
पंढरपूर, मोहोळ, वैराग, मळेगाव, चिखर्डे, पांगरी, येरमाळा, तुळजापूर आदी प्रमुख तिर्थक्षेत्रांना जोडणारा हा मार्ग जवळचा आहे.
वैराग (सोलापूर) : वैराग- हिंगणी चिखर्डे हा जिल्हा मार्ग-३० हा वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या मार्गावरील हिंगणीजवळचा भोगावती नदीवरील पूल अतिवृष्टी पावसाने वाहून गेल्याने केवळ चारफुट रस्ता पुलावरून धोका पत्कारून वाहनधारकांना वाहतूक करावी लागत आहे. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा या राज्यांच्या प्रमुख मार्गांना जोडणारा हा मार्ग महत्वाचा आहे.
पंढरपूर, मोहोळ, वैराग, मळेगाव, चिखर्डे, पांगरी, येरमाळा, तुळजापूर आदी प्रमुख तिर्थक्षेत्रांना जोडणारा हा मार्ग जवळचा आहे. या मार्गाने शेतीच्या निर्यात द्राक्ष, डाळींब मालांसाठी लातूर, हैद्राबाद, औरंगाबाद आदी बाजारपेठेसाठी या मार्गावरून मोठी वाहतूक होत आहे. मात्र हा मार्ग अनेक वळणे, खड्डेमय व पुलधोक्याचा बनला आहे. दरम्यान हा मार्ग दुरुस्तीसाठी १५० लाख रूपयांची ई -ऑनलाईन निवीदा मंजुरी झालेली असून बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या कामास विलंब होताना दिसत असल्याचा आरोप या मार्गावरील वाहनधारकांतून होत आहे.
वैराग, हिंगणी, मळेगाव, चिखर्डे, गोरमाळे, पांगरी उक्कडगाव ते जिल्हा मार्ग या कामाच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ई - ऑनलाईन निवीदा मागवली आहे. शिवाय बार्शी तालुक्यात 'काटेगाव ,चारे, पाथरी, कारी ते जिल्हा हद्द या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक - 29 किमी -8/ oo ते 15/5OO मध्ये सुधारणा करणे या कामासाठी १२० लक्ष रुपयांची ई- निवीदा मागवली असल्याची माहिती बांधकाम उपविभागाचे अभियंता सौरभ होनमुटे यांनी सांगितले. मंजूर झालेल्या कामांचे संबंधित ठेकेदारांकडून ३१ मार्च अखेरपर्यंत तातडीने काम पूर्ण करण्याची व धोकादायक बनलेल्या या मार्गावरील वाहतुकीने संभाव्य होणारा मोठा अनर्थ टाळावा, अशी मागणी या मार्गाचे वाहनचालकांतून केली जात आहे.
वैराग-चिखर्डे या जिल्हा मार्गाचे काम लवकर सुरु करणार आहोत. पुल धोकादायक झाला आहे. या पुलाचे काम टेंडर वेगळे केले आहे. पडलेल्या पुलाचे काम तातडीने सुरु करण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवर सुरु असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे वैराग शाखा अभियंता यु.आर.जगताप यांनी दिली.
वैराग- हिंगणी -मळेगाव या मार्गावरील नदीवरील पुल धोकादायक झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील वैराग- उस्मानाबाद या गाडीच्या फेऱ्या बंद केल्या आहेत. यासंबंधी सार्वजनिक बांधकाम कार्यालयास लेखी पत्रव्यवहार केला आहे. होणाऱ्या धोक्यास कोण जबाबदार राहणार. पुलाची परिस्थिती लक्षात घेऊन लवकर या मार्गावरील पुलाचे काम दुरुस्त करावे. व या मार्गाची वाहतूक सुरुळीत व्हावी, अशी मागणी वैराग वाहतूक नियंत्रक अतुल कुलकर्णी यांनी केली आहे.