आनंद कुंभार यांचे निधन

आनंद कुंभार यांचे निधन

सोलापूर : पुराभिलेख संशोधन, संपादन व प्रकाशन कार्यात मग्न असलेले आनंद नागप्पा कुंभार (वय 78) यांचे आज निधन झाले. शिलालेख वाचणारे संशोधक म्हणून त्यांचा लौकिक होता.

आरंभी काही काळ सैन्यदलाच्या तोफखान्यात बिनतारी संदेश वाहक म्हणून काम केल्यानंतर ते महाराष्ट्र वीज मंडळामध्ये कार्यरत होते. कुंभार यांचे प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षण सोलापुरात झाले. घरची आर्थिक बाजू बेताची असल्यामुळे माध्यमिक शिक्षण रात्रशाळेतून घ्यावे लागले. सर्वसाधारण बुद्धिमत्तेमुळे इयत्ता दहावीनंतर उदरनिर्वाहासाठी त्यांना प्रयत्न करावे लागले. घरी पिढीजात कुंभारकामाची कला असल्यामुळे त्यातच ते घरच्यांना कामात मदत करू लागले. परंतु, त्या कला-उद्योगात त्यांचे मन रमेना. त्या वेळीसुद्धा नोकरी सहजासहजी मिळत नसे. शेवटी एके दिवशी त्यांनी भारतीय सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी सैन्यात प्रवेश केला. भारतीय सैन्यांतर्गत तोफखान्यात बिनतारी संदेश वाहक म्हणून आनंद कुंभार यांना दाखल करून घेण्यात आले.

सैन्यात सेवारत असतानाच चीन-भारताचे युद्ध झाले. युद्धोत्तर काळात घरी काही प्रसंग असे घडले, की त्यांना सैन्यातील सेवेचा त्याग करून गावी परत यावे लागले. पुस्तके, नियतकालिके आदी वाचण्याची आवड त्यांना पूर्वीपासूनच होती. विदर्भ संशोधन मंडळाच्या वार्षिकांतील संशोधनात्मक लेख वाचून ते स्तिमित तर झालेच; परंतु संमोहितही झाले. विशेषत: डॉ. वा.वि. मिराशी यांचे ताम्रपट, शिलालेख व नाण्यांवरील संशोधनात्मक लेख त्यांच्या मनावर खोलवर परिणाम करणारे ठरले. आपणही या क्षेत्रात काम करावे, असे त्यांना वाटू लागले. या बाबतीत त्यांनी थेट डॉ. मिराशी यांच्याशी संपर्क साधला. सुयोगाने त्यांना प्रतिसाद मिळाला. पुराभिलेख विद्या काय किंवा नाणकशास्त्र काय, ही विद्वानांची विद्या आहे. त्याला संस्कृत भाषेचे उत्तम ज्ञान हवे, इंग्रजी भाषेत गती हवी आणि सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे पुरातन लिपी वाचता आली पाहिजे आणि लेख वाचल्यानंतर त्यांतील कथन, ज्ञाते इतिहासाची सांगड घालून, प्राप्त लेखाने नवी अशी भर कोणती पडली हे स्पष्ट करून सांगता आले पाहिजे. या गुणवत्तेपैकी एकही गुण श्री. कुंभारांकडे नव्हता. सैन्यातून परत आल्यानंतर ते बाहेरून एस.एस.सी उत्तीर्ण झाले होते. ग्रंथांनाच गुरू मानून त्यांनी अभ्यास सुरू केला. पुणे भारत इतिहास संशोधक मंडळातील डॉ. . . तथा तात्यासाहेब खरे यांची त्यांनी भेट घेतली. डॉ. खरे यांनी त्यांना खूप मौलिक सूचना दिल्या व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुराभिलेखाचे ठसे कसे घ्यावेत याचे ज्ञान दिले.

त्यांनी प्रथमत: पुराभिलेखांच्या सर्वेक्षणासाठी कार्यक्षेत्राची निवड केली. सोलापूर जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहेत. जिद्दीने व ओढीने आठवड्यातील शनिवार-रविवार या भ्रमंतीसाठी राखून ठेवून त्यांनी जिल्ह्यातील चार तालुक्‍यांचे सर्वेक्षण करून पुराभिलेखांचे ठसे घेतले. येथे नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कुंभारांनी यासाठी व्यक्तींकडून, संस्थेकडून वा शासनाकडून एक पैसादेखील घेतला नाही.
गावांच्या सर्वेक्षणांतून लेख सापडले खरे; परंतु त्यांपैकी बहुतांशी कन्नड लिपी व भाषेतील होते, तर काही लेख पूर्वसुरींनी वाचून प्रसिद्ध केले होते. उरलेल्यांपैकी जेवढी म्हणून देवनागरी लिपी संस्कृत, मराठी भाषेत होती, त्याचे त्यांनी वाचन करून प्रसिद्धीसाठी शोध नियतकालिकांकडे पाठविली व यथावकाश प्रसिद्धही झाली. कन्नड लेखांबद्दल त्यांच्या मनामध्ये समस्या निर्माण झाली. या लेखांना बोलके कोण करणार हा प्रश्न समोर उभा राहिला. कर्नाटक विद्यापीठातील डॉ. कलबुर्गी व डॉ. रित्तींचे नाव या संदर्भात त्यांना सुचविण्यात आले. यथावकाश धारवाडला जाऊन त्यांनी त्यांची भेट घेऊन आपण करीत असलेल्या कामाची कल्पना दिली व कन्नड लेखांचे वाचन करून देण्याची विनंती केली. डॉ. कळबुर्गी यांनी मात्र डॉ. रित्ती हे काम त्यांच्यापेक्षा उत्तम तऱ्हेने करू शकतील अशी सूचना करून त्यांची शिफारस डॉ. रित्तींकडे केली. कुंभारांच्या दृष्टीने डॉ. रित्तींचे सकारात्मक सहकार्य मोठे आनंददायी होते. त्यांच्या प्रयत्नाने अज्ञात अशी ऐतिहासिक माहिती प्रथमच उजेडात येऊ लागली. त्याचे फलस्वरूप म्हणजे "इन्स्क्रिप्शन्स फ्रॉम सोलापूर डिस्ट्रिक्‍ट' या नावाने डॉ. रित्ती व श्री. कुंभार या जोडनावांनी ग्रंथ प्रसिद्ध झालाश्री. कुंभार यांनी स्वतंत्रपणे देवनागरी लिपीतले वाचलेले पुराभिलेख तथा पुराभिलेखांवर आधारित काही स्फुट लेखांचे एक पुस्तक महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदानाने प्रसिद्ध झाले. "संशोधन तरंग' या शीर्षकाच्या पुस्तकास त्याच वर्षीचे मंडळाचे श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा उत्कृष्ट शोध ग्रंथ म्हणून पुरस्कार मिळालाबाराव्या शतकातील थोर शिवशरण शिवयोगी सोन्नलिगे (सोलापूर) सिद्धरामांशी निगडित चार लेख प्रथमच प्रकाशात आले आहेत. अद्भुत असे एक विवाहपुराण शिलालिखित झाले असून त्या विवाह पुराणास "गिरिजाकल्याण' असे संबोधिले जाते. कुंभार यांच्या शोधामुळे कलचुरी सम्राट बिज्जलदेव (दुसरा) याच्या पट्टराणीचे नाव पहिल्यांदाच समजले, तिचे नाव होते रंभादेवी. देवगिरीकर यादवांचा शेवटचा राजा सिंघणदेव (तिसरा) याचा लेख कामती खुर्द ( ता. मोहोळ ) येथे सापडला. क्रमिक इतिहास पुस्तकात याला "शंकरदेव' संबोधितात. कलचुरी राजघराण्यातील एक शासक महामंडलेश्वर अमुगीदेव याचे तीन लेख दक्षिण सोलापूर तालुक्‍यातून समोर आले आहेत. त्याच घराण्यातील पुढे स्वतंत्रपणे सम्राट झालेला बिज्जलदेवा (दुसरा) चा तो महामंडलेश्वर असतानाचा पहिला निर्देश असलेला लेख सोलापुरात मिळाला. आनंद कुंभार यांच्या या शोधकार्याची नोंद घेऊन सोलापूर विद्यापीठ व अन्य संस्थांनी त्यांचा भव्य नागरी सत्कार केला होता.

वाछितो विजेया होईवा
कुडल (ता. दक्षिण सोलापूर) येथे संगमेश्वर मंदिराच्या तुळईवर एक लेख मिळाला. तो केवळ अडीच ओळींचा असून ज्ञात माहितीप्रमाणे तो मराठी भाषेतील स्पष्ट काळाचा उल्लेख झालेला पहिला शिलालेख आहे. लेखातील शेवटची ओळ "वाछितो विजेया होईवा' अशी कोरलेली आहे. 2018 साली त्याची सहस्राब्दी झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com