"शिक्षक आपल्या दारी'तून वाढतेय शिक्षणाची गोडी ! "मनपा'च्या उपक्रमात 152 शिक्षकांनी घेतला पुढाकार 

तात्या लांडगे 
Thursday, 10 September 2020

कोरोनामुळे शाळांचे कुलूप अद्याप उघडलेले नाही. तत्पूर्वी, महापालिका शिक्षण मंडळाने किती पालकांकडे ऍन्ड्रॉईड व साधे मोबाईल आहेत आणि किती जणांकडे मोबाईलच नाहीत, याची माहिती संकलित केली. त्यानुसार ज्या पालकांकडे मोबाईल नाहीत किंवा साधे मोबाईल आहेत, त्यांच्याशी संपर्क करून महापालिकेचे शिक्षक दररोज अर्धा तास शिकवणी घेत आहेत. 

सोलापूर : "शाळा बंद पण शिक्षण सुरू' या उपक्रमाअंतर्गत राज्यातील दोन कोटी विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोचत असल्याचा दावा शालेय शिक्षण विभागाने केला आहे. मात्र, बहुतांश पालकांकडे ऍन्ड्रॉईड मोबाईल नाहीत. अशा मुलांची शिक्षणाची गोडी कायम राहावी, शाळेपासून ते दुरावू नयेत म्हणून सोलापूर महापालिका शिक्षण मंडळाने "शिक्षक आपल्या दारी' हा उपक्रम सुरू केला आहे. शाळा बंद असतानाही महापालिकेच्या शाळांमधील 152 शिक्षक मुलांची सुरक्षितता व आरोग्य जोपासून घरबसल्या शिक्षण देत आहेत. 

हेही वाचा : पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई : गोवा बनावटीच्या अवैध दारूसह 4 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त ! 

कोरोनामुळे शाळांचे कुलूप अद्याप उघडलेले नाही. तत्पूर्वी, महापालिका शिक्षण मंडळाने किती पालकांकडे ऍन्ड्रॉईड व साधे मोबाईल आहेत आणि किती जणांकडे मोबाईलच नाहीत, याची माहिती संकलित केली. त्यानुसार ज्या पालकांकडे मोबाईल नाहीत किंवा साधे मोबाईल आहेत, त्यांच्याशी संपर्क करून महापालिकेचे शिक्षक दररोज अर्धा तास शिकवणी घेत आहेत. त्या वेळी स्वच्छता व सॅनिटायझरचा वापर करीत मुलांच्या सुरक्षिततेची व आरोग्याचीही खबरदारी घेतली जात आहे. तत्पूर्वी, शिक्षण मंडळाने "गृहभेट' या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन स्वाध्याय संच पोच केले आहेत. त्याचा दर आठवड्याला आढावा घेतला जात असून त्यातून मुलांच्या प्रगतीचे मूल्यमापन होऊ लागले आहे. मात्र, स्वाध्याय संच असो की अन्य उपक्रमांसाठी महापालिकेकडून शिक्षणासाठी एक दमडाही मिळाला नसून बजेट न झाल्याचे कारण पुढे केले जात आहे. 

हेही वाचा : सोलापूर ते उजनी पाइपलाइनच्या कामाला प्रारंभ ! सोलापूकरांना "या' दिवसापासून मिळणार नियमित पाणी 

याबाबत महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी कादर शेख म्हणाले, शहरातील विडी कामगारांसह हातावरील पोट असलेल्या पालकांच्या मुलांची सध्याच्या कठीण काळातही शिक्षणाची गोडी कायम राहावी, या हेतूने विविध उपक्रम राबविले जात आहेत. "शिक्षक आपल्या दारी' या उपक्रमातून सुमारे दीडशे शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना शिक्षण देऊ लागले आहेत. 

महापालिका शाळांची स्थिती 

 • एकूण शाळा : 64 
 • प्रवेशित विद्यार्थी : 6,090 
 • मोबाईल नसलेले पालक : 930 
 • साधे मोबाईलधारक : 3,900 
 • शिक्षक संख्या : 202 

ठळक बाबी... 

 • महापालिकेच्या शाळांमधील सहा हजारांपैकी साडेचार हजार पालकांकडे ऍन्ड्रॉईड मोबाईल नाहीत 
 • मोबाइल नसलेल्या सुमारे साडेपाचशे विद्यार्थ्यांपर्यंत दररोज पोचत आहेत दीडशे शिक्षक 
 • "कोविड-19'च्या ड्यूटीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास येत आहेत अडचणी 
 • महापालिका शाळांमधील 202 शिक्षकांपैकी पाच शिक्षक-शिक्षिकांना झाला कोरोना 
 • गरजू विद्यार्थ्यांसाठी महापालिकेकडे टॅबची मागणी; स्वाध्याय संचसाठीही मिळेना महापालिकेकडून निधी 
 • संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers of Municipal Education Department participated in shikshak aaplya daari initiative