मोठी ब्रेकिंग ! आम्ही होटगी विमानतळाचा विचार सोडला; 'कोण' म्हणाले नक्‍की वाचा 

तात्या लांडगे
Wednesday, 16 September 2020

ठळक बाबी...

 • बोरामणी विमानतळासाठी 250 कोटींचा खर्च अपेक्षित
 • भारतीय विमानपत्तन प्राधिकरण 125 कोटींचा खर्च करुन विमानतळ उभारणार
 • महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे संयुक्‍त भागिदारीनुसार समभाग राहतील
 • संयुक्‍त भागिदारी कंपनी स्थापन करण्यासंदर्भात लवकरच होईल करारनामा
 • सध्या 35 हेक्‍टर खासगी जमिनीचे संपादन रखडले असून त्यासाठी 34 कोटींची मागणी
 • 2020-21 मध्ये विमानतळासाठी 78 कोटींची तरतूद, परंतु कोरोनामुळे मिळणार 25 टक्‍केच निधी

सोलापूर : होटगी रोड विमानतळ सुरळीत सुरू होण्यासाठी श्री सिध्देश्‍वर साखर कारखान्यासह विविध प्रकारचे अडथळे आहेत. त्याचा महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणातर्फे सर्व्हेही करण्यात आला. मात्र, अद्याप त्यातील एकही अडथळा दूर झालेला नाही. तत्पूर्वी, न्यायालयाच्या माध्यमातून कारखान्याच्या चिमणी पाडकामाचा निर्णयही ठरला आणि महापालिकेने त्यासाठी निविदाही प्रसिध्द केली. मात्र, पुढे काहीच झाले नसल्याने आता प्राधिकरणाने या विमानतळाचा विचार सोडून दिला आहे. बोरामणी विमानतळासाठी राज्य सरकारकडून 50 कोटींचा निधी मंजूर झाला असून उर्वरित जमीन संपादित करून पुढील काम सुरू केले जाणार आहे.

 

कारखान्याची चिमणी आणि नागरी वस्तीमुळे होटगी रोड विमानतळाचा विस्तार करणे अशक्‍य असल्याचे भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शहरापासून 13 किलोमीटर दूर असलेल्या सोलापूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील बोरामणी येथे नवीन ग्रीनफील्ड विमानतळ विकसित करण्यासाठी सरकारने 13 जून 2008 मध्ये 510 हेक्‍टर खासगी जमिनीच्या संपादनासाठी व हा प्रकल्प सार्वजनिक खासगी सहभाग तत्त्वावर उभारण्यास प्रशासकीय मान्यता दिली. त्यानुसार महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने आतापर्यंत 549 हेक्‍टर जमिनीचे संपादन पूर्ण केले आहे. यामध्ये भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाचा 51 टक्‍के तर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा 49 टक्‍के सहभाग असणार आहे. हे विमानतळ कार्यान्वित होईपर्यंत होटगी रोड विमानतळ सुरूच राहणार आहे. 

बोरामणीचेच विमानतळ सुरु करण्याचे नियोजन
होटगी रोडवरील विमानतळाच्या अडथळ्यांचा यापूर्वीच सर्व्हे झाला. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अहवालही दिला. कारखान्याची चिमणी असो की अन्य कोणतेही अडथळे दूर झालेले नाहीत. त्यामुळे या विमानतळाचा विचार सोडून आता बोरामणी विमानतळाचा विकास करून त्याठिकाणी विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. 
- अनिल पाटील, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास प्राधिकरण, मुंबई
 
ठळक बाबी...

 • बोरामणी विमानतळासाठी 250 कोटींचा खर्च अपेक्षित
 • भारतीय विमानपत्तन प्राधिकरण 125 कोटींचा खर्च करुन विमानतळ उभारणार
 • महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे संयुक्‍त भागिदारीनुसार समभाग राहतील
 • संयुक्‍त भागिदारी कंपनी स्थापन करण्यासंदर्भात लवकरच होईल करारनामा
 • सध्या 35 हेक्‍टर खासगी जमिनीचे संपादन रखडले असून त्यासाठी 34 कोटींची मागणी
 • 2020-21 मध्ये विमानतळासाठी 78 कोटींची तरतूद, परंतु कोरोनामुळे मिळणार 25 टक्‍केच निधी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We gave up the idea of ​​Hotgi road Airport