गावकामगार तलाठी व कोतवाल लाचलुचपतच्या जाळ्यात 

दत्तात्रय खंडागळे
Friday, 18 September 2020

तक्रारदार यांच्या कुटुंबियांनी नाझरे (ता. सांगोला) हद्दीत साडेपाच एकर क्षेत्र विकत घेतले होते. 

सांगोला (सोलापूर): तक्रारदाराने खरेदी केलेल्या जमीन दस्ताची नोंद फेरफारवर घेण्यासाठी नाझरा (ता. सांगोला) येथील गावकामगार तलाठी गणेश मच्छिंद्र पंडित आणि कोतवाल मच्छींद्र विष्णू रणदिवे हे तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. 

हेही वाचाः जोरदार पावसाने मारापूर परिसरात पिके पाण्याखाली 

तक्रारदार यांच्या कुटुंबियांनी नाझरे (ता. सांगोला) हद्दीत साडेपाच एकर क्षेत्र विकत घेतले होते. 

हेही वाचाः शाळकरी मुलांचा किलबिलाट कधी थांबेल असे वाटलेच नाही 

सदर जमीन खरेदीचे दोन दस्त नोंदवून फेरफारवर घेण्यासाठी गावकामगार तलाठी गणेश पंडीत यांनी तक्रारदार यांच्याकडे 17 हजार रुपयांची लाच मागत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. याबाबत संबंधित विभागाने याची पडताळणी केली असता तक्रारदारांची तक्रार रास्त असल्याचे आढळले. या तक्रारीनुसार ता. 18 रोजी तडजोडीअंती दहा हजार रुपयांची लाच तलाठी कार्यालयामध्ये स्वीकारत असताना तलाठी गणेश पंडीत (वय 38) व कोतवाल मच्छिंद्र रणदिवे (वय 56) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक जगदीश भोपळे, पोलिस हवालदार चंद्रकांत पवार, पद्मानंद चंगरपल्लु, प्रमोद पकाले, श्‍याम सुरवसे यांच्या पथकाने केली.  

 

संपादन ः प्रकाश सनपूरकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Village workers in Talathi and Kotwal bribery traps