अबब..! ग्रामसेवकांवर तब्बल 12 विभागांची जबाबदारी; ताणतणावामुळे होतेय मानसिक खच्चीकरण

भारत नागणे 
Monday, 14 September 2020

ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामाबरोबरच सरकारने ग्रामसेवकांवर इतर 12 विभागांची सचिव म्हणून जबाबदारी सोपवली आहे. यामध्ये महसूल, कृषी विभाग, पशुसंवर्धन, पोलिस विभाग, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, वनविभाग, जलसंधारण, स्वच्छ भारत मिशन, भूमी अभिलेख, कामगार कल्याण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, कृषी विकास योजना यांसारख्या इतर ग्रामस्तरीय समित्यांची सचिव म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : ग्रामीण विकासाचा पाया समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांवर दैनंदिन कामाबरोबरच इतर 12 विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. परिणामी कामाच्या ताणतणावामुळे ग्रामसेवकांचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होत आहे. कोणत्याही सोयीसुविधांशिवाय ग्रामसेवक आजही कोरोनाच्या संकट काळात काम करत आहेत. सरकारने ग्रामसेवकांच्या खांद्यावरील कामाचा भार कमी करावा, अशी मागणी ग्रामसेवकांनी केली आहे. 

हेही वाचा : सांगोल्यासाठी स्वतंत्र कोव्हिड हॉस्पिटल सुरू करा : पुरोगामी युवक संघटनेची पालकमंत्र्यांकडे मागणी 

ग्रामसेवकांच्या विविध प्रश्न आणि मागण्यांसंदर्भात सरकार दरबारी न्याय मागण्यासाठी अलीकडेच ग्रामसेवक सोशल फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामसेवकांच्या वाढत्या कामाच्या संदर्भात ग्रामसेवक सोशल फाउंडेशनच्या वतीने आभासी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चेवेळी ग्रामसेवकांनी सरकारने अतिरिक्त लादलेल्या अनेक जबाबदाऱ्यांविषयी आपली नाराजी व्यक्त केली. या चर्चेत राज्यभरातील सुमारे तीन हजारांहून अधिक ग्रामसेवक सहभागी झाले होते, अशी माहिती ग्रामसेवक सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा ज्योती पाटील यांनी आज "सकाळ'शी बोलताना दिली. 

हेही वाचा : सांगोला तालुक्‍यातील किंगमेकर सुभाष पाटील 

श्रीमती पाटील यांनी सांगितले की, ग्रामविकासामध्ये ग्रामसेवकांची महत्त्वाची जबाबदारी आहे. ग्रामविकासाच्या सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामाबरोबरच सरकारने त्यांच्यावर इतर 12 विभागांची सचिव म्हणून जबाबदारी सोपवली आहे. यामध्ये महसूल, कृषी विभाग, पशुसंवर्धन, पोलिस विभाग, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, वनविभाग, जलसंधारण, स्वच्छ भारत मिशन, भूमी अभिलेख, कामगार कल्याण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, कृषी विकास योजना यांसारख्या इतर ग्रामस्तरीय समित्यांची सचिव म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. 

वाढत्या जबाबदारीविषयी या आभासी बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. या वेळी अनेक ग्रामसेवकांनी वाढत्या कामाच्या तणावामुळे मानसिक खच्चीकरण होत असल्याची नाराजी व्यक्त करत इतर विभागांची जबाबदारी कमी करावी, अशी मागणी केली. या चर्चेत सोशल फाउंडेशनचे सचिव अमीर शेख, विजय म्हैसकर, विलास मुंडे, भारत मेश्राम, श्रीकांत भेर आदींसह इतर पदाधिकारी सहभागी झाले होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The workload increased as Gramsevaks were given the responsibility of the other twelve divisions