नगरसचिवाची उचलबांगडी ! "हे' आहे नेमके कारण; महापौरांनी दिले स्पष्टीकरण 

तात्या लांडगे 
Saturday, 12 September 2020

महापौर श्रीकांचना यन्नम म्हणाल्या, नगरसचिवांनी चुकीची माहिती देऊन आमच्यात भांडणे लावली, परस्पर निर्णय घेतल्याने विकासकामात अडचणी निर्माण होऊ लागल्यानेच त्यांची बदली करण्याची मागणी आयुक्‍त पी. शिवशंकर यांच्याकडे केली होती. महापालिका आयुक्‍त, महापौर यांच्यासह अन्य पदाधिकारी व अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या गोपनीय चर्चा, विषयांची माहिती नगरसचिव विभागाच्या माध्यमातून बाहेर जात होती. अनेकदा महत्त्वाची कागदपत्रेही माध्यमांना तथा विरोधकांना नगरसचिव कार्यालयातून पोचली. पदाधिकाऱ्यांनी सांगूनही नगरसचिवांनी त्यांचे न ऐकता परस्पर निर्णय घेण्याचा धडाका लावला होता. 

सोलापूर : शहराच्या विकासकामांचे महत्त्वाचे विषय सर्वसाधारण सभेत ठेवणे, सभांचे नियोजन करणे अशी प्रमुख कामे असतानाही परस्पर निर्णय घेत विरोधकांना गोपनीय माहिती पुरविल्याचा ठपका ठेवून नगरसचिव रऊफ बागवान यांची उचलबांगडी झाल्याचे समोर आले आहे. 

हेही वाचा : एका पावसाने मिळाली जीवनास कलाटणी ! लिंबोळ्या वेचण्याचे सोडून शाळा शिकलो म्हणून आज आयएएस झालो 

त्यानंतर एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी गटनेत्यांच्या आरोपावर महापौर श्रीकांचना यन्नम म्हणाल्या, नगरसचिवांनी चुकीची माहिती देऊन आमच्यात भांडणे लावली, परस्पर निर्णय घेतल्याने विकासकामात अडचणी निर्माण होऊ लागल्यानेच त्यांची बदली करण्याची मागणी आयुक्‍त पी. शिवशंकर यांच्याकडे केली होती. 
महापालिका आयुक्‍त, महापौर यांच्यासह अन्य पदाधिकारी व अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या गोपनीय चर्चा, विषयांची माहिती नगरसचिव विभागाच्या माध्यमातून बाहेर जात होती. अनेकदा महत्त्वाची कागदपत्रेही माध्यमांना तथा विरोधकांना नगरसचिव कार्यालयातून पोचली. पदाधिकाऱ्यांनी सांगूनही नगरसचिवांनी त्यांचे न ऐकता परस्पर निर्णय घेण्याचा धडाका लावला होता. पदाधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन दोघांमध्ये भांडणेही लावली. अनेकदा मी भांडणे मिटविली, असे महापौर यन्नम म्हणाल्या. तत्पूर्वी, सर्वसाधारण सभेत 90 दिवस चर्चा न झालेले 44 विषय शासनाकडे पाठविले. कायद्यानुसार कार्यवाही केली, परंतु त्यापूर्वी महापौर म्हणून मला सांगायला हवे असतानाही त्यांनी काहीच सांगितले नाही, असेही महापौर म्हणाल्या. 

हेही वाचा : "परिवहन'च्या खासगीकरणाचा प्रस्ताव ! वर्षात संपणार बसेसचे आर्युमान; 39 कोटींच्या बोजाचा प्रश्‍न 

एमआयएमचे गटनेते रियाज खरादी म्हणाले, सर्वधारण सभेत चर्चा न झालेले विषय 90 दिवसांनंतर कायद्यानुसार शासनाकडे पाठवणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार नगरसचिव रऊफ बागवान यांनी ते 44 विषय आयुक्‍तांकडे पाठविले. मात्र, या विषयांत सत्ताधाऱ्यांना मलिदा न मिळाल्याने सूडबुद्धीने नगरसचिवांची बदली करण्यात आली असून याची चौकशी करावी. 

वंचित बहुजन आघाडीचे गटनेते आनंद चंदनशिवे म्हणाले, सत्तेचा गैरवापर करून सत्ताधाऱ्यांनी चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली केली आहे. एक वर्षापासून नगरसचिव रऊफ बागवान चांगले काम करीत होते. चुकीच्या पद्धतीने त्यांची हकालपट्टी झाल्याने आगामी सर्वसाधारण सभेत त्याबद्दल सत्ताधाऱ्यांना जाब विचारला जाईल. 

महेश कोठेंकडे ती कागदपत्रे पोचलीच कशी? 
नगरोत्थान योजनेअंतर्गत शासन आणि महापालिकेच्या हिश्‍श्‍यातून 13 कोटी 90 लाखांची कामे होणार आहेत. मात्र, सत्ताधारी नगरसेवकांना अधिक निधी आणि अन्य नगरसेवकांना कमी तर काहींना निधीच मिळालेला नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी कागदपत्रांसह केला. याबाबत गटनेत्यांनी नगरसचिवांकडे चौकशी करावी, असे आवाहन केले. विरोधी पक्षनेत्यांकडे ही कागदपत्रे पोचलीच कशी, असा प्रश्‍न उपस्थित झाला. त्यानंतर काही नगरसेवकांनी नगरसचिवांना काढून टाकण्याची मागणी महापौरांकडे केली. त्यानंतर महापौरांनी आयुक्‍त पी. शिवशंकर यांना तत्कालीन आयुक्‍त दीपक तावरे यांना दिलेल्या पत्राची आठवण करून देत त्यांची बदली करण्याचा हट्ट धरला. आयुक्‍तांनी त्यांची मागणी मान्य करीत बागवान यांना हटवून प्रवीण दंतकाळे यांची त्या ठिकाणी नियुक्‍ती केली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: As there was a quarrel among the party corporators the city secretary was transferred to another division