बेळगावात परिवहनच्या १८१ बसेस भंगारात

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 September 2020

दरवर्षी १५ वर्षांहून अधिक काळ सेवा बजावलेल्या बसेस मंडळाकडून भंगारात काढण्यात येतात.

बेळगाव : वायव्य परिवहन महामंडळाच्या बेळगाव विभागात यंदा ६५ बसेस भंगारात काढण्यात आल्या आहेत. दरवर्षी १५ वर्षांहून अधिक काळ सेवा बजावलेल्या बसेस मंडळाकडून भंगारात काढण्यात येतात. भंगारात काढण्याची ही संख्या टप्प्याटप्प्याने सुरू असून आणखी ३६ बसेस मंडळाच्या सेवेतून मुक्त होणार आहेत. दरम्यान, गत तीन वर्षांत १८१ बसेस भंगारात काढण्यात आल्या आहेत.

परिवहन महामंडळात मागील तीन वर्षांत मोठे बदल झाले आहेत. वायव्य परिवहनचे मुख्य कार्यालय हुबळीत असून एकूण सात जिल्ह्यांत महामंडळाचा विस्तार आहे. त्यात बेळगाव विभागाचाही समावेश आहे. नोव्हेंबरपूर्वी मंडळातून ११६ बसेस भंगारात काढण्यात आल्या होत्या. त्यातच आता ६५ बसेसची भर पडली आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुदानातून मंडळाच्या ताफ्यात नव्या ६५ बसेस फेब्रुवारी महिन्यात दाखल झाल्या असून या प्रत्येक बसेसना सीसीटिव्ही कॅमेरा बसविला आहे. आणखी पंधरा बसेसची मंडळाला प्रतीक्षा आहे.

हेही वाचा - कळतय पण वळत नाही : बेडसाठी दिवसभर; इंजेक्‍शनसाठी रात्रभर अन् मास्क मात्र हनुवटीवरच

प्रादेशिक परिवहन खात्याकडून (आरटीओ) दरवर्षी मंडळातील बसेसची तपासणी केली जाते. यात पंधरा वर्षांहून अधिक काळ सेवा बजावलेल्या बसेसचा परवाना नूतनीकरण केला जात नाही. परिवहन मंडळ आपल्या सेवेतून मुक्त होणाऱ्या बसेसची निविदा काढून ती भंगारात देते. बेळगाव विभाग हा वायव्य परिवहनमधील सर्वांत मोठा विभाग आहे. यात कार्यशाळा आगारासह एकूण सात आगार आहेत. ज्यापैकी पहिले आगार आंतरराज्य सेवा देते. तर दुसरे आणि तिसरे आगार अनुक्रमे शहर आणि ग्रामीण सेवेसाठी आहे. तर उर्वरित आगार हे तालुका पातळीवरील आहेत.

बेळगावातून गोव्यासह महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, शिर्डी, नागपूर, नाशिक तर तेलंगणामध्ये हैदराबाद तर तमिळनाडूतील चेन्नईची सेवा दिली जाते. त्यामुळे वायव्य महामंडळाकडून दरवर्षी बेळगाव विभागात नव्या बसेसची भर पडत असते. 

भंगारात काढलेल्या बसेस
वर्ष            बस संख्या
२०१७-१८      ५०
२०१८-१९      ५१
२०१९-२०      ८०
एकूण          १८१

हेही वाचा - अ .भा.वि.प कडून सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन : काय आहे कारण..?

"दरवर्षी परिवहन मंडळातून जुन्या बसेस निवृत्त होतात. नंतर अशा बसेसना ऑनलाईन पद्धतीने निविदा मागवून भंगारात काढले जाते. त्यापाठोपाठ टप्प्याटप्प्याने नवीन बसेसही मंडळात दाखल होत असतात. प्रवाशांना उत्तम आणि सुरक्षित सेवा देण्यासाठी मंडळाकडून दरवर्षी बस ताफ्यात नव्या बसेसची भर पडत असते."

- महादेव मुंजी, नियंत्रक, बेळगाव परिवहन विभाग

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 years ago buses retiring from state transportation department in belgaum