पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने होणार अध्यासन केंद्र

vidyapith.jpg
vidyapith.jpg

सोलापूरः एक कर्तृत्ववान, उत्तम प्रशासक, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आदर्शवादी व महान कार्य आजच्या विद्यार्थ्यांना समजावे, अभ्यासता यावे यासाठी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने सोलापूर विद्यापीठामध्ये अध्यासन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. 


पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी यांनी त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांचे सासरे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभाराची जबाबदारी स्विकारली. सुभेदार मल्हारराव होळकरांकडे इंदूर संस्थानची जहागीर होती. दौलतीचा कारभार मोठा होता. सुभेदार होळकरांचे निधन झाल्यावर अहिल्यादेवींवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली.

अठ्ठावीस वर्षे त्यांनी राज्यकारभाराचा गाडा अतिशय कुशलपणे चालविला. राज्याच्या तिजोरीत भर घालीत त्यांनी प्रजाहिताकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. त्यांच्या भव्य कार्यासाठी त्यांची धर्मपरायण आणि उदारवृत्ती कारणीभूत ठरली. त्या सुधारणावादी राज्यकर्ती होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली. वतन हक्कांचे संरक्षण करून गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले. त्यावेळी डोंगर मुलखातून भिल्ल व गोंड आदिवासींशी संवाद साधून भीलकवडी कराची रचना व त्यांच्याकडून पडिक जमिनींची लागवड करून घेतली. शिवाय त्यांना विशिष्ट हद्द नेमून दिली. जमीन करार-पट्ट्याने देण्याची पद्धत सुरू केली. 
त्यांनी राज्याची राजधानी इंदूरहून नर्मदातीरी महेश्‍वरला हलविली. त्यांनी अनेक वास्तूची उभारणी, नदीला घाट बांधणे, मंदिरांचा जीर्णोद्धार केला. पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या.  अहिल्यादेवी यांनी वस्त्रोद्योगास उत्तेजन देत उत्तम हातमागाची सणंगे तयार होतील अशी पेठ कायम केली. होळकरांच्या टांकसाळीतील नाण्यांवर बिल्वपत्र व शिवलिंग यांचे छाप असत. 

जागा निश्‍चितीचे काम पूर्ण 
पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर यांचा मोठा पुतळा विद्यापीठात उभारला जाणार आहे. यासाठी जागा निश्‍चितीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. प्रसिद्ध व नामवंत कलाकारांकडून पुतळा बनवण्याचे काम केले जाणार आहे. त्याचबरोबर नवी दिल्लीच्या विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्यशासनाकडे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अध्यासन केंद्राबाबत प्रस्ताव पाठविला आहे. त्याचेही काम लवकरच पूर्ण होईल. अध्यासन केंद्रामूळे खऱ्या अर्थाने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये पूण्यश्‍लोक अहिल्यादेवींच्या कार्याबद्दल अभ्यास आणि संशोधनाचे काम वेगाने पुढे जाईल. 
कुलगुरू डॉ. मृणालीनी फडणवीस 
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com