हाय व्होल्टेज लढत; 4 उमेदवार रिंगणात, निवडणूकीला रंग चढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

political news

राजकारण आता प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळी वळणे-समीकरणे घेत आहे.

हाय व्होल्टेज लढत; 4 उमेदवार रिंगणात, निवडणूकीला रंग चढणार

आटपाडी : सांगली जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत सर्वात हाय होल्टेज लढत आटपाडीत होत आहे. सोसायटी गटातून भाजपकडून माजी आमदार राजेंद्र देशमुख असतील तर विरोधात महाविकास आघाडीचे म्हणजे आमदार अनिल बाबर यांचे कट्टर समर्थक तानाजीराव पाटील यांच्यात ही लढत असेल. याशिवाय राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख विरुद्ध भाजपचे सुनील काटे यांच्यात लढत असेल. नागरी बँका व पतसंस्था गटातून भाजपने यपावाडीचे अजित चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. यावेळी तालुक्यातून चार उमेदवार रिंगणात आहेत.

दीर्घकाळ स्थिर असलेले आटपाडी तालुक्याचे राजकारण आता प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळी वळणे-समीकरणे घेत आहे. आजचा मित्र, उद्या असेलच असे नाही तर कालचे विरोधक आज एकत्रित येत आहेत. गेल्या पंधरा- वीस वर्षांत मित्र आणि विरोधक सतत बदलत असल्याने इथे पक्षांना काही स्थानच उरलेले नाही. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत एकत्र आलेले गट विधानसभेला वेगळे होते, तर जिल्हा परिषद निवडणुकीत एकमेकाच्या विरोधात लढलेले भाजप-सेना विधानसभेला एकत्र होते. आता पुन्हा जिल्हा बँकेच्या निवडणुकीला पक्षीय रंग आल्यामुळे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी, अशी लढत लागल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे.

हेही वाचा: एसटी संपाचे स्टेटस ठेवले, ८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

राष्ट्रवादीचे खंदे समर्थक माजी आमदार राजेंद्र देशमुख आता भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे तानाजीराव पाटील हे शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवार आहेत. भाजप विरुद्ध सेना- राष्ट्रवादीत आटपाडीत झालेला राडा, मतदाराची फोडाफोडी- पळवापळवी यामुळे ही निवडणूक लढतीआधीच हाय होल्टेज ठरली आहे.

महाविकास आघाडीने मजूर संस्थां गटातून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांना उमेदवारी दिली असून त्यांची लढत भाजपचे सुनील काटे यांच्याशी असेल. दिघंची जिल्हा परिषद गटात त्यांचा प्रभाव आहे. त्यांच्या मातोश्री यापूर्वी जिल्हा बँकेत संचालक होत्या. आता ते नशीब आजमावत आहेत. त्यांना मिळालेली उमेदवारी तानाजीराव पाटील यांच्यासाठी पथ्यावर पडणारी आहे. तर तालुक्यावर पारंपरिक वर्चस्व असलल्या राजेंद्र देशमुख यांना यावेळी स्वबळावर किल्ला लढवावा लागणार आहे.

हेही वाचा: परिवहन मंत्री दिशाभूल करताहेत; सदाभाऊंचा अनिल परबांवर घणाघात

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची त्यांना साथ मिळेल. नागरी बँका व पतसंस्था गटातून भाजपने यपावाडीचे अजित चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. चव्हाण आटपाडीच्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत. गावपातळीवर त्यांनी आपला प्रभाव सिध्द केला आहे. भाजपने आणि महाविकास आघाडी दोघांना मैदानात उतरवले आहे. तालुक्यातून एकूण चार उमेदवार मैदानात उतरले असून यातले किती संचालक होतात याबद्दल कुतूहल आहे.

मतदार असे

  • सोसायटी गट - ६९

  • मजूर आणि इतर संस्था - २२९

  • नागरी बँक व पतसंस्था - ६४९

हेही वाचा: "हाच का 'महाविकास आघाडी'चा कॅामन मिनिमम प्रोग्राम?"

loading image
go to top