esakal | सातारा : आरोपी न करण्यासाठी फाैजदार अडकला लाखाेंच्या माेहात

बोलून बातमी शोधा

सातारा : आरोपी न करण्यासाठी फाैजदार अडकला लाखाेंच्या माेहात

पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यांच्यासमवेत संजय साळूंखे, विनोद राजे, विशाल खरात, तुषार भोसले यांच्यासह लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

सातारा : आरोपी न करण्यासाठी फाैजदार अडकला लाखाेंच्या माेहात
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्हा पोलिस दलातील फलटण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी (मूळ राहणार दौंड, पुणे) यांना चार लाख रुपयांची लाच घेताना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई सोमवारी (ता. 17) मध्यरात्री उशिरा करण्यात आली.
 
संशयित फौजदार दळवी यांनी संबंधित तक्रारदारास वीस लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यातून चार लाख रुपयांची तडजोड झाली. ही चार लाखांची रक्कम स्विकारातना दळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (ता. 17) मध्यरात्री उशिरा करण्यात आली. हा प्रकार फसवणूक प्रकरणात आरोपी न करण्यासाठी झाला. दळवी यांनी लाच मागून पैसे घेतल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यांच्यासमवेत संजय साळूंखे, विनोद राजे, विशाल खरात, तुषार भोसले यांच्यासह लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. 

जरुर वाचा : ...म्हणून उज्ज्वल निकमांनी दिला आंध्र प्रदेशातील खटल्याचा दाखला

घरफोडीच्या गुन्ह्यात संशयिताला अटक
 

सातारा : बोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीच्या तीन गुन्ह्यांतील संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. अनिकेत संतोष वाटोंबळे (वय 20, रा. निनाम, ता. सातारा) असे त्याचे नाव आहे. आज या गुन्ह्यातील संशयित नागठाणे (ता. सातारा) येथील वीरेंद्र ऍकॅडमी शेजारी आला असल्याबाबतची माहिती निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड व त्यांच्या पथकाला त्याला पकडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या पथकाने नागठाणे परिसरात सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्याला बोरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

महानुभाव मठाशेजारी एकास मारहाण 

सातारा : दुचाकी आडवी मारल्याच्या कारणावरून काल रात्री महानुभाव मठाजवळ एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. आशिष अनिल भिसे (रा. गुरुवार पेठ) असे त्याचे नाव आहे. तो काल रात्री साडेअकराच्या सुमारास दुचाकीवरून निघाला होता. महानुभाव मठाजवळ त्याला एका चारचाकी चालकाने अडवले. तू आमच्या वाहनाला दुचाकी का आडवी मारली, असे म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी गाडीतील इतर युवकांनी त्याला रॉडने व लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यात आशिष गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अनोळखी वृद्धेचा उपचारावेळी मृत्यू 

सातारा : खेड येथे सेवा रस्त्यावर डिसेंबर महिन्यात अनोळखी वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या अनोळखी वृद्धेचा काल रात्री मृत्यू झाला आहे. गेल्या दीड महिन्यापासून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. 

खुनाच्या प्रयत्न केल्याप्रकरणी शिक्षा 

सातारा : लग्न करत नाहीस, तसेच दाखल केलेल्या केसेस मागे घेत नाही, या कारणावरून एका युवती व तिच्या आईचा कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला जिल्हा न्यायाधीश सावंत यांनी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. हणमंत अशोक देटके (वय 30, रा. अंजली कॉलनी, शाहूपुरी) असे त्याचे नाव आहे. 16 फेब्रुवारी 2017 ला दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याने बुधवार नाका ते मोळाचा ओढा रस्त्यावर कल्पतरू प्लाय स्टोअरसमोर माया- लेकींवर हल्ला केला होता. महिला सहायक पोलिस निरीक्षक किर्दत यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. दत्तक केस योजनेमध्ये शाहूपुरी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विशाल वायकर यांनी या खटल्यावर काम केले. साक्षीदारांच्या साक्षी व सहायक सरकारी वकील मिलिंद ओक यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश सावंत यांनी देटकेला दोषी धरले. आज त्याला तीन वर्षे सक्तमजुरी, पाचशे रुपये दंड व दंड न दिल्यास सहा दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा ठोठावली. सरकारी वकिलांना पोलिस प्रॉसिक्‍यूशन स्कॉडने सहकार्य केले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार शेख यांनी काम पाहिले. 
 

फसवणूकप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा 

सातारा : इलेक्‍ट्रॉनिक वस्तू खरेदी करून त्याचे पैसे न देता दुकानदाराची आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 
अमित चव्हाण असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत नितीन विश्वनाथ अनपट (रा. तामजाईनगर, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचे दुकान आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या दुकानातून अमित चव्हाण याने फ्रीज, वॉशिंग मशिन, एलईडी अशा विविध प्रकारचे आठ लाख दोन हजार रुपयांचे साहित्य खरेदी केले होते. वारंवार मागणी करूनही त्याने त्यांना पैसे दिले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनपट यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली. 

वाचा : पोलिसांच्या एका हाकेत हजारो महिला पडल्या घराबाहेर


हेही वाचा : इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावर मुक्ता, हमीद दाभाेलकर म्हणाले...

वाचा : कास (सातारा) : बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी तिने स्विकारले लाखाे रुपये अन्...