अखिल भारतीय कुलगुरू चषक सोमवारपासून कोल्हापुरात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील आठ विद्यापीठांच्या संघांसह पंजाब येथील तीन, जम्मू-काश्‍मीर येथून तीन, हरियाणातून दोन, राजस्थान, दिल्ली, हिमाचल प्रदेश व उत्तर प्रदेश येथून प्रत्येकी एक असे विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

कोल्हापूर - क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठेची मानली जाणारी अखिल भारतीय कुलगुरू चषक कर्मचारी टी -20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन यंदा शिवाजी विद्यापीठात केले आहे. स्पर्धेचे उद्‌घाटन सोमवारी (ता. 18) दुपारी 1 वाजता स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मधुकरराव गायकवाड यांच्या हस्ते होईल. स्पर्धा 28 ऑक्‍टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. स्पर्धेचे यमजमान पद मिळणे ही विद्यापीठासाठी अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. 

स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील आठ विद्यापीठांच्या संघांसह पंजाब येथील तीन, जम्मू-काश्‍मीर येथून तीन, हरियाणातून दोन, राजस्थान, दिल्ली, हिमाचल प्रदेश व उत्तर प्रदेश येथून प्रत्येकी एक असे विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या संघांमध्ये विद्यापीठातील विविध पदांवर काम करणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सहभाग असणार आहे. प्रत्येक संघात खेळाडू, एक प्रशिक्षक व एक संघव्यवस्थापक अशा एकूण 17 जणांचा समावेश आहे. त्यानुसार स्पर्धेसाठी दाखल होणाऱ्या 20 संघांच्या 360 जणांच्या निवास व भोजन व्यवस्थेसह स्पर्धा कालावधीत मैदानांवर ने-आण करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने विशेष सोय केलेली आहे. 

ही अभिमानाची बाब

"ही स्पर्धा विद्यापीठात होणे ही अभिमानाची बाब असून नेटके नियोजन केले आहे. स्पर्धेच्या निमित्ताने दोन राज्यातील संस्कृती, आहार, भाषा यांचे आदन प्रदान होते. गुरुवारी (ता. 21) स्पर्धकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असून भोजनाचे आयोजनही केले आहे.' 

डॉ. देवानंद शिंदे

20 संघांची विभागणी चार गटात

क्रीडा विभागप्रमुख पी. टी. गायकवाड म्हणाले, ""पावसामुळे सर्वच मैदाने खराब झाली होती; पण या स्पर्धेसाठी तयारी करून विद्यापीठातील दोन आणि राजाराम महाविद्यालयाचे एक मैदान तयार केले आहे. 20 संघांची विभागणी चार गटात केली असून प्रत्येत संघ साखळी फेरीत चार सामने खेळेल. एकूण 46 सामने होणार आहेत. स्पर्धा ही बीसीसीआयच्या नियमावलीनुसार होणार आहे. स्पर्धांसाठी पंच व्यवस्था महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनद्वारा नोंदणीकृत तसेच, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन संलग्नित पंच असोसिएशनतर्फे केले आहे. स्पर्धेत विजेता, उपविजेता व तृतीय क्रमांक अशा तीन संघांना चषक तसेच मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट यष्टीरक्षक यांसह प्रत्येक सामन्याचा मानकरी अशी एकत्रित व वैयक्तिक बक्षिसे चषक स्वरूपात विद्यापीठामार्फत देण्यात येणार आहेत.' 

पत्रकार परिषदेला प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे, विशांत भोसले, सांख्यिकी अधिकारी अभिजित रेडेकर यांच्यासह संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. 

संकेतस्थळावर अपडेट 
स्पर्धेच्या रोजच्या सामान्यांची माहिती, गुण, वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल. त्यामुळे जगभरातून कोठूनही या सामन्यांची माहिती तत्काळ सर्वांना समजणार आहे. अशी माहिती कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर यांनी दिली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All Indian Chancellor Cup T-20 Competition In Kolhapur