे. पंढरपूर या तीर्थक्षेत्राचा सकारात्मक विचार करुन व्यवसायाचे योग्य नियोजन केले पाहिजे. येथे येणाऱ्या भाविकांना दर्जेदार सेवा-सुविधा पुरविण्याचे चांगले अर्थशास्त्र विकसीत करता येते.

हेही वाचा - हालचाली सुरू... यंदाही होणार कृत्रिम पावसाचा प्रयोग

प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. किशोर शिंदे यांनी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. महेंद्र गजधाने यांनी करुन दिला. या कार्यक्रमात अर्थतज्ज्ञ व माजी प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी यांना परिषदेकडून (कै.) प्रा. डॉ. चंद्रकांत भानुमते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सन्मानाला उत्तर देताना प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी म्हणाले, पाणी प्रश्न हा महत्वाचा व भविष्यकाळात गंभीर समस्या निर्माण करणारा आहे. त्यामुळे अभ्यासकांनी चालू पारंपरिक सिंचनाला पर्याय म्हणून अल्प पाण्याचा वापर होणाऱ्या सिंचनाच्या पध्दतींचा शोध लावणे गरजेचे आहे.

हेही वाचा - शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर हे वाचाच... (video)

या अधिवेशनात विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्राध्यापकांनी सोलापूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था व धार्मिक पर्यटनाचे अर्थशास्त्र या विषयावर संशोधन पेपर सादर केले. या अधिवेशनास डॉ. शंकर पाटील, डॉ. भगवंत कुलकर्णी, डॉ. रावसाहेब ढवण, डॉ. बद्रीनाथ दामजी, डॉ. संतोष कदम, कला विभागाचे अधिष्ठाता प्रोफेसर डॉ. तानाजी लोखंडे, विज्ञान विभागाचे अधिष्ठाता प्रोफेसर डॉ. सुरेश पाटील, विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिष्ठाता डॉ. सुखदेव शिंदे, वेगवेगळ्या महाविद्यालयातून आलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. अलका घोडके यांनी केले. ही परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ. मधुकर जडल, डॉ. अप्पासाहेब चौगुले, प्रा. शैलेंद्र सोनवले, प्रा. संतोष काळे, प्रा. राजेंद्र मोरे, कार्यालयीन प्रमुख अनंता जाधव, अभिजीत जाधव, गणेश वायाळ, सुरेश मोहिते यांनी परिश्रम घेतले. आभार प्रा. डॉ. सदाशिव बनकर यांनी मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: So Solapur will not need external funding say Economist Thorat