कुरिअरची नोकरी करून गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्याला वीरशैव व्हिजनचे पाठबळ 

प्रकाश सनपूरकर
Saturday, 24 October 2020

वीरशैव व्हिजनतर्फे समर्थ हिरेमठ या विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती देताना ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर लायन्स क्‍लबचे माजी अध्यक्ष संजय कोरे, उद्योगपती विजय नवले, वीरशैव व्हिजन उत्सव समिती अध्यक्ष सोमेश्वर याबाजी उपस्थित होते. 

सोलापूरः कुरिअरची नोकरी करून बीएस्सी पूर्ण करणाऱ्या समर्थ हिरेमठने एमएस्सी प्रवेश परिक्षेत देशातून नववा क्रमांक मिळवला. मात्र कुरिअरची नोकरी सुटल्याने त्याचे शिक्षण अडचणीत आले. त्याच्या शिक्षणासाठी वीरशैव व्हिजनच्या सदस्यांनी पंचवीस हजार रुपयांची मदत गोळा करून त्याला शिक्षण पूर्ण करण्यासाठी वार्षिक शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. या मदतीमुळे शहरातील आणखी एका स्कॉलर मुलांला प्रगतीची संधी देण्याचे काम झाले आहे. 

हेही वाचाः दिवाळीसाठी नांदेड-पनवेल-नांदेड विशेष रेल्वे फेरीला सुरुवात 

मनुष्य हा समाजशील प्राणी असल्याने तो वैयक्तिक किंवा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारे समाज कार्य व मदतकार्य करीत असतो. मात्र त्यामध्ये शिक्षणासाठी मदत करणे ही सर्वश्रेष्ठ भावना आहे असे प्रतिपादन श्री काशी पीठ शिष्यवृत्ती योजना प्रमुख व माजी मुख्याध्यापक रेवणसिद्ध वाडकर यांनी केले. 
वीरशैव व्हिजनतर्फे समर्थ हिरेमठ या विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती देताना ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर लायन्स क्‍लबचे माजी अध्यक्ष संजय कोरे, उद्योगपती विजय नवले, वीरशैव व्हिजन उत्सव समिती अध्यक्ष सोमेश्वर याबाजी उपस्थित होते. 

हेही वाचाः दसरा दिवाळीत बाजारात मोबाईलच्या नविन मॉडेलची रेंज दाखल 

वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी प्रास्ताविक केले. 
समर्थ हिरेमठ हा एम. एसस्सी. वन विभागाच्या प्रथम वर्षात शिकत आहे. एम.एसस्सी.च्या प्रवेश परीक्षेत तो संपूर्ण देशात नववा तर महाराष्ट्रात पहिला आला आहे. त्याच्या पित्याचे निधन झाले असून त्याची आई खाजगी नोकरी करत आहे. बी.एसस्सी.चे शिक्षण त्याने दापोली जि. रत्नागिरी येथे कुरियर दुकानात रात्रपाळीत काम करून घेतले आहे. तेथून मिळणाऱ्या पगारीवर त्याने त्याचे बी.एस्सी.चे तीन वर्षाचे शिक्षण पूर्ण केले. आता त्याला डेहराडून येथील विद्यालयात प्रवेश मिळाला आहे. सध्या कोरोनामुळे त्याच्याकडे कोणतेही काम नाही. त्याच्या प्रथम वर्षाची फी 70 हजार रुपये इतकी आहे. ती भरण्यासाठी त्याच्याजवळ रक्कम नव्हती. त्याची अडचण लक्षात घेत 25 हजार रुपयांचा निधी जमा केला. या रकमेचा धनादेश समर्थच्या हाती सुपूर्द केला. याचवेळी काशी पीठाच्या शिष्यवृत्ती योजनेतूनही समर्थ यास 12 हजार रुपयांची शिष्यवृत्ती लवकरच देणार असल्याचे रेवणसिद्ध वाडकर यांनी यावेळी सांगितले. 
यावेळी रुपाली हिरेमठ, संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, नागेश बडदाळ, आनंद दुलंगे, राजेश नीला, दीपक बडदाळ, विजयकुमार बिराजदार, अविनाश हत्तरकी, सिद्धेश्वर कोरे, संगमेश कंटी, अमित कलशेट्टी, बसवराज चाकाई, लोकेश ईरकशेट्टी, मेघराज स्वामी, बद्रीशकुमार कोडगे-स्वामी, सुनिल पाटील आदी उपस्थित होते. 
सूत्रसंचालन राहुल बिराजदार यांनी केले तर आभार विनायक दुदगी यांनी मानले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Veershaiva Vision support to a meritorious student by doing a courier job