अबब ! बेळगावात मटणाचा दर 600 रूपये किलो

600 Rs Mutton Rate In Belgaum News
600 Rs Mutton Rate In Belgaum News

बेळगाव - सध्या असलेला मटण दर खाटीक व्यवसायिकांना न परवडणारा आहे. यामुळे प्रती किलोमागे 60 ते 80 रुपये दर वाढविण्याचा निर्णय बेळगाव मटण दुकान असोसिएशनने सोमवारी (ता. 4) बैठकीत घेतला. सध्या प्रती किलो 520 ते 540 रुपये मटणाचा दर आहे. तो 600 रुपयांपर्यंत करण्याचाही निर्णय घेण्यात आला. यासंबंधी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यामुळे बेळगाव शहरात मटणाचे दर वाढल्यास खवय्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. 

बैठकीवेळी व्यासपीठावर असोसिएशनचे अध्यक्ष ख्वाजा दर्गावाले, उपाध्यक्ष उदय घोटके, सचिव चंद्रू कलाल, रघुनाथ पलंगे, सुभाष माटेकर, चंद्रू पासलकर उपस्थित होते. शहरासह परिसरातील खाटीक व्यावसायिकांकडून बैलहोंगल, यरगट्टी, गोकाक, कित्तूर, मुधोळ, केरुर, अमीनगठ, रायबाग, अथणी, बसनबागेवाडी या बाजारातून बकऱ्यांची खरेदी केली जाते. स्थानिक व्यावसायिकांकडून या बाजारात 10 किलो वजनाच्या बकऱ्याला 5 हजारांचा दर मागितला जातो. मात्र, गोवा, महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू, बंगळूर, हासन, मंड्या या भागातील व्यापारी वाढीव दराने या बाजारातून बकरी खरेदी करत आहेत. त्यांच्याकडून 10 किलो वजनाच्या बकऱ्याला सात ते साडेसात हजार रुपये दिले जात आहेत. यामुळे आमच्याकडूनही हाच दर मागितला जात आहे. 

सध्या सुरु असलेली मटण विक्री व आमच्याकडून केली जाणारी खरेदी याचा ताळमेळ न बसणारा आहे. यामुळे व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे, असे मत व्यावसायिकांनी बैठकीत व्यक्‍त केले. यावेळी माजी नगरसेवक राकेश पलंगे, गौस ताडे, मुन्ना सर्जेखान, विलास शालबिद्रे, अलीसाब पटेल, प्रकाश महागावकर आदी उपस्थित होते. 

दोन महिन्यांपूर्वी आलेल्या महापुरात बकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यापूर्वी बकऱ्याच्या चामड्याचा दर 60 ते 70 रुपये होता. आता फक्त 10 रुपयावर आला आहे. यामुळे नुकसानच सहन करावे लागत आहे. या सर्व कारणांचा विचार करून दर वाढविण्यात येणार आहे. दरवाढीनंतर हॉटेल व्यवसायिकांनीही सहकार्य करावे. 
- ख्वाजा दर्गावाले,
अध्यक्ष, मटण दुकान असोसिएशन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com