बेळगावात तब्बल २४ आठवड्यानंतर फुलली खासबाग बाजारपेठ

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 September 2020

खासबाग बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने लॉकडाऊन नंतरही बाजार बंदच ठेवला होता.

बेळगाव : शहरातील सर्वात मोठा आठवडी बाजार म्हणून ओळख असलेला खासबागचा बाजार तब्बल 24 आठवड्यानंतर भरला आहे. त्यामुळे व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. बाजार पुन्हा भरल्याची माहिती मिळताच सकाळपासून नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे. रविवारीच्या दिवशी लोकांच्या रेलचेलीत असणार खासबाग बाजार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्याच्या अखेरपासून बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे बाजार पेठेत कोणीही नसल्याने बाजार निर्मनुष्य दिसून येत होता. 

मार्च महिन्यात कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पंतप्रधानांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जनता कर्फ्युचे अवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत पहिल्यांदाच खासबाग बाजार बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने बाजार बंद होता. खासबाग बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने लॉकडाऊन नंतरही बाजार बंदच ठेवला होता. त्यामुळे व्यापारी वर्गाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत होता.

हेही वाचा -  बापरे : पत्नी आहे की वैरीन, खून करुन पतीचा मृतदेह जेसीबीने खड्डा खणून गाडला 

शहरात वेगवेगळ्या कारणांनी बंद पुकारण्यात आला तरी खासबागच्या आठवडी बाजारात भाजीपाला आणि इतर वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे बाजार कधीही बंद राहत नव्हता. मात्र  कोरोनाला दूर ठेवण्याचा संकल्प करीत खासबागचा आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला. तसेच जिल्हा प्रशासनानेही बाजार बंद ठेवण्याची सूचना केली होती. मात्र अनलॉक 4 मध्ये नियमांचे पालन करत काही प्रकारची सूट देण्यात आली होती. आज तब्बल २४ आठवड्यानंतर बाजार भरला आहे. 

बाजार बंद असल्याने ग्रामीण भागातून भाजीपाला व इतर वस्तू विकणाऱ्या शेतकरी वर्गाला अन्य ठिकाणी जाऊन भाजीपाल्याची विक्री करावी लागत होती. मात्र बाजार सुरू झाल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. मात्र शहर परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी मात्र सामाजिक अंतर राखत खरेदी वस्तू खरेदी करत आहेत. 

हेही वाचा - पैसे असूनही आमची माणसं मात्र दगावत आहेत ; कोणती आहे घटना..
 

"अनेक दिवसांपासून बाजार बंद असल्याने परिसरातील सर्वच व्यापारी वर्गाला मोठे नुकसान सहन करावे लागत होते, मात्र आता बाजार पुन्हा सुरू झाल्याचे 
समाधान असून खरेदी करताना मास्कचा वापर करा अशी सूचना केली जात आहे."

 - कृष्णा हलगेकर, व्यापारी खासबाग

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after six month the main market khasbag from belgaum open today with government rules