पंढरपुरातील चारही कारखाने बंद... वाचा, बाजारपेठेवर झालेला परिणाम 

पंढरपुरातील चारही कारखाने बंद... वाचा, बाजारपेठेवर झालेला परिणाम 

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातच नव्हेतर संपूर्ण राज्यात सर्वाधिक ऊस आणि साखर उत्पादन पंढरपूर तालुक्‍यात घेतले जाते. यावर्षी मात्र पंढरपूर तालुक्‍यातील महत्वाचे चारही साखर कारखाने आर्थिक अडचणींमुळे बंद आहेत. कारखाने बंद असल्याचा मोठा परिणाम येथील बाजारपेठेवर आणि शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर झाला आहे. शिवाय तालुक्‍यातील गावागावातील अनेक छोट्यामोठ्या व्यवसायिकांच्या धंद्यावर ही कुऱ्हाड पडली आहे. कारखाने बंद असल्याने पंढरपूर भागातील सुमारे 400 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे साखर कारखानदारी चालवण्यात कारखान्याचे संचालक अपयशी ठरल्याचा ठप्पाकाही त्यांच्या माथी लागला आहे. 

उजनी, भाटघर या धरणांबरोबरच भीमा नदीच्या पाण्यामुळे पंढरपूर तालुक्‍यातील ऊस शेती समृध्द झाली आहे. दरवर्षी तालुक्‍यात सुमारे 45 ते 50 लाख टन उसाचे उत्पादन होते. यातून तालुक्‍यात कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. एका साखर कारखान्यामध्ये सुमारे 600 कोटींहून अधिकची उलाढाल होते. यावर्षी तालुक्‍यातील विठ्ठल कारखाना (गुरसाळे), सहकार शिरोमणी (भाळवणी), सिताराम महाराज (खर्डी) आणि भिमा कारखाना (टाकळी) हे तालुक्‍याच्या अर्थकारणाशी निगडीत असलेले चारही साखर कारखाने आर्थिक अडचणींमुळे बंद ठेवण्याची वेळ संचालक मंडळावर आली आहे. 

गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात दुष्काळ असतानाही गाळपासाठी मुबलक ऊस उपलब्ध होता. इतर कारखान्यांच्या तुलनेत विठ्ठल कारखान्याला अवघ्या 20 किलोमीटर परिसरातून उसाची आवक होते. त्यामुळे कारखान्याच्या ऊस वाहतूकीवर होणार खर्च देखील कमी होतो. तरीही मागील काही वर्षापासून कारखाना व्यवस्थापनातील बिघडलेल्या आर्थिक गणितामुळे यंदा कारखाना बंद ठेवण्याची वेळ संचालक मंडळावर आली आहे. संचालकांनी केलेल्या कारभाराचा आर्थिक फटका उत्पादक, कामगार, वाहतूकदार, तोडणी मजूर आणि कारखाना परिसरातील अनेक छोट्यामोठ्या व्यवसायिंकाना बसला आहे. यामुळे विठ्ठल कारखान्यात होणारी सुमारे 600 कोटी रुपयांची उलाढाल यंदा ठप्प झाली आहे. 

भीमा, सहकार शिरोमणी, सिताराम या साखर कारखान्याच्या परिसरात देखील शेतकरी, कामगारांना याचा मोठा फटका बसला आहे. या कारखान्यांनी ऐनवेळी हंगाम घेणार नसल्याचे जाहीर केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा ऊस आजही शेतात तोडणी अभावी उभा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऐनवेळी धावपळ करण्यची वेळी आली. विशेषतः विठ्ठल परिवाराशी निगडीत असलेले चारही कारखाने बंद असल्याने शेजारील माढा, अकलूज, मंगळवेढा या भागात सुरु असलेल्या कारखान्यांवरच शेतकऱ्यांची मंदार आहे. 

बाजार पेठेचे गणितही बिघडले 
पंढरपूरच्या बाजार पेठेला साखर उद्योगाचा मोठा सपोर्ट आहे. साखर उद्योगाला घरघर लागल्यामुळे येथील बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. दिवाळी, पाडवा अशा मोठा सणाच्या वेळी विठ्ठल साखर कारखान्याच्या ऊस बिलावरच बाजारपेठेचं गणित अवलंबून असते. परंतु मागील काही दिवसांपासून कारखान्याचे आर्थिक गणित बिघडल्याने येथील बाजार पेठेतील व्यापाऱ्यांचेही गणित बिघले आहे. 
- शहाजी काळे, कापड व्यापारी, पंढरपूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com