आटपाडी - कार्यकर्त्यांचा राडा; पडळकर, तानाजी पाटीलांच्या 3 गाड्या जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कार्यकर्त्यांचा राडा; पडळकर, तानाजी पाटीलांच्या 3 गाड्या जप्त

सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या धामधुमीत आटपाडीत झालेल्या या घटनेमुळे तणावाचे वातावरण आहे.

कार्यकर्त्यांचा राडा; पडळकर, तानाजी पाटीलांच्या 3 गाड्या जप्त

सांगली : शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रविवारी झालेल्या राड्याच्या पार्श्‍वभूमीवर भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांच्यावर खुनी हल्ल्याचा; तर माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील यांच्यावर बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून दोघांच्याही आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. या गुन्ह्याचा तपास आता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदानासाठी ठराव करण्याच्या वादातून हा प्रकार घडला होता.

सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या धामधुमीत आटपाडीत झालेल्या या घटनेमुळे तणावाचे वातावरण आहे. जादाची पोलिस कुमत तैनात केली आहे. एलसीबीचे विशेष पथक आटपाडीत तळ ठोकून आहे. कार्यकर्त्यांच्या हालचालींवर विशेष पथकाची करडी नजर असेल, असे एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी अद्याप संशयितांचा शोध सुरूच आहे. व्हिडिओ शूटिंग, तसेच फोटोंच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचून गुन्हे दाखल केले जातील, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा: कोल्हापूर : आंबोली घाटाला जाळीचे संरक्षण

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की आमदारांनी अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राजू जानकर यांनी केला. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करीत मोटारीची तोडफोड केली. त्यानंतर परस्पर विरोधी फिर्यादी दिल्या. दहा जणांविरुध्द गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी तालुक्यात विशेष मोहीम राबवत छापेमारी सुरू केली. गेल्या दोन दिवसांत पंधरा ठिकाणी कारवाया केल्या. आज वाहने जप्त झाली. पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. निरीक्षक गायकवाड यांच्यासह उपनिरीक्षक महंमद रफीक शेख, महादेव नागणे, सचिन कनप, जितेंद्र जाधव, इम्रान मुल्ला, संदीप गुरव, सुनीता शेजाळे, सविता माळी यांचे पथक कार्यरत आहे.

छापेमारी सुरू

पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या धरपकडीसाठी आटपाडीसह तालुक्यातील खरसुंडी, झरे, बनपुरी, हिवतड, निंबवडे, दिघंची या ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. राडा झाला त्यादिवशीच्या चित्रफितीच्या आधारे ओळख पटवून शोध सुरू आहे. त्यामुळे ऐन निवडणूक काळात अनेकांना तालुक्यातून परागंदा व्हावे लागले आहे.

हेही वाचा: जंगल युद्धात माहिर सी-६० पथकाची नक्षलवाद्यांमध्ये दहशत

loading image
go to top