पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बॅंकांवर कारवाई करा : "स्वाभिमानी'ची तहसीलदारांकडे मागणी

हुकूम मुलाणी
Thursday, 10 September 2020

मागील दोन-चार वर्षात दुष्काळामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला होता. अशा परिस्थितीत शासनाच्या महात्मा फुले कर्जमाफी योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून बहुतांश शेतकरी कर्जमुक्त झाले. परंतु त्यांना नव्याने कर्ज वितरित करण्यासाठी बॅंकांकडून अडवणूक केली जात आहे. ऑनलाइन अर्ज करूनदेखील बॅंकांकडून अजूनही बहुतांश शेतकऱ्यांना कर्ज वितरण करण्यात आले नाही. 

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यात खरीप व बागायत क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यासाठी बहुतांश राष्ट्रीयीकृत व सहकारी बॅंकांकडून अडवणूक केली जात असल्यामुळे या बॅंकांवर कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार स्वप्नील रावडे यांना निवेदन देण्यात आले. 

हेही वाचा : पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई : गोवा बनावटीच्या अवैध दारूसह 4 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त ! 

मागील दोन-चार वर्षात दुष्काळामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला होता. अशा परिस्थितीत शासनाच्या महात्मा फुले कर्जमाफी योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून बहुतांश शेतकरी कर्जमुक्त झाले. परंतु त्यांना नव्याने कर्ज वितरित करण्यासाठी बॅंकांकडून अडवणूक केली जात आहे, तर प्रशासनाने पीक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना शेतकऱ्यांना दिल्या होत्या. परंतु ऑनलाइन अर्ज करूनदेखील बॅंकांकडून अजूनही बहुतांश शेतकऱ्यांना कर्ज वितरण करण्यात आले नाही. वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ केली जात आहे. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अडवणूक करू नये, असे शासनाचे आदेश असताना अनेक बॅंका शेतकऱ्यांना पीककर्ज देताना नाहक त्रास देत आहेत. या बॅंकांवर कारवाई न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला. 

हेही वाचा : सोलापूर ते उजनी पाइपलाइनच्या कामाला प्रारंभ ! सोलापूकरांना "या' दिवसापासून मिळणार नियमित पाणी 

तालुक्‍यातील एका बॅंकेच्या माचणूर व अरळी येथील शाखेत शेतकऱ्यांनी कर्ज मागणी केल्यानंतर तीन महिने शेतकऱ्यांकडून विविध कागदपत्रांची मागणी करण्यात आली. कोरोना आजाराची भीती असताना शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तताही केली. तरीही शेवटी सी-बिल खराब आहे आदी वेगवेगळी कारणे सांगून शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देण्यात आला. याशिवाय अनेक राष्ट्रीयीकृत बॅंका व जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून पीककर्ज मिळावे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी निश्‍चित केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज केले. या अर्जातील किती शेतकऱ्यांना कर्ज वितरित केले व किती शेतकऱ्यांना ताटकळत ठेवले याची चौकशी करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

तर तालुक्‍यातील काही अशिक्षित शेतकरी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी गावालगत असलेल्या बॅंकेत हेलपाटे मारू लागले पण बॅंकेचे अधिकारी मात्र या शेतकऱ्यांना अपेक्षित सहकार्य करत नाहीत. बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पीककर्ज वाटपाचे 80 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात किती लोकांना याचा लाभ मिळाला याची देखील चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. राहुल घुले, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, शहराध्यक्ष हर्षद डोरले, नंदूर शाखाध्यक्ष शंकर संगशेट्टी, महादेव येडगे, राजेंद्र चव्हाण व तक्रारदार शेतकरी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swabhimani Shetkari Sanghatana demands action against banks for evading crop loans