सोलापूर ते उजनी पाइपलाइनच्या कामाला प्रारंभ ! सोलापूकरांना "या' दिवसापासून मिळणार नियमित पाणी 

तात्या लांडगे 
Thursday, 10 September 2020

उजनी ते सोलापूर पाइपलाइनसाठी जमिनीखालून पाइपलाइन टाकण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व भूमी व अभिलेखाच्या अधीक्षकांमार्फत सीमांकन व मोजणीचे काम हाती घेण्यात आले आहे. उजनी जलाशय येथे पंपिंग स्टेशनसाठी 0.25 हेक्‍टर जागा मिळावी म्हणून महापालिकेने जलसंपदा विभागाला पत्र पाठविले आहे. त्या ठिकाणी जॅकवेल बांधणे, पंपिंग स्टेशन व पंपिंग मशिनरी, रायझिंग मेन ग्रॅव्हिटी मेन अशी कामे होणार आहेत. 

सोलापूर : शहराची 2033 ची लोकसंख्या विचारात घेऊन उजनी ते सोलापूर दुहेरी पाइपलाइनच्या कामाला बुधवारी (ता. 9) प्रत्यक्षात सुरवात झाली. 110 एमएलडी (दशलक्ष लिटर) पाणी सोलापूरकरांना वाढीव मिळणार आहे. त्यासाठी 449.64 कोटींचा खर्च अपेक्षित असून त्यापैकी 250 कोटी एनटीपीसीतर्फे मिळणार आहेत, तर 200 कोटींचा खर्च स्मार्ट सिटीतून केला जाणार आहे. या कामासाठी हैदराबाद येथील पोचमपाड कन्स्ट्रक्‍शन कंपनीची निवड केली असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास या कामाच्या देखरेखीसाठी व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्‍त करण्यात आले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर (फेब्रुवारी 2022) शहरवासीयांना नियमित पाणी मिळेल, असा विश्‍वास अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला. 

हेही वाचा : आमदार प्रशांत परिचारक शुक्रवारपासून लोकांना भेटणार 

जमिनीखालून पाइपलाइन टाकण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व भूमी व अभिलेखाच्या अधीक्षकांमार्फत सीमांकन व मोजणीचे काम हाती घेण्यात आले आहे. उजनी जलाशय येथे पंपिंग स्टेशनसाठी 0.25 हेक्‍टर जागा मिळावी म्हणून महापालिकेने जलसंपदा विभागाला पत्र पाठविले आहे. त्या ठिकाणी जॅकवेल बांधणे, पंपिंग स्टेशन व पंपिंग मशिनरी, रायझिंग मेन ग्रॅव्हिटी मेन अशी कामे होणार आहेत. उजनी ते वरवडेदरम्यान (28.5 किलोमीटर) दाबनलिका तर वरवडे ते सोरेगावपर्यंत (81.5 किलोमीटर) उतारनलिका टाकली जाणार आहे. आजपासून या कामासाठी पाइप आणले जात असून पहिल्याच दिवशी 15 किलोमीटरपर्यंत पाइप टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. 

हेही वाचा : महापालिकेला 130 कोटींचा हिशेब लागेना! "या' विभागप्रमुखांना आयुक्तांकडून कारवाईचे पत्र 

थाटात पार पडले उद्‌घाटन 
सोलापूर ते उजनी दुहेरी पाइपलाइनच्या कामाचा प्रारंभ बुधवारी (ता. 9) पार पडला. या वेळी खासदार जयसिद्धेश्‍वर महास्वामी, महापौर श्रीकांचना यन्नम, उपमहापौर राजेश काळे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक ढेंगळे-पाटील, सभागृहनेता श्रीनिवास करली, नगरसेवक आनंद चंदनशिवे, चेतन नरोटे, रियाज खरादी, परिवहन सभापती जय साळुंखे, डाळिंब संशोधन केंद्राचे प्रशासकीय अधिकारी श्री. रॉय, संचालिका ज्योत्स्ना शर्मा, स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी संजय धनशेट्टी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता श्री. भांडेकर, पोचमपाड कंपनीचे श्रीनिवास राव आदींच्या उपस्थितीत कामाचे उद्‌घाटन झाले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Work on Ujani to Solapur water pipeline started