पंढरपूर तालुक्यायात भीमेतून खुलेआम वाळू चोरी 

भारत नागणे
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

पंढरपूर (जि. सोलापूर) ः मागील काही दिवसांपासून भीमा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. हीच नामी संधी साधून वाळूमाफियांची उघड्या पडलेल्या भीमा नदीपात्रातून खुलेआम वाळू चोरी सुरू आहे. रात्रंदिवस सुरू असलेल्या वाळू चोरीमुळे नदीचे पात्र धोक्‍यात आले आहे. वाळूचोरीचा हा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहून देखील महसूल आणि पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

पंढरपूर (जि. सोलापूर) ः मागील काही दिवसांपासून भीमा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. हीच नामी संधी साधून वाळूमाफियांची उघड्या पडलेल्या भीमा नदीपात्रातून खुलेआम वाळू चोरी सुरू आहे. रात्रंदिवस सुरू असलेल्या वाळू चोरीमुळे नदीचे पात्र धोक्‍यात आले आहे. वाळूचोरीचा हा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहून देखील महसूल आणि पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. दरम्यान, तालुक्‍यात सुरू असलेल्या वाळू चोरीचा बोभाटा जिल्हाभर सुरू झाल्यानंतर आज महसूल प्रशासनाने तकलादू कारवाईचे नाटक केले आहे. 

हेही वाचा - कारखानदारांना आगामी गाळप हंगामाची आत्तापासूनच चिंता

वाळू उपशाला आणि वाहतुकीला राज्य शासनानेच बंदी घातली आहे. गेल्या दोन वर्षांपासून वाळू लिलाव झाले नसल्याने वाळूला सोन्याचा भाव आला आहे. त्यातच पंढरपूर शहर व परिसरात अनेक नवीन बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे वाळूला मागणी वाढली आहे. वाढत्या मागणीमुळे वाळूचे दरही गगनाला भिडले आहेत. अशा दुहेरी संधीमुळे तालुक्‍यात वाळूमाफियांची संख्या वाढली आहे. 
तालुक्‍यातील सुस्ते, सरकोली, मुंढेवाडी, चळे, शिरढोण, शेळवे, इसबावी, भटुंबरे, चिंचोली या भागातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. या भागातील काही वाळूमाफियांनी राजकीय नेत्यांच्या आश्रयाने नवीन धंदा मांडल्याची चर्चा देखील सुरू आहे. 

हेही वाचा - वडिलानेच दिली मुलाच्या खुनाची सुपारी

तालुक्‍यातील भीमा नदीपात्रातून काढलेली वाळू पुणे, कोल्हापूर, सांगलीपर्यंत पाठवली जात आहे. वाळू चोरीतून मोठ्या प्रमाणावर अर्थकारण वाढले आहे. त्यामुळे नदीकाठच्या अनेक गावांमध्ये हाणामारीचे प्रकारही घडले आहेत. गेल्या 15 दिवसांपूर्वीच पंढरपूर शहरात वाळू चोरीच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण करण्यात आली होती. मारहाणीचे प्रकरण ताजे असतानाच जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सरकोली, आंबे येथे छापे टाकून वाळूमाफियांवर कारवाई केली होती. परंतु वाळू चोरीसाठी चटावलेल्या माफियांचे कारनामे कारवाईनंतरही सुरूच आहेत. 

हेही वाचा - मास्तरांच्या संघर्षाला प्रेमाची किनार

उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. पाणी येण्यापूर्वी वाळूमाफियांच्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. दोन दिवसांपासून भीमा नदीपात्राची अक्षरश: लूट सुरू आहे. सुस्ते व सरकोली या भागात वाळू चोरीचे सर्वाधिक प्रमाण आहे. यामध्ये दिवसभर राजकीय नेत्यांच्या गाडीत फिरणारे रात्रभर भीमा नदीच्या पात्रात वाळू चोरीसाठी फिरत असल्याची चर्चाही नदीकाठच्या गावांमध्ये सुरू आहे. पंढरपूर तालुक्‍यातील वाळू चोरीचे रॅकेट जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पोलिस अधीक्षक मनोज पाटील कसे मोडून काढणार, याकडे लक्ष लागले आहे. 
वाळूसाठा जप्त, माफिया फरार 
तालुक्‍यात भीमा नदीकाठच्या सर्रास गावांमधून वाळू चोरी सुरू आहे. वाळू चोरी सुरू असल्याची माहिती पोलिस आणि महसूल प्रशासनाला असतानाही कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे. मागील दोन दिवसांपासून येथील वाळू चोरीचा बोभाटा जिल्हाभर झाल्यानंतर आज महसूल प्रशासनाने शेळवे येथील वाळू साठ्यावर कारवाई करत सुमारे 70 ब्रास वाळू जप्त केली. परंतु यामध्ये कोणावरही कारवाई केली नाही. त्यामुळे महसूल प्रशासनाचे कारवाईचे नाटक असल्याची चर्चा सुरू आहे. 

महाराष्ट्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stealing sand openly from Bhima river pandharpur