सोलापुरात टरबुजाचे भाव झाले "दुप्पट' 

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 7 एप्रिल 2020

संचारबंदीमुळे कलिंगड आणि टरबुज विक्री अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. इतर वेळी कलिंगड 50 ते 60 रुपये प्रती नग, तर टरबूज 25 रुपयांपासून पुढे असा दर मिळतो. यंदा मात्र मागणी वाढली, पुरवठाही आहे, मात्र दर मात्र अपेक्षेप्रमाणे मिळाले नाहीत. 
- महिबूब शेख, विक्रेता 

सोलापूर : इतरवेळी आठ ते दहा रुपयांना मिळणाऱ्या टरबुजाचे भाव दुप्पट झाले असून किरकोळ बाजारात त्याची किंमत 18 ते 20 रुपये झाली आहे. उद्या (बुधवार) हनुमान जयंती आहे. त्यामुळे भाव वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

हेही वाचा - सभापतींसाठी खुशखबर, निवडणुका रद्द 

कोरोनामुळे सध्या सोलापुरात संचारबंदी सुरु आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात जोरदार विक्री सुरु असते ते कलिंगड आणि टरबुजाची. गेल्या दोन दिवसांपर्यंत आठ ते दहा रुपयांना मिळणारे टरबूजाच्या किंमतीने झेप घेत दुप्पट वाढीपर्यंत मजल मारली. तसेच ठिकठिकाणी ढिगाने दिसणारे विक्रेतेही गायब झाल्याचे दिसून येत असून, टरबूजांच्या गाड्यावर फक्त कलिंगडे दिसू लागली आहेत. हनुमान जयंतीला टरबूज फोडण्याची परंपरा आहे. त्यामुळे टरबुजाला हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी मोठी मागणी असते. जयंती आणि संचारबंदी यामुळे विक्रेत्यांनीही टरबुजाचे भाव वाढवले आहेत. इतर वेळी 100 रुपयांना सहा-सात नग घेऊन जावा म्हणणारे विक्रेत्यांनी आता 100 रुपयांना पाच हा एकच दर निश्‍चित केला आहे. 

हेही वाचा - स्थायी समितीसाठी इच्छुकांना जोर का झटका 

कोरोना विषाणूच्या लॉकडाउनने कलिंगड, टरबूज अत्यंत कमी दराने विकावी लागत आहेत. उन्हाळ्यात कलिंगड आणि टरबूजाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. यंदा उन्हाळ्यात कलिंगड आणि टरबूजला मागणी असून मागील वर्षीचा दरही यंदा मिळेना. त्यामुळे कलिंगड व टरबूज उत्पादक शेतकऱ्यांबरोबरच विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. सोलापूर परिसरातील खेड्यांतून कलिंगड व टरबूज दरवर्षी मुंबई, पुणे यांसह कनार्टक, आंध्र व अन्य राज्यात विक्रीस मोठ्या प्रमाणावर पाठविले जातात. कोरोना विषाणू प्रार्दुभावाने देशभरात सध्या लॉकडाउन असल्याने संचारंबदी आहे. त्यामुळे जिल्हा बंदी करण्यात आली असल्याने उत्पादित कलिंगड व टरबूजाची सोलापूरातच विक्री करावी लागत आहे. हनुमान जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर टरबुजाचे दर वधारले आहेत. 

चार दिवसांपूर्वी मी 100 रुपयांना आठ टरबूज घेतले होते, किंबहुना विक्रेत्यानेच मला गळ घातली होती. आज मात्र तोच विक्रेता 100 रुपयांना पाच याच दराने टरबूज घेण्यास सांगत होता. चार दिवसांपूर्वीची मी त्याला आठवण करून दिली, त्यावेळी साहेब, उद्या हनुमान जयंती आहे हे तरी लक्षात घ्या, असे म्हणत मला निरुत्तर केले. 
- मुरली पंदील्ला, ग्राहक 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Watermelon rates doubled in solapur city