ajit pawar.jpg
ajit pawar.jpg

आमदार भालके यांचे मतदारसंघाचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करू : उपमुख्यमंत्री अजित पवार 

पंढरपूर(सोलापूर) ;  आमदार भारत भालकेंच्या अकाली जाण्याने पंढरपूर आणि मंगळवेढा तालुका पोरका झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा धडाडीचा कार्यकर्ता आणि माझा जवळचा सहकारी गमावल्यांच दुःख आहे. त्यांचं अपूर्ण राहिलेलं मतदारसंघातील कार्य पूर्ण करण्याचं मी शब्द देतो, अशी भावना व्यक्त करतानाच ही बोलण्याची वेळ नाही, मी बोलत नाही तर करुन दाखवतो, असं सांगत अजित पवार यांनी आगामी काळातील राजकीय परिस्थीतीवर भाष्य केलं. 

आमदार भारत भालकेंच्या पार्थिवावर सरकोली येथे शनिवारी (ता.28) सायंकाळी चार वाजणेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी झालेल्या शोक सभेत बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी पंढरपूर मंगळवेढा तालुक्‍याचे आपण पालकत्व स्विकारत असल्याचेही स्पष्ट केले. 
श्री. पवार म्हणाले की, आमदार भालकेंच्या निधनामुळे पंढरपूर व मंगळवेढा तालुका पोरका झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. तर मी माझ्या जवळचा सहकारी गमावला आहे. 

आमदार भारत भालकेंच्या रुपात आता त्यांचे पुत्र भगिरथ भालके यांच्याकडे पहावे, असे व्यक्तव्य माजी खासदार धनंजय महाडीक यांनी शोकसभेत बोलताना केलं होतं. महाडीक यांच्या भाषणातील मुद्द्याचा धागा पकडून अजित पवार यांनी मी बोलत नाही तर करुन दाखवतो अंस आमदार भालके यांच्या कुटुंबीयाबाबतचे सूचक व्यक्त केलं. 
कोरोनाचे संकट मोठं आहे. कोरोनामुळे अनेक जीवाभावाची माणसं सोडून गेली आहेत. अशा संकट काळात लोकांनी देखील काळजी 
घ्यावी, असेही पवार यांनी आवाहन केले. 
आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे नुकसान झाले आहे. सभागृहात ते पंढरपूर मंगळवेढ्याचे प्रश्न पोटतिडकीने मांडत असतं. त्यांचं रांगड्या व्यक्तिमत्वामुळे आणि आक्रमक भाषणशैलीमुळे अल्पवाधीत त्यांनी अनेकांना आपलंस केलं. त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची विठ्ठलाने ताकद द्यावी, अशी भावना सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली. 
माजी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, भारत भालके यांची अपूर्ण कामे थोरल्या पवार साहेबांनी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्ण करावीत. भगिरथ भालकेंना आमदार भारत भालकेंच्या रुपात बघून यापुढे सहकार्य करावे. 
आमदार भारत भालकेंनी शिंदे कुटुंबियावर खूप प्रेम केलं. त्यांनी नेहमीच मला वडिलकींच्या नात्याने सल्ला दिला. सभागृहातील एका प्रामाणिक आणि सच्चा सहकारी गमावल्याचं दुःख आहे. सोलापूर जिल्ह्याचे आणि पंढपूरचं झालेलं राजकीय नुकसान कधीही भरुन न येणारं आहे अशा भावना आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केल्या. 
आमदार प्रशांत परिचारक म्हणाले राजकारणात आम्ही तीन वेळा एकमेकांच्या विरोधात लढलो पण कधी आमच्यात मनभेद नव्हते. सहकारी संस्थांच्या वाटचालीत त्यांचे योगदान मोठे आहे. या पुढच्या काळात सर्व सहकारी संस्था चांगल्या पध्दतीने चालवणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे म्हणाले, आमदार भारतनानाच्या निधनामुळे पक्षाचं फार मोठं नुकसान झालं आहे. त्यांचं देशाचे नेते शरद पवार यांच्यावर खूप प्रेम आमि विश्वास होता. लोकांच्या कामात सतत व्यस्त असणारा लोकभिमुख आमदार आणि पक्षाचा कार्यकर्ता गमावल्याचं दुःख आहे. यावेळी आमदार संजय मामा शिंदे, यशवंत माने, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनीही श्रध्दांजली वाहिली. 

धाडसी नेतृत्व हरवले 
तळागाळातील लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करणारे माझे सहकारी आमदार भारतनाना भालके यांच्या आकस्मिक निधनामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची मोठी हानी झाली आहे ते एक धाडसी नेतृत्व होते सोलापूर जिल्ह्यातील विकासाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेत ते नेहमी माझ्याबरोबर हिरीरीने भाग घेत असत एक धडाडीचा नेता आज आपल्यातून निघून गेल्याने भालके कुटुंबीयवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांच्या परिवारास मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 
-आमदार बबनराव शिंदे 

लोककल्याणासाठी मेहनत घेणारे व्यक्तीमत्व 
जनतेच्या अचडणी सोडविण्यासाठी आमदार भारत भालके सदैव तत्पर असत. ते कॉंग्रेसमध्ये असोत की राष्ट्रवादीत. लोककल्याणाकरीता ते सदैव मेहनत घेत असत. कालच मी बोललो होतो. इतक्‍या लवकर ते सोडून जातील असे वाटले नव्हते. सोलापूर जिल्ह्यात सहकार क्षेत्रात त्यांनी केलेले काम, शेतकरऱ्यांसाठी घेतलेली मेहनत सोलापूर जिल्हा कधीही विसरु शकणार नाही. 
- सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री 

धाडसी लोकनेता 
पंढरपूर-मंगळवेढ्यातील जनतेप्रती असणारे प्रेम नेहमीच आमदार भालके यांच्या विधीमंडळातील कामातून व्यक्त होत होते. लोकांच्या प्रश्‍नांसाठी नेहमीच झगडणारा धाडसी लोकनेता म्हणून त्यांची ख्याती होती. मतदारसंघातल्या गावागावात, घराघरात त्यांचा जनसंपर्क होता. मतदारसंघातील दुष्काळी भागाला पाणी मिळवून देण्यासाठी ते सतत कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने सोलापूर जिल्ह्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे. एक धाडसी लोकनेता हरपल्याचे आम्हाला दु:ख आहे. 
- दत्तात्रय भरणे, पालकमंत्री, सोलापूर. 
लढणारे नेते ही त्यांची ओळख 
कोणताही राजकीय वारसा नसताना आमदार भारत भालके यांनी सर्वसामान्यांच्या पाठबळावर राजकीय क्षेत्रात यश मिळवले. राजकीय क्षेत्र असो वा सहकार क्षेत्र असो त्यांनी कधीही सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी दुजाभाव केला नाही. समाजासाठीही त्यांनी भरपूर प्रयत्न केले. कोणाचीही भीडभाड न ठेवता सर्वसामान्यांसाठी लढणारे नेते म्हणून त्यांची ओळख झाली होती. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यासह समाजातही पोकळी निर्माण झाली आहे. 
- सुभाष देशमुख, आमदार 

लढाऊ नेता गमावला 
आमदार भारत भालके यांच्या निधनाने लढाऊ नेता आपल्यातून निघून गेला आहे. विधानसभेत शेतकऱ्यांचे आणि दीन दुबळ्यांचे प्रश्‍न ते अतिशय आक्रमकपणे मांडत. एक सामान्य शेतकरी परिवारात जन्मलेला युवक ते सलग तीन वेळा आमदार हा प्रवास सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहला जाईल. त्यांच्या कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. 
- राम सातपुते, आमदार  

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com