आम्ही कलावंतांनी कोणता गुन्हा केला? बॅंड-बॅंजो कलाकारांचा शासनाला सवाल

शांतिलाल काशीद 
Tuesday, 8 September 2020

राज्यात हॉटेल सुरू झाले, लालपरी रस्त्यावर धावली, मॉल सुरू झाले, दारूची दुकाने सुरू झाली, उद्योग तसेच विविध व्यवसायही सुरू झाले मग आम्ही कलावंतांनी कोणता गुन्हा केला? शासनाने आमच्या मागण्या मान्य करून येणाऱ्या नवरात्र उत्सवात बॅंड-बॅंजो वाजवण्याची परवानगी द्यावी. आम्हीही सोशल डिस्टन्सिंग पाळतो. सरकारने आमच्या भावनांचा व मागण्यांचा सहानुभूतिपूर्वक विचार करावा, अशी मागणी मळेगाव, ढाळे पिंपळगाव, पिंपरी, साकत, उपळे येथील बॅंड-बॅंजो पथकांकडून होत आहे. 

मळेगाव (सोलापूर) : कोरोनाच्या दलदलीत बॅंजो रुतून बसल्याने ढाळे पिंपळगाव येथील गायक, वादक व इतर कलाकार मंडळींवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यात संचारबंदी लागू केल्यापासून विविध धार्मिक, सांस्कृतिक, लग्न समारंभ, यात्रा, जत्रा व उत्सव आदी कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कलाकार मंडळींवर उपासमारीची वेळ आली आहे. 

हेही वाचा : अरेव्वा ! तंत्रस्नेही विद्यार्थिनी बनल्या ऑनलाइन शिक्षिका ! 800 मुलींनी घेतला सहभाग 

गेल्या सहा ते सात महिन्यांपासून कला सादर करण्याची परवानगी नसल्याने ढाळे पिंपळगाव येथील बॅंजो मालक रामचंद्र वामन भडकवाड व त्यांचे सहकारी अनिल भडकवाड, सुनील भडकवाड, नागनाथ खंदारे, सिद्धेश्वर खंदारे, संतोष खंदारे, बाबासाहेब खंदारे, दत्ता खंदारे, सूरज खंदारे, भागवत देडे, बाळासाहेब कांबळे यांच्यावर मजुरी करणे व शेळ्या राखण्याची वेळ आली आहे. रामचंद्र भडकवाड यांचा गेल्या 25 वर्षांपासून व्यवसाय सुरू आहे. मुलगा अनिल भडकवाड यास प्राथमिक शिक्षक बनवण्याच्या जिद्दीने व्यवसायाचा आधार घेत डीटीएडचे शिक्षण पूर्ण केले. मात्र वाढत्या बेरोजगारीमुळे व शासकीय अनास्थेमुळे मुलाला शिक्षक बनवण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले. परिस्थिती हलाखीची असल्याने कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी त्यांनी मोठा मुलगा सुनील व लहान मुलगा अनिल यास गायन व वादनाचे धडे देण्याचा ठाम निर्णय घेतला. नव्या उमेदीने व जोमाने व्यवसायही सुरू केला. मात्र राज्यात कोरोनाचा कहर सुरू झाल्याने बॅंजो वाजवण्यास बंदी घालण्यात आली. बॅंड-बॅंजो कलाकारांचे जीवन पूर्णपणे या व्यवसायावरच अवलंबून आहे. 

हेही वाचा : ऑनलाइन शिक्षणात शिक्षिकाच लई भारी! "एवढ्या' विद्यार्थ्यांच्या घरांपर्यंत पोचविले शिक्षण 

राज्यात हॉटेल सुरू झाले, लालपरी रस्त्यावर धावली, मॉल सुरू झाले, दारूची दुकाने सुरू झाली, उद्योग तसेच विविध व्यवसायही सुरू झाले मग आम्ही कलावंतांनी कोणता गुन्हा केला, असा सवाल शासन दरबारी विचारला जातो आहे. शासनाने आमच्या मागण्या मान्य करून येणाऱ्या नवरात्र उत्सवात बॅंड-बॅंजो वाजवण्याची परवानगी द्यावी. आम्हीही सोशल डिस्टन्सिंग पाळतो. सरकारने आमच्या भावनांचा व मागण्यांचा सहानुभूतिपूर्वक विचार करावा, अशी मागणी मळेगाव, ढाळे पिंपळगाव, पिंपरी, साकत, उपळे येथील बॅंड-बॅंजो पथकांकडून होत आहे. 

ढाळे पिंपळगाव येथील बॅंड-बॅंजोचे मालक रामचंद्र भडकवाड म्हणाले, 25 वर्षांच्या कालखंडात प्रथमच सहा ते सात महिने व्यवसाय ठप्प झाला. त्यामुळे पोटाची खळगी भरायची कशी, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनाने येणाऱ्या नवरात्र उत्सव काळात तसेच लग्न समारंभात आम्हाला बॅंड-बॅंजो वाजवण्याची परवानगी द्यावी; नसेल तर आम्हाला दरमहा वेतन देऊन आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवावा. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Time of starvation on band-banjo performers due to lockdown