कोरोनात भर म्हणून की काय, "पंचवीस चार'वर पंतप्रधान मोदींच्या "या' योजनेचा उडाला बोजवारा

प्रदीप बोरावके
Tuesday, 7 July 2020

पंचवीस चार हे अकलूज-टेंभुर्णी राज्य मार्गाच्या दक्षिणेकडील भाग, लवंग व उत्तरेकडील भाग तांबवे ग्रामपंचायतमध्ये विभागला आहे. येथील नागरिक अकलूज-टेंभुर्णी रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा वापर शौचविधी उरकण्यासाठी करीत आहेत. त्यामुळे या मार्गावरून जाताना प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शिवाय येथे माध्यमिक शाळा, व्यापारी संकुल, हॉटेल, विविध कार्यालये रस्त्याला लागूनच आहेत. नागरिक रस्त्याच्या बाजूला उघड्यावरच शौचास जात असल्याने ही बाब शाळेतील विद्यार्थी व नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक आहे. 

माळीनगर (सोलापूर) : "स्वच्छ भारत अभियान' ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी असलेली योजना पंचवीस चार (ता. माळशिरस) या भागात अजूनही पोचलेली दिसत नाही. येथील नागरिक अकलूज - टेंभुर्णी या प्रमुख रस्त्याच्या बाजूचा वापर शौचविधी उरकण्यासाठी म्हणून करीत असल्याने पंतप्रधान मोदी यांच्या स्वच्छ भारत योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून येते. 

हेही वाचा : बार्शी शहर व तालुक्‍यात पोलिसांचा दंडात्मक कारवाईचा बडगा 

पंचवीस चार हे अकलूज-टेंभुर्णी राज्य मार्गावर असलेले एक महत्त्वाचे ठिकाण आहे. या रस्त्याच्या दक्षिणेकडील भाग लवंग व उत्तरेकडील भाग तांबवे ग्रामपंचायतमध्ये हा रस्ता विभागला आहे. येथील नागरिक अकलूज-टेंभुर्णी रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा वापर शौचविधी उरकण्यासाठी करीत आहेत. त्यामुळे या मार्गावरून जाताना प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. शिवाय येथे माध्यमिक शाळा, व्यापारी संकुल, हॉटेल, विविध कार्यालये रस्त्याला लागूनच आहेत. नागरिक रस्त्याच्या बाजूला उघड्यावरच शौचास जात असल्याने ही बाब शाळेतील विद्यार्थी व नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक आहे. यामुळे परिसरात रोगराई पसरून रोगराईला तोंड देण्याची वेळ येथील नागरिकांवर येणार आहे. एकीकडे कोरोना या महाभयंकर विषाणूचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे अस्वच्छता, दुर्गंधीमुळे नागरिक दुहेरी संकटात सापडणार आहेत. येथून जवळच पायरी पूल हा भाग महाळुंग व तांबवे ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट आहे. तेथेही पंचवीस चारसारखीच अवस्था आहे. पंचवीस चार व पायरी पूल भागातील अनेक नागरिकांची गुजराण मोलमजुरीवर अवलंबून आहे. त्यामुळे त्या नागरिकांना वैयक्तिक स्वच्छतागृह बांधणे शक्‍य नाही. 

हेही वाचा : "या' शहरात कॉंग्रेसचा आहे लॉकडाउनला विरोध 

तिन्ही ग्रामपंचायतींकडून येथे सार्वजनिक स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही. पंचायत समितीचे "गुड मॉर्निंग पथक' अद्यापही या भागात गेलेले दिसत नाही. तिन्ही ग्रामपंचायतींनी येथील नागरिकांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधणे गरजेचे आहे अथवा प्रशासनाने वैयक्तिक स्वच्छतागृह बांधण्यासाठी तेथील नागरिकांचे प्रबोधन करून त्यांना शासनातर्फे अनुदान द्यायला हवे. जिल्हा परिषद व माळशिरस पंचायत समितीच्या स्वच्छता विभागाने या भागात "स्वच्छ भारत अभियान' प्राधान्याने राबवायला हवे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The state road from Akluj to Tembhurni became a public toilet